बालसाहित्यकार श्रीकांत गावंडे स्मृति कथालेखन स्पर्धा

चिपळूण : शंभराहून अधिक पुस्तके लिहिणारे चिपळूणचे सुपुत्र सिद्धहस्त बालसाहित्यकार कै. श्रीकांत गोवंडे सर यांच्या स्मृत्यर्थ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे.

श्रीकांत गोवंडे

चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये गोवंडे सरांनी सुमारे ३४ वर्षे सेवा केली होती. गोवंडे सरांची शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी विविध विषयांवर ग्रंथ लेखन केले होते. विद्यार्थिप्रिय शिक्षक, नामवंत लेखक आणि संस्कृत भाषेचे गाढे व्यासंगी श्रीकांत प्र. गोवंडे यांच्या स्मृत्यर्थ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला दीड लाख रुपयांची देणगी त्यांच्या पत्नी श्रीमती मोहिनी गोवंडे यांनी दिली आहे. या देणगीच्या व्याजातून कै. श्रीकांत गोवंडे यांच्या नावाने परिसरातील लेखक-लेखिकांसाठी प्रतिवर्षी कथालेखन स्पर्धा घेतली जाते. त्यातून उत्कृष्ट कथालेखनाला तीन पारितोषिके देण्याचा निर्णय वाचन मंदिराच्या संचालक मंडळाने घेतला आहे. यापूर्वी श्रीमती गोवंडे यांनी दिलेल्या निधीतून ग्रंथालयाने गोवंडे सरांच्या नावे ध्वनिक्षेपक यंत्रणा घेतली आहे.

यावर्षीची कथालेखन स्पर्धा दोन गटांत आयोजित करण्यात आली असून चिपळूण तालुका मर्यादित आहे.

साहित्य निर्मिती करताना गोवंडे सरांनी विशेषतः बालवाचकांना नजरेसमोर ठेवून बहुतांश पुस्तके लिहिली आहेत. बाल, कुमार आणि युवा वाचकवर्गात ते अत्यंत लोकप्रिय होते. बालकथा आणि चरित्र या साहित्यप्रकारात त्यांनी विशेष लेखन केले. करमणुकीसोबतच प्रबोधन आणि संस्कार हा त्यांच्या लिखाणाचा मुख्य गाभा होता. वाचक म्हणून झालेल्या अनेकांच्या जडणघडणीत गोवंडे सरांच्या साहित्याचा मोठा वाटा आहे. अशा बहुआयामी लेखकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धा दोन विभागात असून पहिला विभाग “बालविश्व कथा” असा असेल. या विभागात बाल, कुमार, युवा वयोगटातील वाचकांना भावतील अशा त्यांच्या भावविश्वाशी जवळीक साधणाऱ्या संस्कारक्षम कथा असाव्यात, अशी अपेक्षा आहे. दुसरा विभाग हा मुक्त कथालेखन विभाग असणार आहे. यात आशय, विषय, वाचकांचा वयोगट असे कोणतेही बंधन असणार नाही. कोणत्याही विषयावरची मुक्त कथा या विभागात पाठवता येईल.

स्पर्धक चिपळूण तालुक्यातील असावा. एका स्पर्धकाला एका विभागात एकच कथा पाठवता येईल. कथा भाषांतरित, अनुवादित, रूपांतरित, आधारित असू नये. ती कथालेखकाची स्वतंत्र निर्मिती असावी. कथेच्या स्वामित्वहक्कांबाबत काही वाद निर्माण झाल्यास ती जबाबदारी संबंधित स्पर्धकाची असेल. पहिल्या पृष्ठावर डाव्या भागात कथा कोणत्या विभागासाठी आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख असावा. कथेची शब्दमर्यादा १५०० शब्द इतकीच असावी. स्पर्धकांनी कथेवर आपले नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक अशी कोणतीही माहिती लिहू नये. ती माहिती स्वतंत्र कागदावर लिहून ती कथेसोबत जोडावी. दोन्ही विभागातील स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक प्रत्येकी १५००, द्वितीय क्रमांक प्रत्येकी १०००, तृतीय क्रमांक प्रत्येकी ७०० आणि स्मृतिचिन्ह असे बक्षीसांचे स्वरूप असेल. बक्षीसपात्र कथा वाचनालयाच्या मृदंगी या त्रैमासिकात प्रकाशित करण्यात येतील.

स्पर्धकांनी आपल्या कथा ३० डिसेंबर २०२३ पर्यंत प्रत्यक्ष किंवा लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण, जि. रत्नागिरी ४१५६०५ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन वाचनालयाचे कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply