Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

लोकमान्य टिळक म्हणजे निष्ठावान व्यक्तिमत्त्व : श्रीनिवास पेंडसे

Advertisements

रत्नागिरी : लोकमान्य म्हणजे निष्ठावान व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन श्रीनिवास पेंडसे यांनी केले.

येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘अलौकिक लोकमान्य टिळक’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ते म्हणाले, समाजाला एकत्र आणण्याचे काम ज्यांनी आपल्या लेखणीतून, विचारातून केले, असे अलौकिक व्यक्तिमत्त्व लाभलेले, दीपस्तंभाप्रमाणे अनेकांचे दिशादर्शक आणि प्रेरणास्रोत असलेल्या लोकमान्यांचे विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत. ते नेहमीच विद्यार्थिदशेत राहण्याबाबत आग्रही होते. विद्यार्थ्यांमध्येच रममाण होण्यात आनंद मानणारे, कर्मयोगी, दूरदृष्टी असणारे, भारतीय संस्कृतीचे प्रचारक, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी पत्रकार, हाडाचे शिक्षक अशा अनेक उपाधी असलेले लोकमान्य खऱ्या अर्थाने लोकमान्य होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. देशाच्या उभारणीसाठी माणसे तयार करणे, त्यांचा प्रेरणास्रोत बनण्याची अलौकिकता लोकमान्यांकडे होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते कसे टिकेल, यासाठी लोकमान्य नेहमीच प्रयत्नशील होते. लोकमान्य टिळकांचे अशा प्रकारचे अलौकिकत्व, स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अनेक घटना आणि घडामोडींनी भरलेले होते. अनेक व्यक्तींचे संदर्भ देत श्री. पेंडसे यांनी लोकमान्यांचे व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांना उलगडून दाखविले. शिक्षणाबरोबरच कौशल्ये विकसित केली पाहिजेत, याची बीजे लोकमान्यांच्या विचारात दिसतात, याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पी. पी. कुलकर्णी यांनी बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकमान्य टिळकांचे विचार भावी पिढीला प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. लोकमान्यांच्या कार्याचा, आदर्शाचा आपण सर्वजणांनी वारसा चालवू, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमात विशेष पारितोषिके तसेच आदर्श विद्यार्थी पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. लोकमान्य टिळक पारितोषिक प्रथम वर्ष विज्ञान शाखेच्या शिवम राजन कीर याने मिळविले. कै. प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक द्वितीय वर्ष विज्ञान शाखेच्या मुस्कान जोहर चिकटे आणि तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या जान्हवी नीलेश वैशंपायन यांनी मिळविले. कै. गणेशशास्त्री घाटे पारितोषिक तृतीय वर्ष कला शाखेच्या अपूर्वा अंबादास मुसळे या विद्यार्थिनीने पटकाविले. यावर्,चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार एनसीसी कॅडेट विद्या विजय टेरवणकर या विद्यार्थिनीने पटकावला. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन गटात निधी अतुल बडे, ईशा जयराम सावंत, अथर्व संदेश तेंडुलकर आणि श्रावणी विश्वास पवार यांनी गुणानुक्रमे यश मिळविले. वरिष्ठ महाविद्यालयीन गटात मनस्वी नाटेकर, वर्षा काळे, ओंकार आठवले आणि कल्पजा जोगळेकर व सेजल मेस्त्री यांनी यश मिळविले.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version