चिपळूण : चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दिला जाणारा ‘अपरान्त भूषण’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार वैद्यकीय व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना जाहीर झाला आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. ठाकूर जागतिक संदर्भ असलेल्या उत्कृष्ट बोटॅनिकल गार्डनचे निर्माते आणि संग्राहकही आहेत.
कामाच्या निमित्ताने भ्रमंती करताना आणि अनेक आव्हानांना तोंड देताना मिळालेल्या अनुभवातून शिकत गेलेले डॉ. ठाकूर म्हणजे जगभरातील जवळपास प्रत्येक शहरात पोहोचलेले अस्सल कोकणी व्यक्तिमत्त्व आहे.
भारतात डोळ्यांच्या उपचारांसह जगभरात मल्टिस्पेशालिटी स्वरूपाची किमान सव्वादोनशे हॉस्पिटल्स उभी करणाऱ्या डॉ. ठाकूर यांचा बांगलादेश, श्रीलंका, बर्मा, थायलंड, आखाती देश, दक्षिण आफ्रिका आदी असंख्य देशांत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात विशेष सहभाग आहे. तळागाळातील माणसांपर्यंत लवकर पोहोचता येईल अशी वैद्यकीय क्षेत्रातली सेवा उभारण्याचा विचार करून त्यांनी महाराष्ट्रात ‘इन्फिगो आय केअर’ नावाने डोळ्यांच्या दवाखान्यांची शृंखला तयार केली आहे. आपल्याकडे डोळ्यांचे उपचार करणारे डॉक्टर संख्येने कमी आहेत. त्यातही अनुभवी डॉक्टरांची आवश्यकता आहे. पेशंट डॉक्टरबद्दल बोलतो तेव्हा अनुभव तयार होत जातो. अशी कठिणातली कठीण स्थिती हाताळण्याचा पुरेसा अनुभव असलेले गुणवान डॉक्टर हे त्यांच्या ‘इन्फिगो’चे वैशिष्ट्य आहे. या साऱ्या प्रयत्नातून ते रत्नागिरी जिल्ह्याची वैद्यकीय सुविधेतील गुणवत्ता उंचावण्याचाही प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या पंधराव्या हॉस्पिटलचं उद्घाटन रत्नागिरीत कोरोना काळात झालं होतं. मानवी शरीरातल्या एकूण ऊर्जेपैकी सर्वाधिक ऊर्जा डोळ्यांसाठी खर्च होत असते. डोळे इतके महत्त्वाचे असूनही डोळ्यांकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते. याचा विचार करून त्यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या ‘इन्फिगो’ची सेवा भविष्यात कोकणातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.
डॉ. ठाकूर हे मूळचे भांबेड (ता. लांजा, जि. रत्नागिरी) इथले रहिवासी आहेत. त्यांनी रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेत माध्यमिक शिक्षण घेतले आणि चिपळूणच्या डी. बी. जे. महाविद्यालयात १९८३साली उच्च महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या क्रमांकाने पूर्ण केले होते. पुढे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेमध्ये पाठविलेल्या शांतिसेनेतून वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी श्रीलंकेत जाण्याची संधी मिळाली होती.
जगभरातील आपल्या भ्रमंतीमधून नियमितपणे वेळ काढून डॉ. ठाकूर यांनी भांबेडमधील घराच्या आवारात बारा एकर जमिनीवर सुमारे सतराशेहून अधिक वेगवेगळ्या वनस्पती जोपासून वनस्पतिशास्त्राचे जागतिक संदर्भ असलेले उत्कृष्ट बोटॅनिकल गार्डन फुलविले आहे. मोजके अपवाद वगळले तर जगभरातील कोणत्याही वनस्पती कोकणात तग धरू शकतात, असे त्यांचे निरीक्षण आहे. स्वतःच्या वैयक्तिक ग्रंथालयात चाळीस हजार ग्रंथांचा संग्रह असलेले ग्रंथप्रेमी डॉ. श्रीधर ठाकूर हे पु. ल. देशपांडे, श्री. ना. पेंडसे, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार आदी लेखकांचे चाहते आहेत.
