आषाढस्य प्रथम दिवसे – मूळ रचना आणि अनुवादांमधलं सौंदर्य

आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आषाढाचा पहिला दिवस. हा दिवस कविकुलगुरू कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. मेघदूत हे त्याचं महान काव्य. या काव्याच्या दुसऱ्या श्लोकाची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशी होते. कालिदासाची जन्मतिथी माहिती नसल्याने त्याच्या काव्यातल्या या उल्लेखावरून आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने मेघदूताच्या काही अनुवादांविषयी

आषाढ महिन्याचा पहिला दिवस कविकुलगुरू कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. ‘मेघदूत’ हे त्याचं महान काव्य. पत्नीविरहामुळे व्याकुळ झालेला एक यक्ष मेघाबरोबर स्वतःच्या पत्नीला संदेश पाठवतो, या कल्पनेवर मेघदूत हे काव्य रचलेलं आहे, हे सर्वश्रुत आहे. मंदाक्रांता वृत्तात केलेल्या या रचनेत प्रत्येकी चार चरणांची १११ कडवी आहेत. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागांत हे काव्य विभागलेलं आहे. या काव्याने अनेक कवी-लेखकांना भुरळ पाडली, प्रेरणा दिली. इसवी सनाच्या चौथ्या ते सहाव्या शतकात या काव्याची निर्मिती झाली असावी, असा अंदाज आहे. या काव्यावर सुमारे नव्वद भाष्यं किंवा टीका प्रसिद्ध झाल्या आहेत. तसंच, अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवादही झाले आहेत.

रा. प. सबनीस, कृष्णशास्त्री चिपळूणकर, डॉ. श्रीखंडे, पं. ग. वि. कात्रे, ना. ग. गोरे, वसंतराव पटवर्धन, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, शान्ता शेळके, द. वें. केतकर, अ. ज. विद्वांस आदी दिग्गजांनी ‘मेघदूता’चा मराठी अनुवाद केला आहे. चिंतामणराव देशमुखांनी तर मेघदूताचे दोन अनुवाद केले आहेत. चिंतामणरावांसह पंडित ग. वि. कात्रे, बा. भ. बोरकर, द. वें. केतकर आणि अ. ज. विद्वांस यांनी मंदाक्रांता वृत्तातच अनुवाद केला आहे. काही अनुवाद समश्लोकी आहेत, तर काही अनुवाद वेगळ्या प्रकारचे आहेत. मेघदूतात वर्णन केलेल्या मेघाच्या मार्गावरून विमानाने प्रवास करून निरीक्षणं नोंदवणारे कॅप्टन आनंद जयराम बोडस, डॉ. सुरेश विश्वनाथ भावे यांच्यासारखेही काही विद्वान आहेत. एकंदरीतच, मेघदूत हे प्रेमाविषयीचं प्रेमात पाडणारं काव्य आहे.

मेघदूताच्या ‘पूर्वमेघ’ या भागातल्या दुसऱ्या कडव्याची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या तीन शब्दांनी होते. ते खूपच प्रसिद्ध झाले आहेत; मात्र ते संपूर्ण कडवं अनेकांना माहिती नसतं. ते मूळ संपूर्ण कडवं आणि त्याचे काही अनुवाद पाहू या.

मूळ कडवं –

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी
नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ:।

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं।
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।

काही अनुवाद…

कृश हातातुन गळून पडले सोन्याचे कंकण
कामातुर हो हृदय कामिनी दूर राहिली पण

आषाढाच्या प्रथम दिनी त्या दिसे पर्वतापरी
नयनरम्य घन, करी कड्यांवर गज वा क्रीडांगण!

  • (अनुवाद : कुसुमाग्रज)

प्रेमी कान्ता-विरहिं अचलीं घालवी मास कांहीं
गेलें खालीं सरुनि वलय स्वर्ण हस्तीं न राही

आषाढाच्या प्रथम दिनिं तो मेघ शैलाग्रिं पाहे,
दन्ताघातें तटिं गज कुणी भव्यसा खेळताहे

  • (अनुवाद : डॉ. चिंतामणराव देशमुख)

आषाढाच्या प्रथम दिवशी, बघे रम्यशा ढगा
दंताघाती समद गजसा, देखणा मेघ देखे

  • (अनुवाद : बा. भ. बोरकर)

आषाढाच्या पहिल्या दिवशीं बघतो शिखरीं मेघ वांकला,
टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणूं ठाकला!

  • (अनुवाद : शान्ता शेळके)

आषाढाच्या प्रथम दिनिं तया दिसे मेघ गिरिशिखरा
आलिंगुनिया रम्य, जणों गज तटा धडकतां झुकला

  • (अनुवाद : रा. प. सबनीस)

आषाढाच्या प्रथम दिवशी शिखरी टेकलेला
वप्रक्रीडे निपुण गजसा मेघ तो देखियेला

  • (अनुवाद : डॉ. शैलजा म. रानडे)

आषाढाच्या पूर्व समयी, वाकुनी क्रीडा करण्या
गजरूपाने, जणू मेघ, ढुसण्या देण्या, नभी आला

  • (अनुवाद : गोविंद ओझरकर)

आषाढाचा तो प्रथम दिन, पडे तयाच्या दृष्टीस
प्रचंड मोठा कृष्णमेघ, दिसतसे तो हत्तीसमान
सुळे मोठे उगारून

  • (अनुवाद : डॉ. ज्योती रहाळकर)

देखा प्रथम दिन आषाढ माह के, लिपटा एक बादल ऊँचे शिखर से
बादल न मानो मदमाता हाथी मूँह औंधा करके दाँतों से तिरछे
मिट्टी कुरेदे नगमेखला से ढूँसे पे ढूँसे मस्ती में जूझे

  • (अनुवाद : वैशाली नायकवडे)

एकच कल्पना किती वेगवेगळ्या प्रकारे, किती वेगवेगळ्या शब्दांद्वारे, किती विविध कल्पनांतून मांडता येऊ शकते, याची ही फक्त एक छोटीशी झलक. संपूर्ण आस्वाद घ्यायचा असेल, तर मेघदूत संपूर्णच वाचायला हवं. ‘मेघदूताचे मराठी अनुवाद’ या नावाचं पुस्तक डॉ. अरुणा रारावीकर यांनी लिहिलं असून, त्यात प्रमुख अनुवादांचा परामर्श घेतला आहे. अनेकांना प्रेरणा देणारं असं महान काव्य रचणाऱ्या कालिदासाला वंदन!

कालिदासाची महती सांगणारा एक श्लोक प्रसिद्ध आहे. तो असा –

पुरा कविनां गणनाप्रसंगे।
कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः ।।
अद्यापितत्तुल्यकवेर्अभावात् ।
अनामिका सार्थवती बभूव ।।

त्याचा भावार्थ असा :
पूर्वी एकदा महान कवींची गणना करण्याचे काम सुरू झालं. हाताच्या बोटांवर करंगळीपासून ते मोजायला सुरुवात झाली. पहिलं नाव अर्थातच महाकवी कालिदासाचं होतं; मात्र त्यानंतर अजूनही त्याच्या तोडीचा असा कोणी कवी सापडलेला नाही. त्यामुळे ‘अनामिका’ (करंगळीनंतरचं बोट) हे नाव सार्थ झालं.


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply