Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सकल हिंदू समाजाच्या मोर्चामुळे रत्नागिरी शहर दणाणले

Advertisements

रत्नागिरी : लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, अवैध प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचा आवाज, गोहत्या, धर्मांतरण याविरोधात सकल हिंदू समाजातर्फे विराट हिंदू गर्जना मोर्चा आज काढण्यात आला. सुमारे पाच हजारांहून अधिक हिंदू बंधू, भगिनी मोर्चात सहभागी झाले होते. लक्ष्मी चौक येथे झालेल्या सभेला विराट गर्दी झाली.

महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण याबाबतचे कायदे त्वरित व्हावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रात याकरिता ४० मोर्चे काढण्यात आले. रत्नागिरीतील हा मोर्चा त्याचाच एक भाग होता.

भगवे ध्वज, पांढरा झब्बा लेंगा अशी पारंपरिक वेशभूषा करून मोर्चेकरी सहभागी झाले. मारुती मंदिर येथे आरती करून हनुमंताचे पूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत पूर्णाकृती मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मोर्चामध्ये जातीपाती आणि पक्षभेद विसरून हिंदूधर्मीय मोठ्या संख्येने एकत्र आले आणि शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मोर्चादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हिंदू गर्जना मोर्चाची सुरवात मारुती मंदिर येथे झाल्यानंतर मोर्चा माळ नाका, जयस्तंभ, राम आळी, गोखले नाका येथे पोहोचला. माळ नाका येथे अद्वैत पेट्रोलियम येथे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. लव्ह जिहाद, धर्मांतरामुळे महाराष्ट्रात हिंदू समाजाच्या लेकी, सुना कधी नव्हे एवढ्या असुरक्षित झाल्या आहेत. कोणती हिंदू मुलगी अथवा महिला लव्ह जिहादला कोणत्या क्षणी बळी पडेल, याची शाश्‍वती उरलेली नाही, असे सांगत हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी हिंदू महिलांनी एकी दाखवली. त्यामुळे मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

हिंदू गर्जना मोर्चामध्ये जय भवानी जय शिवाजी अशा हिंदुत्ववादी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. गोहत्या बंदी हीच हिंदू राष्ट्राची नांदी, हिंदूंनो, आपल्या भागातील तरुण लव्ह जिहादला बळी पडू नये यासाठी कटिबद्ध व्हा, धर्मरक्षण करा, लव्ह जिहाद प्रतिबंधक कायदा झालाच पाहिजे, धर्मांतर प्रतिबंधक कायदा झालाच पाहिजे, गाय हमारी माता है, असे फलक झळकले होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version