दापोली : आजच्या (दि. २१ सप्टेंबर) गौरी आगमनदिनी दापोली तालुक्यातील केळशी पंचक्रोशीतील सुवासिनी स्त्रिया आणि कुमारिकांनी आतगाव रोडवरील पारंपरिक पाणवठ्यावर तेरडा वनस्पतीचे गौरीस्वरूप आवाहन केले आणि गौराईच्या आगमनाप्रीत्यर्थ वाजत-गाजत मिरवणूक काढली.
निसर्गसुंदर कोकणाने गणपती आणि त्यांची आई गौराई यांना निसर्गदेवता मानले आहे. कोकणी आसमंतात तेरडा फुलायला लागला की गौरी-गणपतीचे दिवस जवळ आल्याचे मानले जाते. गौरीचे वास्तव्य पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांजवळ असते.
कोकणातील अनेक गावांत गौरी आगमनासाठी डोक्यावरील रोवळीत किंवा सुपात हळद, तेरडा, आघाडा यांचे रोपटे घेण्याची प्रथा आहे. तेरडा वनस्पतीची गौराई कोकणात बघायला मिळते. केळशी पंचक्रोशीत तेरडा रोपाला गौरीचे प्रतीक मानून आवाहन करण्यात येते. ज्येष्ठागौरी आवाहनानिमित्त आज सायंकाळी महिलांनी तेरड्याची रोपे मुळासकट काढून वाजत गाजत मिरवणुकीने आणली. तेरडा वनस्पतीची ही मुळे ही लक्ष्मीची पावले मानली जातात. पूजनासाठी तेरड्यापासून सुंदर गौराई साकारण्यात येते. तेरड्याचा वापर श्रीगणेशाच्या माटोळीतही केला जातो. देवी गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून तिला ज्येष्ठागौरीही संबोधले जाते. गौरीचा मुखवटा, हात, तिरडे, बांबू दागदागिने, कपडे घालून गौरीला अतिशय आकर्षक रूपात सजविले जाते. तेरडा रोपट्यांची, विड्याची विधिवत पूजा आणि गौरी देवतेस आवाहन करण्यात आले. देवी गौराई आपल्या लाडक्या लेकाला बाप्पाला भेटावयास अवतरली आहे. या श्रद्धेने सर्वत्र गौरीपूजनाची तयारी होत असते.
परंपरेनुसार कोकणात गौराई पूजनासाठी बाजारातील विशेष पूजा-साहित्य आणावे लागत नाही. रानावनात आढळणारी फूलपत्री गौराईस प्रिय आहे. कोकणात माळरानी, डोंगरउतारावर, शेताच्या बांधावर जांभळी, फिक्कट गुलाबी, तांबड्या, पांढऱ्या रंगांची ही फुले सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. तेरड्याच्या फुलांचे आयुष्य पाच ते सात दिवस असते. सह्याद्रीतील काही भागात यंदा तेरडा जुलै-ऑगस्टमध्येच बहरला होता. हवामानातील बदल याला कारणीभूत असावा. पण हाच तेरडा ज्येष्ठागौरी बनून घराघरांमध्ये गणपतीच्या शेजारी विराजमान झाला आहे.