डॉ. ठाकूर म्हणतात, ‘माझं शिक्षण मला फारसं भावत नाही. माझं खरं शिक्षण मी डॉक्टर झाल्यानंतर झालेलं आहे. वैद्यकीय शिक्षणानंतर समाजात वावरत असताना मला जे ज्ञान मिळालं त्यातून आजचा ‘मी’ घडलेलो आहे. आपल्या आजूबाजूचे लोक समाजासाठी कसं काम करतात, हे आपण शिकत गेलो आणि तसं काम करू लागलो तर समाज आपल्याला स्वीकारतो. समाजाच्या दृष्टीने आपण मोठे होतो. मोठ्या माणसांची ही प्रतिमा समाजानेच तयार केलेली आहे. म्हणून आपण काय आणि किती शिकलो आहोत, यापेक्षा ठरावीक शिक्षणानंतर समाजात काम करताना डोळसपणे, ज्ञानेंद्रिये उघडी ठेवून वावरलो तर त्यातून खरे शिक्षण मिळते ते महत्त्वाचे असते. याच शिक्षणातून आपले बहुश्रुत व्यक्तिमत्त्व आकाराला येते. आपण हे जे समाजातून शिकतो त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून समाजाला होतो. महाविद्यालयीन शिक्षणाचा उपयोग आपल्याला स्वतःपुरता होतो.’
रत्नागिरीत तिसऱ्या-चौथ्या इयत्तेत शिकत असताना, खेळायच्या वयात नगर वाचनालयात जाऊन मुक्तद्वार विभागात दोन-दोन तास वाचनात घालवत असलेले डॉ. ठाकूर म्हणतात, की ‘घडण्याच्या वयात अकरावी-बारावीला चिपळूणला जगण्याची पहिली पायरी मी चढलो.’ त्यांच्यासोबतचा संवाद म्हणजे त्यांनी जगभरात फिरून मिळवलेल्या आणि अनुभवातून कमावलेल्या वैचारिक समृद्धतेचे दर्शन घडवणारा असतो.
कोकणातील वनस्पती आणि फळांपासून किती तऱ्हेचे रोजगार उपलब्ध होऊ शकतात? वाया जाणारी सर्व फळे आणि पिकांचा कोणता आणि कसा उपयोग होऊ शकतो? नवे रोजगार कसे निर्माण होऊ शकतात? कोकणात कोणते कारखाने काढता येऊ शकतात? कोकणात उत्कृष्ट बोटॅनिकल गार्डन हायवे कसे साकारता येतील, अशा अनेक विषयांवर मूलभूत चिंतन करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला ‘लोटिस्मा’ने ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्याचे निश्चित केले आहे.
‘लोटिस्मा’च्या वतीने माजी अध्यक्ष स्वर्गीय अप्पासाहेब जाधव यांच्या नावाने वाचनालयाने सुरू केलेल्या अपरान्त संशोधन केंद्रातर्फे हा ‘अपरान्त भूषण’ पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाने कोकणाचा नावलौकिक वाढविणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. यापूर्वीचे पुरस्कार नामवंत इतिहास संशोधक आणि डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे, माजी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांना प्रदान करण्यात आले आहेत. वाचनालयाच्या निवड समितीचे अध्यक्ष अरुण इंगवले, सदस्य चंद्रकांत राठोड, राष्ट्रपाल सावंत, अंजली बर्वे यांनी हा निर्णय घेतला आहे. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी ‘लोटिस्मा’चा हा पुरस्कार एका कीर्तिवंत ‘धन्वंतरी’ला देण्यात येत असल्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला आहे. पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच होणार असल्याचे वाचनालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
डॉ. ठाकूर यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा लेख वाचा पुढील लिंकवर….
https://kokanmedia.in/2020/11/19/drshridharthakur/
डॉ. ठाकूर यांची मुलाखत पाहा पुढील लिंकवर….
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

