रत्नागिरी : येथील पत्रकारांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतागृहांची स्वच्छता केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व खातेप्रमुखांना जिल्हाधिकाऱ्यांच्या झाडाझडतीला सामोरे जावे लागले.
शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा रत्नागिरीत फज्जा उडाला असून, प्रशासकीय इमारतीमधील दुर्गंधीने कळस गाठल्याने पत्रकारांना झाडू हातात घेण्याची वेळ आली. त्याची छायाचित्रे जिल्हाधिकार्यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर पडताच जिल्हाधिकार्यांनी सर्व खातेप्रमुखांची चांगलीच झाडाझडती घेतली. तहसीलदार कार्यालयातील स्वच्छतागृह पत्रकारांनी झाडू हातात घेऊन साफ केल्याने प्रशासनाला मात्र मान खाली घालण्याची वेळ आली.
गेले अनेक दिवस रत्नागिरीतील तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या स्वच्छतागृहाचा विषय चर्चेच झाला आहे. येणार्या-जाणार्या प्रत्येक अभ्यागताला नाक मुठीत धरून त्या इमारतीत प्रवेश करण्याची वेळ आली होती. तहसीलदार कार्यालयासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यटन विभाग तसेच इतर कार्यालये या इमारतीत आहेत. ग्रामीण भागातून येणारे अनेक व्यक्ती कामानिमित्त या कार्यालयांमध्ये येत असतो मात्र गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून तहसिल कार्यालयाच्या इमारतीत असलेले स्वच्छतागृह सार्यांनाच त्रासदायक ठरले होते.
या स्वच्छतागृहाची स्वच्छता नियमित व्हावी यासाठी वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्या तरीदेखील प्रशासनाला जाग आली नाही. अखेरीस मराठी पत्रकार परिषदेने अनोखी मोहीम हाती घेतली. आज सकाळी अनेक पत्रकार हातात झाडू, फिनेलचे कॅन घेऊन तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीत दाखल झाले. त्यावेळी पालिकेची पाण्याची गाडीदेखील पत्रकारांनी बोलावून घेतली होती. तेथील स्वच्छतागृहाची झालेली दयनीय अवस्था अवघ्या काही मिनिटांत पत्रकारांनी बदलून टाकली.
तीन स्वच्छतागृहांची साफसफाई करून पूर्वीची स्वच्छतागृहे, पत्रकारांकडून सुरू असलेली स्वच्छता आणि सफाई झाल्यानंतरची स्वच्छतागृहे यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतली. त्यांनी सर्व खातेप्रमुखांची तातडीची बैठक बोलावली. स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. प्रत्येक खातेप्रमुखाने आपल्या इमारतीत असलेल्या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी एजन्सीमार्फत सफाई कर्मचारी नियुक्त करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. भूमि अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागे असणार्या शौचालयात दारूच्या बाटल्या सापडल्याने जिल्हाधिकार्यांनी संबंधित खातेप्रमुखांची चांगलीच कानउघाडणी केली.
दरम्यान, या स्वच्छता मोहिमेची दखल पालकमंत्री उदय सामंत यांनीही घेतली. त्यांनी प्रशासकीय अधिकार्यांना स्वच्छतेबाबत निर्देश दिले. पत्रकारांनी हातात झाडू घेणे हे डोळ्यांत अंजन टाकण्यासारखे असून, असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.




