कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या पुरस्कारांचे आज वितरण

पद्मश्री परशुराम गंगावणे, सुषमा तायशेटे, राजेंद्र पराडकर यांची उपस्थिती

कणकवली : येथील कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टकडून विविध क्षेत्रातील व्यक्तींना आज, ७ जानेवारी रोजी होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता विद्यामंदिर हायस्कूलजवळील महाराजा हॉलमध्ये पुरस्कार वितरण, चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण पद्मश्री परशुराम गंगावणे, सुषमा तायशेटे, राजेंद्र पराडकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

कलातपस्वी आप्पा काणेकर यांनी आपले समग्र जीवन कलेसाठी समर्पित केले होते. त्यांच्या कलासहयोगाच्या स्मृती सदैव जागत्या ठेवाव्यात, या उदात्त हेतूने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ललितलेखक महेश काणेकर यांनी या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. त्यांच्या सहचारिणी ट्रस्टच्या विश्वस्त उपक्रमशील शिक्षिका उमा काणेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. कै. उमा काणेकर यांच्या शैक्षणिक योगदानाची प्रेरणा नव्या पिढीतील विद्यार्थी आणि शिक्षकांना मिळावी, यासाठी गेल्यावर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. या स्पर्धांचे बक्षीस वितरण पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव शिरसाट असतील. कार्यक्रमाचे उद्घाटन भारत सरकारच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे यांच्या हस्ते होणार असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार, संपादक प्रकाशक प्रकाश केसरकर हेही यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कारविजेते मान्यवर

यावर्षी कलातपस्वी आप्पा काणेकर स्मृती उपक्रमशील शिक्षक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीत स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, उत्तम निवेदक राजेश कदम यांना जाहीर करण्यात आला आहे. बालसाहित्य सेवा पुरस्कार प्रसिद्ध कवी कमलेश गोसावी यांना देण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील लेखक रमेश वारके यांना साहित्य गौरव पुरस्कार, अक्षरघर संकल्पक पुरस्कार तळेरे येथील निकेत पावसकर यांना, गेली ५० वर्षे कला क्षेत्रात निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या हळवल येथील भालचंद्र दशावतार नाट्य मंडळाला लोकसंगीत सेवा पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार रूपाली राजेंद्र पालकर यांना, उमा काणेकर स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार कुडाळ येथील सौ. दर्शना पारकर आणि आजरा येथील सौ. सुषमा गोवेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे वितरण आज होईल.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर, कार्याध्यक्ष प्रशांत काणेकर यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply