रत्नागिरी : पतंजली योग समितीतर्फे आज येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासनातर्फेही योग दिन साजरा करण्यात आला.
पतंजली योग समिती आणि परिवारातर्फे नववा जागतिक योग दिन कार्यक्रम माळनाका येथील देसाई बॅंक्वेट्स येथे आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शेकडो लोकांनी सहभाग घेतला. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा न्याय प्राधिकरणाचे चेअरमन विनायक जोशी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अधिवक्ता परिषद आणि जनशिक्षण संस्थानने कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
यावेळी न्या. जोशी म्हणाले, भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो; शिवाय मानसिक ताणतणाव, भावनिक चढउतार, चित्त स्थिर राहते. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. आत्मा, परत्म्याचा योग असाही त्याचा संबंध आहे. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा.
याप्रसंगी महिला पतंजली योग समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमाताई जोग म्हणाल्या, योग करणारे करोना काळात वाचले. त्यामुळे योगाचे महत्त्व जगाला पटले. त्यामुळे योग करण्यासाठी लोक मागे लागले आहेत. हजारो वर्षांपासून भारतात योग आहे. भारतीय संस्कार, ऋषींची मोठी परंपरा आहे, हे अनंत ज्ञान आहे, ते सर्वांनी आचरणात आणण्याची गरज आहे. ब्राह्म मुहूर्तावर उठावे, त्यावेळी ऑक्सिजन पातळी जास्त असते. नियमित योग करावा. म्हणजे तंदुरुस्त राहाल. ज्याचे शरीर निरोगी आहे, तो १८ तास काम करू शकतो. तो कधी उपाशी राहणार नाही. एकावर एक अवलंबून गोष्टी आहेत. पहाटे लवकर उठावे आणि घरातही सवय लावावी. सूर्योदयानंतर कोणाचेही अंथरुण दिसता कामा नये, असे आजोबा सांगत. योग ही जीवनपद्धती आहे. ती सर्वांनी अमलात आणावी. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीतासुद्धा आज आचरणात आणली पाहिजे. जेव्हा अर्जुन हताशपणे बसला होता, तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की, धर्माचे रक्षण करण्यासाठी उभा राहा. समोर कोण आहे ते पाहू नकोस. केवळ तू योगी हो. योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण योगामुळे आपण अनेक आजार, शस्त्रक्रिया टाळू शकतो. मेरुदंडाची शस्त्रक्रिया मी टाळू शकले. त्यामुळे सर्वांनी योग करून उत्तम आरोग्य लाभेल.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बाबासाहेब नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, विविध आसनांची प्रात्यक्षिके दाखवली. त्यांना गुरुकुल प्रमुख किरण सनगरे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांना पतंजलीतर्फे खाऊ देण्यात आला. त्यानंतर जागतिक योगदिनानिमित्त विविध आसने योगशिक्षक भारत सावंत आणि युवा शिक्षक प्रणव जोग आणि हर्षदा दुधाळ यांनी दाखवली. पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्यानंद जोग यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी योगाचे महत्त्व सांगत, निरोगी आयुष्यासाठी, मनुष्यजन्म सार्थकी लावण्यासाठी योग अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश (क्रमांक एक) अनिल अंबाळकर, जिल्हा मुख्य न्याय दंडाधिकारी राहुल चौत्रे, दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव निखिल गोसावी मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्योजक भाऊ देसाई, अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये, तसेच न्यायिक अधिकारी उपस्थित होते. पतंजली किसान सेवा समिती भारत सावंत, महिला पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी सौ. संगीता कुलकर्णी, योगशिक्षक अमृतभाई पटेल यांनी मान्यवरांचा सत्कार केला. योग शिक्षक अनंत आगाशे यांनी सूत्रसंचालन केले. अधिवक्ता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य अॅड. प्रिया लोवलेकर यांनी आभार मानले. स्वरदा लोवलेकर हिने संपूर्ण वंदे मातरम म्हटल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
पतंजली योग समितीच्या योग दिनाची क्षणचित्रे





दैनंदिन जीवनशैलीत योगाची नितांत गरज – जिल्हाधिकारी
आजच्या बदलत्या ताणतणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योग करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा प्रशासन, केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, आरोग्य स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करावीत. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
जिल्हा क्रीडा संकुलात अधिकारी, कर्मचारी आणि शाळांमधील विद्यार्थी यांनी एक तास योगासने केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, परिवीक्षाधीन आयएएस अधिकारी श्रीमती जास्मिन, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कऱ्हाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर आदी उपस्थित होते.
देव, घैसास, कीर महाविद्यालयात योग दिन
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग , महिला विकास कक्ष, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नववा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात योग, त्याचे महत्त्व, योगाचे आरोग्याच्या दृष्टीने होणारे शारीरिक आणि मानसिक उपयुक्त परिणाम तसेच योग अभ्यास, योग क्षेत्रातील करिअर संधी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख सौ. ऋतुजा भोवड यांनी विद्यार्थ्यांना ॐकार साधना, आसन, प्राणायाम या योगप्रकारांची माहिती, महत्त्व आणि फायदे सांगून त्याची विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले.
यावेळी उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. सोनाली जोशी, डीएलएलई विभागप्रमुख प्रा. दीप्ती कदम, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्राजक्ता राड्ये यांनी आभार मानले.
Follow Kokan Media on Social Media

