ग्रामीण भागातील साहित्यनिर्मितीला कोमसापचा आधार – डॉ. मुणगेकर

रत्नागिरी : ग्रामीण भागात उत्तम साहित्यनिर्मिती होत असून त्याकरिता कोकण मराठी साहित्य परिषद हा मोठा आधार आहे. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही साहित्य परिषदांपेक्षा हे वेगळेपण आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

कोकण मराठी साहित्य परिषदेत नव्याने नियामक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. मुणगेकर यांची सन्मानपूर्वक निवड करण्यात आली आहे. त्याबाबतची घोषणा करण्यात आल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ते रत्नागिरीत बोलत होते. ते म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषदेशी निर्मितीपासूनच माझा संबंध आहे. कुलगुरू असताना वसईत, त्यानंतर बेळगाव आणि प्रशांत आणि पणजीतील साहित्य संमेलनाचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले. याशिवाय कोकणातील अनेक साहित्यिकांशी माझे चांगलं संबंध आहेत.

कोमसापने नियामक समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड केली आहे, त्याबद्दल मी संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांच्यासह कार्यकारिणीचा आभारी आहे, असे सांगून डॉ. मुणगेकर म्हणाले, महिलांचे साहित्य संमेलन आणि युवा साहित्य संमेलन ही कोकण मराठी साहित्य परिषदेची दोन वैशिष्ट्ये आहेत. सर्वच क्षेत्रांत वावरणाऱ्या महिलांना स्वतःचे व्यासपीठ मिळत नाहीत. अशा स्थितीत खास महिलांचे आणि त्यांच्या आधिपत्याखाली होणारे साहित्य संमेलन महाराष्ट्रातील कोणत्याही प्रादेशिक साहित्य परिषदेने भरविण्याचा प्रयत्न केलेला नाही. हा एक वेगळा कार्यक्रम आहे, याचा मला अभिमान वाटतो. युवा संमेलनसुद्धा वेगळे आहे अलीकडच्या काळात मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरी भागांपेक्षासुद्धा ग्रामीण भागातील तरुणांचे साहित्य मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. मला दर महिन्याला जवळजवळ पाच-दहा पुस्तके तरी येतात. कथा, कविता, कादंबऱ्यांचा त्यामध्ये समावेश असतो. ग्रामीण भागातील त्यांचे जीवन, त्यांचे प्रश्न, त्यांना भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा यांचे चित्रण त्यात असते. ते बोलके असते. ते तेथील घटनांवर आधारलेले असते. त्यामुळेच ते अस्सल असते. आजकाल इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जमाना असला, तरी लिखित पुस्तकांना पर्याय नाही. कारण ते अक्षर साहित्य असते. ते एक प्रकारचे डॉक्युमेंटेशन असते. त्यामध्ये हे साहित्य लिहिले जाते. म्हणूनच ते चिरंजीव असते, असे डॉ. मुणगेकर म्हणाले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply