Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कलांगण, स्वराभिषेकच्या मैफलीत युवा गायकांचे बहारदार शास्त्रीय गायन

Advertisements

रत्नागिरी : कलांगण (मुंबई) आणि स्वराभिषेक (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर शास्त्रीय मैफल पार पडली.

ज्येष्ठ संगीत समुपदेशक, संगीतकार वर्षा भावे यांचे शिष्य अथर्व कंठी, सौम्या क्षीरसागर यांच्यासह सौ. विनया परब यांच्या शिष्या मीरा सोवनी आणि ऋग्वेदा हळबे यांनी बहारदार गायन सादर करून रसिकांची मने जिंकली.

मीरा सोवनी हिने विलंबित एकतालात बद्ध राग पूरिया धनाश्रीने मैफलीची सुरवात केली. त्यानंतर सौम्या क्षीरसागरने राग मुलतानी, ऋग्वेदा हळबे हिने राग यमन मधील छोटा ख्याल सादर केला. अथर्व कंठी याने मालकंस रागातील बडा ख्याल व तराणा सादर करून मैफलीची सांगता केली. त्यांना महेश दामले, मंगेश मोरे आणि तन्वी मोरे यांनी संवादिनीसाथ, तसेच केदार लिंगायत व राजू धाक्रस यांनी तबलासाथ केली. महेंद्र पाटणकर यांनी निवेदनातून सादर केलेल्या रागांची थोडक्यात माहिती दिली. कलांगणचे कलाकार कंठी, क्षीरसागर आणि सौ. भावे यांना स्वराभिषेकतर्फे सौ. विनया परब यांनी भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यासाठी कोकणमेवा उत्पादक योजक यांचे सहकार्य लाभले.

जागतिक कीर्तीचे संवादिनीवादक पंडित अजय जोगळेकर यांची मैफलीला विशेष उपस्थिती लाभली. रत्नागिरीतील युवा तबलावादक केदार लिंगायत यांनी नुकतीच विशारद ही पदवी संपादन केल्याबद्दल पं. जोगळेकर यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यावेळी स्वराभिषेकचे विद्यार्थी, पालक यांच्यासह संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राकेश बेर्डे यांनी उत्तम ध्वनिसंयोजन केले, तर प.पू. गगनगिरी महाराज आश्रमाचे राम पानगले यांनी मोलाचे सहकार्य केले.

सौ. भावे यावेळी म्हणाल्या की, सध्याची मुले सुगम संगीत चांगले गातात; पण शास्त्रीय संगीताकडे वळायला कचरतात. ते स्वाभाविकच आहे. शास्त्रीय गायनात स्वतःचा असा एक वेगळा विचार असावा लागतो, मांडावा लागतो. त्यासाठी प्रचंड मेहनत लागते. त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, अभ्यास, रियाज याची वानवा आहे. शाळा-कॉलेजेसमधल्या अभ्यासातून शास्त्रीय गायन जोपासणे सोपे नाही. यातूनच शास्त्रीय संगीताची देवाणघेवाण करण्याची संकल्पना पुढे आली. कलांगण (मुंबई) आणि स्वराभिषेक (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई आणि रत्नागिरी अशा दोन्ही ठिकाणी विशेष शास्त्रीय मैफिलीचे आयोजन केले आहे. यामध्ये रत्नागिरी आणि मुंबई येथील शास्त्रीय गायक विद्यार्थी एकत्रित सादरीकरण करतात. त्यामुळे त्यांना आपल्या आणि इतर शहरातील रंगमंचावर गायनाचा अनुभव मिळतो. त्यातून अनेक विद्यार्थी प्रेरित होऊन अधिक मेहनतीने या उपक्रमात सहभागी होतील, विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताची अधिक गोडी लागेल, याची खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शास्त्रीय गायन करताना मीरा सोवनी, सौम्या क्षीरसागर, ऋग्वेदा हळबे आणि अथर्व कंठी. सोबत तबलासाथीला राजू धाक्रस, संवादिनीसाथ महेश दामले, तानपुरासाथ ऐश्वर्या सावंत आणि निवेदन करताना महेंद्र पाटणकर.
Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version