इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या साखळीतील पंधराव्या हॉस्पिटलचं उद्घाटन रत्नागिरीत तीन महिन्यांपूर्वी झालं. मुंबईतल्या नेत्र रुग्णालयाच्या साखळीतलं एक हॉस्पिटल रत्नागिरीत सुरू झालं असलं तरी ते मूळच्या कोकणवासीयाने सुरू केलं आहे, हे त्याचं विशेष. हे वैशिष्ट्य जपणाऱ्या, रुग्णांना दृष्टी देणाऱ्या आणि औपचारिक तसंच अनौपचारिक संवादाद्वारे समाजालाही दृष्टिकोन देणारे इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या साखळीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांचा १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचं अभीष्टचिंतन!
डॉ. ठाकूर भांबेड (ता. लांजा) इथले मूळचे रहिवासी. त्यांच्याविषयी थोडीशी माहिती पाच-सहा वर्षांपूर्वी मिळाली होती. रत्नागिरीत कऱ्हाडे ब्राह्मण बिझनेस फोरमच्या उद्घाटनाच्या समारंभात त्यांनी केलेलं भाषण त्यांच्या जगभरातल्या संचारातून मिळालेल्या अनुभवातून आलेल्या त्यांच्या वैचारिक समृद्धतेचं दर्शन देऊन गेलं.
त्यांचा जन्म भांबेडमध्ये झाला. रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेत त्यांनी माध्यमिक, तर चिपळूणच्या डी. बी. जे. महाविद्यालयात उच्च महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या क्रमांकाने पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यावर्षी म्हणजे १९८३ साली कोकणात अतिवृष्टी झाली होती. वादळही झालं होतं. त्यामुळे जागोजागी रस्ते खचले होते. वाहतूक बंद पडली होती. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख टळून गेली. आवश्यक ती पात्रता असूनही त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेता आला नाही. पण डॉक्टर व्हायचं त्यांनी मनाशी आणि मनापासून ठरवून टाकलं होतं. अशा स्थितीत पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान झिया-उल्-हक यांना त्यांनी उर्दूतून थेट पत्र पाठवलं. तिथल्या एखाद्या महाविद्यालयात आपल्याला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश द्यावा, अशी त्यांना विनंती केली. त्याला उत्तर आलं.
भारतातल्या एखाद्या विद्यार्थ्याने वैद्यकीय शिक्षणासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहिण्याचं हे एकमेव उदाहरण असावं. अर्थातच भारतातून शिक्षणासाठी येणारा विद्यार्थी म्हणून त्यांना पाकिस्तानातल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी परवानगी मिळाली. पण आपल्या देशातला एक विद्यार्थी परदेशात, त्यातही पाकिस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाणार आहे, हे देशाच्या प्रतिमेला शोभणारं नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांना दिल्लीतल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. सनदी अधिकारी राम प्रधान यांच्यामुळे ते शक्य झालं. पुढे वैद्यकीय शिक्षण देशभरात प्रथम येऊन पूर्ण केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेमध्ये पाठविलेल्या शांती सेनेतून वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी श्रीलंकेत जाण्याची संधी डॉ. ठाकूर यांना मिळाली.
हा झाला त्यांच्या उमेदीचा काळ. त्यानंतर त्यांनी भारतातलं जवळजवळ प्रत्येक प्रमुख शहर पालथं घातलं. देशाच्या सीमा ओलांडून आफ्रिकेसारख्या देशात जाऊनही त्यांनी काम केलं. साडेतीनशेहून अधिक रुग्णालयं उभारण्याचा अनुभव त्यांनी कमावला. दोन वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सुरू केले. मुंबई आणि उपनगरांबरोबरच पालघर, विरार, इचलकरंजी इत्यादी ठिकाणी रुग्णालयं सुरू केली. पंधरावं रुग्णालय रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये सुरू झालं. आपण ज्या भागात शिकलो, त्या भागासाठी काहीतरी केलं पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी हे रुग्णालय सुरू केलं आहे. या जाणिवेचं बीज त्यांच्या लहानपणीच त्यांच्या मनात रोवलं गेलं. त्यांचे वडील लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयुर्विमा महामंडळात रत्नागिरीतले वरिष्ठ अधिकारी होते. ज्या काळात विमा एजंट दिसल्यानंतर त्याला टाळण्याची प्रवृत्ती होती, तेव्हा विमा किती आवश्यक आहे, हे खेडोपाडी पसरलेल्या तेव्हाच्या अखंड रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागरिकांना पटवून देण्याचं काम ठाकूर यांच्या वडिलांनी त्यावेळी केलं. डॉ. ठाकूर तेव्हा त्यांच्यासोबत अधूनमधून असायचे. अनेक वेळा त्यांच्याबरोबर डॉ. ठाकूर यांनाही पायी फिरावं लागलं.
त्या काळात कोकणात खऱ्या अर्थाने दुर्गमता होती. नद्यांवर आणि खाड्यांवर पूल नव्हते. होडीतून प्रवास करून पलीकडच्या गावी जावं लागत असे. रात्री होड्या चालविल्या जात नसल्याने ज्या गावात सायंकाळी होईल, त्याच गावात मुक्काम करावा लागत असे. महिन्याला शंभर रुपयेसुद्धा मिळण्याचा तो काळ नव्हता. या काळात लोकांना विम्याचं महत्त्व पटवून देण्याचं काम ठाकूर यांच्या वडिलांनी केलं. ते करत असताना डॉ. ठाकूर त्यांच्याबरोबर असल्यामुळे त्यांना सामाजिक, आर्थिक स्थितीची जाणीव झाली. पण तो तेव्हा केवळ अभ्यास होता. त्यावर काही आपण उपाय योजावा असं तेव्हा त्यांच्या डोक्यात आलं होतं का नाही, माहीत नाही. पण तेव्हा तो केवळ त्यांचा अभ्यास होता. निरीक्षण होतं. याच निरीक्षणातून आपल्या गावात हॉस्पिटल सुरू करायचं त्यांनी ठरवलं आणि ते गेल्या सप्टेंबरमध्ये प्रत्यक्षात आणलं.
रत्नागिरीतलं रुग्णालय सुरू झाल्यापासून ते रत्नागिरीतच आहेत. मुंबई आणि इतर भागातल्या आपल्या रुग्णालयांचा कारभार प्रामुख्याने रत्नागिरीतूनच हाताळत आहेत. आपल्या भागातल्या उणिवा, प्रथा, परंपरा, लोकापवाद आणि उपद्रवक्षमता यांची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळेच कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी ते स्वतः जातीनं रुग्णालयात ठाण मांडून बसले आहेत. जगभरात पाहिलेल्या, अनुभवलेल्या अद्ययावत सोयीसुविधा त्यांनी आपल्या रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या अडीच-तीन महिन्यांत समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी त्यांनी डोळे तपासण्याची मोफत शिबिरं आयोजित केली. रुग्णालयात आलेल्या अनेक लोकांकडून तपासणी शुल्क घेतलं गेलं नाही. रुग्णाच्या परिस्थितीचा विचार करून ही मोफत सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. मुख्य म्हणजे डोळ्यांच्या आजाराविषयी जनजागृती त्यांनी केली आहे.
भविष्यात कोकणातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. शरीरातल्या ऊर्जेपैकी सर्वाधिक ऊर्जा डोळ्यांसाठी खर्च होत असते, इतकं डोळ्याचं महत्त्व आहे. मात्र त्या डोळ्यांकडेच दुर्लक्ष केलं जातं. लहान मुलांमधला तिरळेपणा सुरुवातीलाच तपासला गेला आणि उपचार केले गेले, तर त्याचं आयुष्य बदलू शकतं. नोकरी, रोजगार, विवाहासह अनेक ठिकाणी डोळ्यांच्या समस्येमुळे आयुष्य अंधकारमय होऊ शकतं. मुख्यत्वे तरुणींचं त्यात मोठं नुकसान होत असतं. ही जाणीव ठेवून लोकांना डोळ्यांचं महत्त्व पटवून देण्याचं महत्त्वाचं कार्य ते करत आहेत. याशिवाय मधुमेहामुळे किंवा अन्य कारणांमुळे डोळ्यांना पोहोचणारे इजा, आळशी डोळे तसंच इतरही आजारांविषयीचं प्रबोधन त्यांनी चालविलं. आहे. डोळ्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी त्यांच्या या उपक्रमांमुळे रत्नागिरी जिल्ह्याला मिळत आहे.
हे सारं करत असतानाच रोजगारासाठी कोकणातल्या तरुणांना मुंबई-पुण्यात जावं लागू नये, यासाठी ते स्वतः प्रयत्न करत आहेत. आजपर्यंत कोकणातल्या सुमारे ८०० तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तो वेगवेगळ्या क्षेत्रातला आहे. कोकणात राहूनच आपल्याला रोजगार कसा मिळू शकतो, याची अनेक उदाहरणं त्यांनी घालून दिली आहेत. देशभरातल्या भ्रमंतीच्या काळात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशभरातले अनेक प्रमुख नेते, विविध पक्षांमधील पदाधिकारी, उच्च प्रशासकीय अधिकारी यांच्याशी त्यांचे स्नेहाचे आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. ते आजही ताजे असले, तरी त्याविषयीचा अहंभाव त्यांच्या वागण्यात, बोलण्यात लवलेशही आढळत नाही. अगदी सहजपणे ते कुणालाही भेटतात. त्याच्याशी गप्पा मारतात. त्या मारता मारता अनुभवाचे अनेक बोल सांगून जातात. नव्या माणसाच्या भेटीतून आपल्यालाही काही शिकायला मिळालं, असा त्यांचा भाव असतो, हे विशेष. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या, तेव्हा त्या संदेशाला त्यांनी दिलेलं,
Relationships are treasure of life and each birthday wish strengthens the relationships. I owe laught to each of you as you have enriched me at every moment we spend together.
हे उत्तरच त्यासाठी बोलकं आहे.
जगभरातल्या भ्रमंतीमध्ये वेगवेगळ्या दीड हजाराहून अधिक वनस्पती डॉ. ठाकूर यांनी स्वतःच्या भांबेडमधल्या घराच्या आवारात जोपासल्या आहेत. ठरावीक अपवाद वगळले तर जगभरातल्या कोणत्याही वनस्पती कोकणात तग धरू शकतात, हे त्यांचं निरीक्षण आहे. त्याचबरोबर कोकणातल्या वनस्पती आणि फळांपासून किती तऱ्हेचे रोजगार उपलब्ध होऊ शकतात, वाया जाणाऱ्या सर्व पिकांचा कोणता आणि कसा उपयोग होऊ शकतो, नवे रोजगार कसे निर्माण होऊ शकतात, कोणते कारखाने कोकणात काढता येऊ शकतात, याविषयीचं त्यांचं मोठं चिंतन आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक वक्तव्यात नवा विचार ते सहजपणे मांडून जातात. पण तो केवळ पुस्तकी किंवा सैद्धांतिक विचार नसतो. ते स्वानुभवाचे बोल असतात. म्हणूनच डोळ्यांच्या उपचारांच्या रूपाने दृष्टी देणारे डॉक्टर ठाकूर त्यांच्या विचारांमधून नवा दृष्टिकोनही देत असतात. कोकणासाठी तर तो अत्यंत उपयुक्त आहे. कोकणाने त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांच्या नेत्रोपचारातून तशी नवी दृष्टी कोकणाला लाभावी, ती दृष्टी त्यांनी दीर्घकाळ द्यावी, याच द्रष्टे डॉक्टर श्रीधर ठाकूर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा!
- प्रमोद कोनकर
👍👍👍