आज ६ जानेवारी. याच दिवशी १८३२ साली आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांनी बॉम्बे दर्पण हे मराठी-इंग्रजी द्वैभाषिक वृत्तपत्र सुरू केले. त्याची आठवण म्हणून मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. अनेक वेळा सूचना करूनही या दिवसाचा उल्लेख अगदी शासकीय जाहिराती, निवेदने आणि फलकांमध्ये बाळशास्त्रींची जयंती असा केला जातो. मराठी पत्रकारितेचे आद्य जनक म्हणून त्यांचे नाव घेणाऱ्या अनेक पत्रकार संघटनाही तसा उल्लेख स्वतःच करतात. काही पत्रकार आणि संघटना तर ६ जानेवारी हीच बाळशास्त्रींची जयंती असल्याचे शासनमान्य झाल्याने आपणही तसाच उल्लेख करतो, असा युक्तिवादही करतात. त्यामुळे शासनाकडून योग्य ती दुरुस्ती करून घेण्याची अपेक्षा त्यांच्याकडून करता येत नाही. आपल्याला जे गुरुस्थानी आहेत, त्यांच्या जन्मतारखेविषयीच ज्यांना काही वाटत नाही, त्यांच्याकडून या जनकाला अभिप्रेत असलेल्या पत्रकारितेद्वारे लोकशिक्षण प्रबोधनाच्या ध्येयाविषयी कितीसे गांभीर्य असणार?
ते असो. पण पत्रकार दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जाईल. ज्येष्ठ पत्रकारांचा, वेगळे काम करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार होईल. काही संघटनांकडून तर त्यापुढे जाऊन सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार होईल. मिठाई, फळवाटपाचे कार्यक्रम होतील. ते खूप चांगले उपक्रम असतील. पण पत्रकारितेचे जे मूळ कार्य आहे, त्याकडे दुर्लक्ष करून असे उपक्रम राबविण्याची काही आवश्यकता आहे, असे नाही. कारण समाजमाध्यमांचा प्रचंड प्रसार झाल्यामुळे पत्रकारिता आता सार्वत्रिक झाली आहे. स्मार्ट फोन हाती असलेली प्रत्येक व्यक्ती पत्रकार झाली आहे. माहिती आणि छायाचित्रे सहजपणे प्रसारित केली जातात आणि अल्पावधीत त्या सर्वत्र फोफावतात (व्हायरल होतात). त्यामुळे माहिती देणे हे पत्रकारितेचे काम केवळ पत्रकारांचे राहिलेले नाही. म्हणूनच पत्रकारिता धोक्यात आली आहे, असे सांगितले जाते. ते काही प्रमाणात खरे आहे. पण केवळ माहिती आणि मनोरंजन हे पत्रकारितेचे कार्य नाही. पत्रकारांना समाजाचे शिक्षक मानले जाते. समाजाला दिशा काम पत्रकारितेने करणे अपेक्षित असते. त्याचा आता विसर पडल्यात जमा आहे. त्याला आर्थिक बाजू हे महत्त्वाचे कारण आहे.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम होतील. राजकीय नेते पत्रकारांच्या व्यासपीठावर असणे अपरिहार्य असल्याचे पत्रकारांनाच वाटत असल्याने ते व्यासपीठ गाजवतील. पत्रकारितेची भलामण करतील. लोकशाहीचा चौथा स्तंभ किती आवश्यक आहे, ते पत्रकारांनाच पटवून सांगतील. त्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याची ग्वाही देतील आणि त्या ग्वाहीशी ठाम राहून पुढच्या वर्षीच्या पत्रकार दिनाला पुन्हा तीच ग्वाही द्यायला सज्ज होतील. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला, तरी त्यात काम करणाऱ्यांना अन्य तीन स्तंभांप्रमाणे आर्थिक शाश्वती आणि भवितव्य राहिलेले नाही. पत्रकारितेच्या व्रताचे केव्हाच व्यवसायात रूपांतर झाले आहे. पण त्यात वावगे काही नाही. तंत्रज्ञानातील पत्रकारितेला आवश्यक मूलभूत सोयीसुविधांसाठी आर्थिक पाठबळ असावे लागते. त्यामुळे व्यावसायिकीकरणाला पर्याय नाही. परिणामी इष्ट तेच छापणार या बोधवाक्याशी फारकत घेऊन जे विकेल, तेच छापणार किंवा जे वाचले जाईल, तेच लिहिणार, प्रसारित करणार असे पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. माध्यमांचे वलय विकत घेण्याच्या राजकारण्यांच्या प्रवृत्तीमुळे चौथ्या स्तंभातील मोठ्या माध्यमांचे व्यवस्थापन राजकारण्यांच्या हातात. छोटी आणि स्वतंत्र माध्यमे जाहिराती किंवा अन्य स्वरूपात याच राजकारण्यांवर अवलंबून असतात. त्यामुळे अपरिहार्यपणे मिंधेपण येते. अवघे जग माहितीच्या बाबतीत मुठीत आल्यामुळे माध्यमांचा लोकाश्रय लोप पावत चालला आहे. त्यामुळे खरी पत्रकारिता मात्र दीन झाली आहे. तिचा विचार पत्रकार दिनाच्या निमित्ताने गांभीर्याने व्हायला हवा.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ६ जानेवारी २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – ६ जानेवारीचा अंक

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia6jan
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : पत्रकारितेची दीनता https://kokanmedia.in/2023/01/06/skmeditorial6jan/
मुखपृष्ठकथा : शतकोत्सवाचे बीजारोपण करणारा सुवर्णमहोत्सव : *अलोरे (ता. चिपळूण) येथील आगवेकर माध्यमिक विद्यालय आणि लाड कनिष्ठ महाविद्यालय सुवर्णमहोत्सवाचा सांगता समारंभ नुकताच पार पडला. त्याचा सविस्तर वृत्तांत…

