रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षपदी विद्यमान कार्याध्यक्ष सौ. नमिता कीर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी खासदार, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती कोकण साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आज रत्नागिरी पत्रकार परिषदेत दिली.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे मध्यवर्ती संमेलन येत्या महिन्यापूर्वी रत्नागिरीत होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक काल (दि. ११ डिसेंबर) मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारकात झाली आली. बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्याची माहिती देण्यासाठी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद झाली. कवी डॉ. महेश केळुसकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या केंद्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार कार्यकारी अध्यक्ष सौ. नमिता कीर पाहत होत्या. त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कोमसापचा आठशे किलोमीटर क्षेत्रात पसरलेला व्याप सांभाळण्यासाठी नियामक मंडळ नियुक्त करण्याचे ठरविण्यात आले. त्यामध्ये डॉ. मुणगेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार संजय केळकर, महिला विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, शोभाताई सावंत, प्रा. अशोक ठाकूर आणि उषा परब हे या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. अरुण नेरूरकर सल्लागार असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे म्हणून रमेश कीर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असून रेखा नार्वेकर आणि कोषाध्यक्ष प्रकाश दळवी विश्वस्त मंडळाचे सदस्य असतील. परिषदेच्या कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, कार्यवाह प्रा. माधव अंकलगे आणि कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून गजानन पाटील यांची निवड करण्यात आली.
कोकणातील सात जिल्हाध्यक्षांची नावेही यावेळी जाहीर करण्यात आली. ती अशी – रत्नागिरी डॉ. शशांक पाटील, सिंधुदुर्ग मंगेश मस्के, रायगड सुधीर शेठ, नवी मुंबई मोहन भोईर, मुंबई लता गुठे, पालघर प्रवीण दवणे, ठाणे प्रशांत डिंगणकर.
परिषदेच्या वाङ्मयीन उपक्रम समितीच्या प्रमुखांची नियुक्तीही कालच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. हे प्रमुख असे – पुरस्कार समिती – प्रा. अशोक ठाकूर, कवी केशवसुत स्मारक समिती आणि पुस्तकांचे गाव समिती – गजानन पाटील, ग्रंथ प्रकाशन समिती – अनुराधा नेरूरकर, महिला साहित्य समिती – गौरी कुलकर्णी, उषा परब, युवा संघटन आणि युवा साहित्य संमेलन समिती – दीपा ठाणेकर जनसंपर्क समिती प्रा. एल. बी. पाटील, नाट्य समिती – मोहन भोईर, मराठीच्या भल्यासाठी – रमेश कीर, रेखा नार्वेकर, प्रसारमाध्यम समिती जयू भाटकर, विधी आणि कायदा समिती -अॅड. यशवंत कदम, केंद्रीय साहित्य संमेलन समिती – रमेश कीर, प्रदीप ढवळ, नमिता कीर, लेखापरीक्षण समिती -मधुकर टिळेकर, सर्व समित्यांचे समन्वयक – रवींद्र आवटी.
पत्रकार परिषदेला रमेश कीर, प्रकाश दळवी, गजानन पाटील, माधव अंकलगे उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड