रत्नागिरी : “द वीक – हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे २०२३” च्या सर्वेक्षणात येथील फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोकणात पहिले स्थान पटकावले आहे.
“द वीक” दरवर्षी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करते. या सर्वेक्षणाच्या आधारावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा ठरवला जातो. त्यासाठी यावर्षी देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतून निवडक महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मुख्यत्वे महाविद्यालयाची मूलभूत माहिती, पायाभूत सुविधा, बौद्धिक संसाधने, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, शैक्षणिक कार्यक्रम आणि प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन, नोकरीतील संधी, औद्योगिक क्षेत्राशी महाविद्यालयाचा संपर्क आणि संशोधन अभिमुखता या गोष्टींचा विचार करण्यात आला. त्यामध्ये फिनोलेक्सने मुंबई विद्यापीठामध्ये सहावे, महाराष्ट्रातील उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत विसावे, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत भारताच्या पश्चिम विभागात राष्ट्रीय पातळीवर सत्ताविसावे, उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १८४ वे, उत्कृष्ट सरकारी आणि खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर २१३ वे स्थान पटकावले आहे. हे महाविद्यालय कोकणातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे.
फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नॉलॉजी हे महाविद्यालय १९९६ साली फिनोलेक्स समूहाचे अध्यक्ष कै. पी. पी. छाब्रिया यांच्या प्रेरणेतून उभे राहिले. गेल्या २७ वर्षांमध्ये या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. या महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) कडून उत्कृष्ठ श्रेणी प्राप्त झाली आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या अभियांत्रिकी शिक्षणाबरोबर व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे योग्य प्रशिक्षण देऊन नामांकित आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर ॲकॅडमीचा नेहमीच भर राहिला आहे.
या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

