रत्नागिरी : भारतातील विविध भाषांमधील साहित्य अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवादित होणे अत्यंत खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदी मराठी साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि निवृत्त शिक्षक सुभाष दत्तात्रय भडभडे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या नियोजित रत्नागिरी जिल्हा शाखेने स्व. आमदार सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या व्यास पौर्णिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठीसह, कन्नड, हिंदी, संस्कृत आणि संगमेश्वरी बोलीतून विविध साहित्यिकांनी आपले विचार व्यक्त केले. हिंदीतून बोलताना श्री. भडभडे पुढे म्हणाले, मामा वरेरकर यांनी बंगालीतील साहित्याचे मराठीत भाषांतर केले होते. वि. स. खांडेकर यांच्यासह अनेक मराठी साहित्यिकांनी अन्य भारतीय भाषांमधील वाङ्मय मराठीत अनुवादित केले. त्यामुळे त्या त्या भागातील भाषेचे आणि तेथील संस्कृतीचे दर्शन घडत असते. साने गुरुजींनी मांडलेली आंतर भारतीची तीच संकल्पना होती.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी राजेंद्र कदम यांनी अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या चळवळीला शुभेच्छा दिल्या. कोमसापच्या रत्नागिरी तालुकाध्यक्ष सौ. तेजा मुळ्ये यांनी सांगितले की कोमसाप अखिल भारतीय साहित्य परिषदेला जरूर तितके सहकार्य नक्कीच करेल. साहित्यातील आणखी एक चळवळ रत्नागिरी सुरू झाली, ते स्वागतार्ह आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेच्या पदाधिकारी सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी कन्नडमधून विचार व्यक्त करताना आपल्या साहित्यसेवेची माहिती दिली. कन्नडमधील बोलीभाषा आणि वडार संस्कृतीविषयीचे लेखन मराठीतून पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गुरू देवदत्त विनायक दांडेकर यांनी आपल्या घरी येऊन आपल्याला शिकायला प्रवृत्त केल्यामुळे आणि त्यांच्या संस्कारांमुळेच माझी जडणघडण झाली, असे विजयकुमार रामचंद्र देवगोजी यांनी सांगितले. त्यावेळी ते अत्यंत भावुक झाले होते.
सौ. मेघा कुलकर्णी-कोल्हटकर यांनी शाळा- महाविद्यालयीन जीवनात कोल्हापूर येथे आपल्यावर गुरूमुळे झालेले वाचनाचे संस्कार पुढल्या आयुष्यात कसे उपयुक्त ठरले, हे सांगितले. मिलिंद कोल्हटकर यांनी ब्लॉग, फेसबुक आणि अन्य सोशल मीडियाचा वापर करून साहित्याची देवाणघेवाण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कवी प्रतीक कळंबटे यांनी सांगितले की, भाषेमुळे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते. ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी भारतीय भाषा शिकून घेतल्या आणि नंतर त्यांनी भारतावरच राज्य केले. मातृभाषेतून घेतलेले प्राथमिक शिक्षण अत्यंत उपयुक्त ठरते, असे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितले होते. तोच आदर्श सर्वांनी ठेवला पाहिजे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. हापूस आंब्याचे आत्मवृत्त ही कविता त्यांनी बहारदार पद्धतीने सादर केली.
शालेय जीवनात स्वामी स्वरूपानंदांचा सहवास आपल्याला लाभल्याचे पत्रकार अरविंद कोकजे यांनी सांगितले. स्वामींनी बाराखडीची अक्षरे आपल्या हाताला धरून गिरवून घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली. स्वरूपानंदांनी लिहिलेल्या अभंग ज्ञानेश्वरीच्या निर्मितीच्या काळात त्यांचा सहवास लाभल्याने चांगले संस्कार झाल्याचे त्यांनी नमूद केले.
लेखक आणि नाट्यकर्मी अनिल दांडेकर यांनी सांगितले की, ब्लॉग आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियामुळे लेखकांची संख्या वाढली आहे. आपले साहित्य आणि कला घेऊन स्वतःला प्रकाशात आणण्याचे ते एक मोठे साधन झाले आहे. सोशल मीडियावरील कौतुकाचे अंगठे मिळाले की लेखक खूप धन्य होतात. पण खऱ्या लेखकांची वानवा आहे. लेखनाची अनुभूती येईनाशी झाली आहे. मानवी मन आणि साहित्य याचा संबंध साहित्याच्या बाबतीत दुरावतो आहे. त्यासाठी साहित्यिक निर्माण करण्याचे काम अखिल भारतीय साहित्य परिषदेने करावे.
सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाचे प्रमुख कार्यवाह श्रीकृष्ण साबणे म्हणाले की मी ग्रंथालय चळवळीतला एक कार्यकर्ता आहे. गेली ५३ वर्षे ग्रंथालयाच्या क्षेत्रात काम करत आहे. ही एक गुरुसेवाच आहे, असे मी मानतो.
कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाचे तसेच जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विश्वनाथ बापट यांनी अखिल भारतीय साहित्य परिषदेकरिता वाचनालयाचे सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. ते म्हणाले की, सर्व भारतीय भाषा संस्कृतपासून आणि नंतर प्राकृतपासून निर्माण झाल्या आहेत. संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे. त्यामुळे सर्व भारतीय भाषा भगिनी आहेत. त्यामध्ये एकमेकांविषयी द्वेष भावना असू नये. प्रत्येकाला अधिकाधिक भारतीय भाषा अवगत असल्या पाहिजेत. .त्यासाठीच भारतीय साहित्य परिषदेत काम करत आहे, असे मला वाटते.


ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण मीडियाचे प्रमोद कोनकर यांनी अखिल भारतीय साहित्य परिषदेविषयीची माहिती प्रास्ताविकात दिली. परिषदेच्या जिल्हा शाखेची जुळवाजुळव सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

