‘कोमसाप’च्या प्रतीक्षेत साहित्यप्रेमी

सध्या संमेलनांचे दिवस सुरू आहेत. करोना नंतरच्या काळात मोठ्या उत्साहाने संमेलने पार पडत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठीतील सर्वांत मोठे समजले जाणारे संमेलन उदगीर येथे होत आहे. त्याची तयारी तिकडे सुरू असतानाच मंडणगड या तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या नावाने होणारे सहावे आणि मंडणगडमधले पहिले साहित्य संमेलन पार पडले. छोटी छोटी संमेलने झाली पाहिजेत, असे अनेक पूर्वसंमेलनाध्यक्षांनी सांगितले आहे. त्यानुसार ही संमेलने होत आहेत. त्यांचे स्वागत करायला हवे. त्यांना पाठिंबाही द्यायला हवा. राजापूर लांजा नागरिक संघाने ग्रामीण साहित्याची चळवळ सात वर्षांपूर्वी सुरू करून दिली आहे. त्यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा होती. त्याला मंडणगडने प्रतिसाद दिला आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.

हे सारे घडत असताना त्यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद या अनेक उद्दिष्टांनी स्थापन झालेल्या संस्थेने त्यामध्ये पुढाकार घ्यायला हवा होता, असे राहून राहून वाटते. अलीकडेच महाराष्ट्रातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरे भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या स्मारकाच्या निमित्ताने अनौपचारिक चर्चा झाली. त्यावेळी मिळालेली माहिती धक्कादायक होती. पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी पुढाकार घेऊन कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांचे स्मारक उभारून उत्तम आणि दमदार सुरुवात केली. कोकणातच जन्मलेले साहित्यिक भारतरत्न पां. वा. काणे यांच्या स्मारकाबाबत मात्र परिषदेने उदासीनता दाखवली एवढेच नव्हे, तर नकार दिला, ही खरेच गंभीर बाब आहे. साहित्यिक चळवळ गावोगावी रुजवावी आणि सुप्त व्युत्पन्नमती कोकणाची ओळख आणखी दृढ करावी, असा कोकण मराठी साहित्य परिषदेचा सर्वात मोठा उद्देश आहे. त्यादृष्टीने गावागावांमधील छोट्यामोठ्या साहित्यिकांचा शोध घ्यावा, त्यांच्या साहित्याला प्रसिद्धी द्यावी, कलागुणांना वाव द्यावा, अशी परिषदेची उद्दिष्टे असताना एका भारतरत्न साहित्यिकाचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला असता तो नाकारणे म्हणजे मूळ उद्दिष्टापासून फारकत घेण्यासारखेच आहे. वास्तविक असा एखादा प्रस्ताव पुढे आल्यानंतर त्यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा होता. चर्चा व्हायला हवी होती आणि कोमसापचे संस्थापक मधूभाई कर्णिक यांनी केशवसुत स्मारक उभारून रचलेला परिषदेचा पाया भारतरत्नाचे स्मारक उभारून आणखी भव्य आणि भक्कम करता आला असता, पण ते होऊ शकले नाही.

त्याच वेळी मंडणगडसारख्या सर्वार्थाने दुर्लक्षित, उपेक्षित आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या मंडणगडमध्ये साहित्य संमेलन व्हावे, त्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेसारख्या संस्थेने सहभाग घ्यावा, ही बाब कोमसापसाठी म्हटले तर लाजिरवाणीच आहे. अजूनही वेळ गेली आहे असे नाही. तालुका स्तरावर स्थानिक साहित्य संमेलने घेण्याचा प्रयत्न करायला हवा. ठाण्यात युवा साहित्य संमेलन नुकतेच भव्य स्वरूपात पार पडले. अशी विभागीय आणि मोठी साहित्य संमेलने घेण्यापेक्षा छोट्या संमेलनांची अधिक गरज आहे. कोमसाप या संस्थेत अजूनही असलेली धुगधुगी वाढवायची असेल, तर अशा संमेलनांबाबत कोमसापने पुन्हा एकदा विचार करायला हवा. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सध्या सुरू आहे. त्यानिमित्तानेही स्वातंत्र्याच्या काळात अग्रणी असलेल्या कोकणातील अनेक साहित्यिकांच्या आठवणींना उजाळा देण्यासारखे छोटे छोटे कार्यक्रम त्या त्या साहित्यिकांच्या गावी करण्याची संधी कोमसापला उपलब्ध झाली होती, पण चळवळ वाढविण्याऐवजी संकुचित करण्याकडे कल असल्याचे दिसत असल्यामुळे तसे कार्यक्रम सुचण्याची शक्यता नाही. यापुढे तरी कोमसापला सद्बुद्धी व्हावी, अशी अपेक्षा आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २२ एप्रिल २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply