रत्नागिरी : मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून २० हून अधिक पत्रकारांचा प्रत्येकी ५ लाखाचा अपघात विमा रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून काढण्यात आला.
दिवसरात्र समाजाच्या घडामोडी टिपण्यासाठी धावपळ करणाऱ्या पत्रकारांना आरोग्याच्या दृष्टीने शासनाकडून अपेक्षित लाभ मिळत नाही, त्यांचा अपघात झाला तर आर्थिक मदतीचा अभाव असतो. लोकांना मदत मिळवून देणारा पत्रकार मात्र अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहतो, ही बाब लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरी तालुका शाखेकडून प्रत्येकी ५ लाखांची पॉलिसी काढून देण्यात आली. पत्रकार विविध अडचणीत असतानाही समाज जनजागृती व समाजाच्या जडणघडणीत योगदान करत असतो, अशा सर्व पत्रकारांना अपघात विमा पॉलिसी मिळावी म्हणून हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले उपस्थित होत्या. पत्रकारांना शासकीय रुग्णालयात मोफत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पत्रकारांना जिल्हा रुग्णालयात पूर्णपणे मोफत उपचार देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्राधान्याने लक्ष घालून उपचार केले जातात. पत्रकार नेहमीच शासकीय रुग्णालयाच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करत असतात. त्याचबरोबर समाजातील कामांमध्येही पत्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असून आरोग्याच्या बाबतीत पत्रकारांनी सजग राहावे. अपघात विमा पॉलिसी काढून एक चांगला आदर्श तालुका मराठी पत्रकार परिषदेने घातला आहे, असेही त्या म्हणाल्या.
रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष आनंद तापेकर यांची पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदमार्फत त्यांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
मराठी पत्रकार परिषद राज्य प्रतिनिधी जान्हवी पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण देवरूखकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, तालुकाध्यक्ष आनंद तापेकर, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष मुश्ताक खान, सचिव जमीर खलफे, प्रणील पाटील, सतीश पालकर, मनोज लेले, प्रणव पोळेकर, प्रशांत पवार, अमोल मोरे, रहीम दलाल, अजय सावंत, केतन पिलणकर, समीर शिगवण, अमोल डोंगरे, नीलेश कदम, प्रशांत हर्चेकर आदी यावेळी उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media

