ठाणे : गेली सुमारे तीन दशके साहित्य व्यवहारात आपल्या साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांनी आगळा ठसा उमटविलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती समितीद्वारे दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ११ आणि १२ जानेवारीला ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हे संमेलन पार पडणार आहे.
साहित्यविषयक विविध कार्यक्रम तसेच सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील विचारमंथनातून युवा पिढीची स्पंदने टिपू पाहणाऱ्या या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ठाण्यात कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते करण्यात आले.
वयाच्या नव्वदीतही तरुणाईच्या उत्साहाने कार्यरत असणारे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण मराठी साहित्य परिषद साहित्य प्रसारासाठी आणि सामाजिक भान जपत अभिरुची घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ज्येष्ठांबरोबरच नवी पिढीदेखील कोमसापच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय आहे. अशा युवा साहित्यप्रेमींच्या कोमसापच्या युवाशक्ती समितीकडून २०२२ या नववर्षारंभी युवा दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी आजचे आघाडीचे युवा कथाकार-कादंबरीकार प्रणव सखदेव यांची निवड करण्यात आली आहे. ‘पायऱ्यांचा गेम’ (कवितासंग्रह), ‘निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’ (कथासंग्रह), ‘९६ मेट्रोमॉल’, ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ (कादंबरी) अशा पुस्तकांतून आशयगर्भ लेखन करणारे लेखक प्रणव सखदेव नव्या पिढीचे साहित्य-समाजचिंतन संमेलनात मांडतील. तर संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के हे भूषविणार आहेत. तसेच राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे संमेलनाचे उद्घाटक आहेत. याशिवाय उद्घाटन सोहळ्यास गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, उच्च आणि शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, कुमार केतकर, आमदार संजय केळकर, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, नियामक मंडळ अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ठाणे महापालिकेच्या विशेष सहकार्याने होणाऱ्या या संमेलनात साहित्य-समाजकारण-संस्कृतीकारणाचा वेध घेणाऱ्या विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी ख्यातनाम लेखक अरविंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या ‘आम्ही साहित्य पालखीचे भोई’ या परिसंवादातून सध्या मराठी ग्रंथव्यवहारात निष्ठेने कार्यरत असलेले अमृत देशमुख, प्रदीप कोकरे, सिद्धार्थ गायकवाड, गितेश शिंदे, विनम्र भाबळ हे युवा-ग्रंथप्रसारक आपले अनुभव मांडतील. ‘मायमराठी : एन्टरटेन्मेंट ते इन्फोटेन्मेंट’ या चर्चासत्रात नाटककार शिरीष लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली चिन्मय मांडलेकर, दिग्पाल लांजेकर, विनायक पाचलग, समीर वीर, निरेन आपटे हे नवकला-माध्यमांतील व्यावसायिक लेखनप्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करतील. यावेळी माध्यमतज्ज्ञ जयू भाटकर यांची विशेष उपस्थिती लाभेल. स्पर्धापरीक्षांना सामोरे जाणाऱ्या तरुणाईसाठी ‘पोलादी चौकटीत मी’ या सत्रात संवादक यजुवेंद्र महाजन यांनी आयकर विभागाचे उपायुक्त प्रवीण चव्हाण आणि पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्याशी साधलेला संवाद प्रेरणादायी ठरेल. ‘पत्रकारिता आणि युवापिढी’ या परिसंवादातून आजचे आघाडीचे पत्रकार मार्गदर्शन करतील, तर तृतीयलिंगी आणि अन्य उपेक्षित समुदायाचे प्रश्न तसेच समाजमानसाच्या लिंगभाव जाणिवेवर श्रीगौरी सावंत यांच्या मुलाखतीतून क्ष-किरण टाकला जाईल.
कवयित्री प्रज्ञा दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनात राज्यभरातील निवडक युवा कवी आपली कविता सादर करतील. गझलकार ए. के. शेख यांच्या अध्यक्षतेखाली युवा गझलकारांचा मुशायरा पार पडेल. याशिवाय कवीकट्टा आणि गझलकट्ट्यांवर नवोदित कवींचा काव्यजागर होईल. याशिवाय अभिजित पानसे यांच्या अध्यक्षतेखाली कौशल इनामदार, राजेश देशपांडे, विजू माने, राजेश बने यांच्या सहभागाने होणारे ‘सेलिब्रिटींचे काव्यसंमेलन’ संमेलनाचा आकर्षणबिंदू ठरेल. बोलीभाषांतील कवितांसाठीचे खास सत्र आणि मराठीबरोबरच उर्दू, इंग्रजी, हिंदी, हिंदुस्थानी आदी भाषांतील कवींचे बहुभाषिक संमेलनही साहित्यिक आदान-प्रदानाचा सेतू ठरावे.
संमेलनात कवितांचे नृत्यातून सादरीकरण करणारा ‘पद्यपदन्यास’ हा कार्यक्रम, याबरोबरच मराठीतील दिवंगत साहित्यिकांच्या निवडक साहित्याचे अभिवाचन आणि कवयित्री शान्ता शेळके व कवीवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘स्वरांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त मराठी रॅप आणि स्टॅण्डअप कॉमेडी यांचे सादरीकरण हे या संमेलनाचे वेगळेपण ठरणार आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सदैव प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संमेलनात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करणारी महाविद्यालयीन-शालेय विद्यार्थी आणि अन्य मान्यवरांच्या स्वाक्षरीसह तब्बल ७५ हजार पत्रे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात येणार आहेत. तसेच युवा संमेलनाची ‘पालवी’ ही स्मरणिका कोमसापच्या ठाणे शाखेकडून संमेलनात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
याशिवाय ग्रंथप्रदर्शन, चित्र आणि रांगोळी प्रदर्शन यांचाही आस्वाद संमेलनात घेता येणार आहे. दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहण्याकरिता त्यांनी गौरविलेले आणि डॉ. प्रदीप ढवळ लिखित व मंदार टिल्लू दिग्दर्शित ‘शिवबा’ या महानाट्याने संमेलनाचा समारोप होणार आहे.
युवा पिढीच्या साहित्यिक आविष्काराने रंगणाऱ्या या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण शुक्रवारी आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयातील संमेलन केंद्रात करण्यात आले. सागर मौर्य यांची संकल्पना असलेल्या या बोधचिन्हाचे अनावरण कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले. तसेच संमेलनाची विस्तृत कार्यक्रमपत्रिकाही जाहीर करण्यात आली. यावेळी कोमसापचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळा कांदळकर, प्रसिद्धीप्रमुख जयू भाटकर, कोमसाप युवाशक्ती समिती प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर, प्राचार्य डॉ. हर्षला लिखिते, वरिष्ठ पत्रकार राजेश दाभोळकर, सदानंद मोरे, नीतल वढावकर, मनिषा राजपूत, आरती कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोमसापच्या युवाशक्ती समितीच्या प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर यांनी संमेलनाच्या कार्यक्रमांबद्दलची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमपत्रिकेस ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी शुभेच्छापर आशीर्वाद दिले असल्याची माहिती प्रा. ठाणेकर यांनी दिली. तसेच कोमसापच्या ठाणे शाखेच्या मनीषा राजपूत यांनी संमेलनातील विविध सत्रांत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या निवड फेऱ्यांबद्दलची माहिती यावेळी दिली. कोमसापचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळा कांदळकर यांनी संमेलनाच्या तयारीबद्दलचा आढावा सादर केला. कोमसापचे प्रसिद्धी प्रमुख जयू भाटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
युवा पिढीच्या सुप्त गुणांना आणि साहित्यप्रेमाला आवाहन करणाऱ्या कल्पक कार्यक्रमांचे संमेलनात आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेचे सर्व सहकार्य कोमसापला होत असून करोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून संमेलन पार पडेल. राज्यभरातील विविध भागांतून आलेल्या युवा साहित्यिकांचा विविधांगी साहित्याविष्काराचा संमेलनात ठाणेकरांना आस्वाद घेता येईल, असे कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले.,
संपर्क : अमोल शिंदे (कोमसाप-युवाशक्ती, प्रसिद्धी समिती प्रतिनिधी)
9892910444, kyuvasamelan22@gmail.com
