समतेची आरती गाऊन गणरायाला निरोप

खेड : हेदली (ता. खेड) येथील गोवळकर कुटुंबायांनी पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करून गणरायाला समतेची आरती गाऊन निरोप दिला.

हेदली गाव हे पुरोगामी गाव म्हणून ओळखले जाते. गणेशोत्सवातही गावाने परंपरेला साजेसे गणपतीविसर्जन केले. राज्य सरकारने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गणपतीचे विसर्जन नदी, तलाव, ओढे, समुद्रामध्ये न करता कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन केले आहे. महापालिका क्षेत्रात त्याची अंमलबजावणी करण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात लोक मात्र नदी, नाले, ओढे, समुद्र, यामध्ये विसर्जन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा मोडीत काढून गोवळकर कुटुंबीयांनी शाडू मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. गोवळकर कुटुंबीयांनी गणपतीच्या सजावटीमध्ये संविधानाची जनजागृती देखावा सादर केला होता. मूर्तीच्या विसर्जनाची माती आणि निर्माल्य झाडांना खत म्हणून देण्यात येणार आहे, अशी माहिती सुनील गोवळकर यांनी दिली.

हेदली ग्रामपंचायत सदस्य संजय गोवळकर यांनी पर्यावरणपूरक गणपती उत्सव ही काळाची गरज असून पर्यावरणाचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे मत व्यक्त केले.

आणखी एक विशेष म्हणजे समतेची आरती म्हणून गणरायाला निरोप देण्यात आला. या आरतीमध्ये पर्यावरण रक्षणचा संदेश दिला आहे. समाजामध्ये मानवतेने आणि बंधुभावाने राहावे, मानवतावाद आणि शोधक बुद्धी प्रत्येक नागरिकाने आचरणात आणली पाहिजे, असा संदेश या आरतीतून दिला गेला आहे. विशेष म्हणजे ही आरती बच्चे कंपनीलाही आवडली असून ती गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू ठरत आहे. आपली संस्कृती, परंपरा पर्यावरण रक्षण, सामाजिक बांधिलकीतून समानता टिकावी, हा या आरतीचा मुख्य हेतू आहे. समतेच्या आरतीतूनच नव्हे, तर उत्सवकाळात निर्माल्य नदीपात्रात टाकून पाणी प्रदूषण होत असते, प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा कसा करता येईल, याचेही महत्त्व पटवून दिले आहे. या अभिनव उपक्रमाची चर्चा होत आहे.

आरती समतेची

(चाल : येई वो विठ्ठले माझे माऊली ये )

यारे या जन सारे, आरती समतेची गाऊ

शिकवण बंधुत्वाची  SS आपुल्या मनोमनी रुजवू  || धृ ||

देश आमुचा विविधतेने जगात हा नटला

नाना रंगी फुले उमलली बाग जणू फुलला

देश उन्नतीसाठी SS सारे एकजूट होऊ             ||  1 ||

संत महात्मे या धरतीवर जन्माला आले

मानवतेचा मंत्र देऊनी अमरपदी गेले

विसरुन जाती पाती SS बंधुभावाने राहू           || 2  ||

थोराची वाचूनी चरित्रे मन आपुले घडते

अतुट  नाते समाज जिवनासवे इथे जडते

समतेचा शांतीचा SS   झेंडा चहुकडे मिरवू       ||  3 ||

विकसित होई विवेकबुद्धी विद्यार्जन करिता

ज्ञानासंगे कर्तृत्वाचे पाऊलही पडता

धडा सहजीवनाचा   विद्यामंदिरत गिरवू            ||  4 ||

उच्च कुळी जन्मला म्हणून का थोर कुणी ठरतो

विचार, करणी, आचारणाने जगी अमर होतो

समाजसेवेसाठी   सारे सज्ज आता होऊ        || 5  ||

(अधिक  माहितीसाठी – 9969045602)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply