स्पर्धेत उतरून पतसंस्थांनी अर्थकारण गतिमान करावे- अॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : स्पर्धेत उतरून पतसंस्थांनी अर्थकारण गतिमान करावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे सहकार सप्ताहाचे औचित्य साधून सहकार कार्यकर्त्यांना स्वरूप सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या प्रमाणामध्ये भांडवल निर्मिती करू शकते त्याच प्रमाणात त्याच स्पर्धेला उतरून सहकार चळवळसुद्धा भांडवल निर्मिती करू शकते. प्रत्येकाने आपली बॅलन्सशीट नजरेसमोर आणली की लक्षात येईल. सहकाराची सामूहिक ताकद आहे आणि ही ताकद अशा पद्धतीने भांडवल निर्मितीसाठी उपयोगात आणली पाहिजे. विश्वासार्हता व उपयुक्तता, नवीन तंत्रज्ञान यांचा उपयोग करून अधिक प्रमाणात अर्थकारण गतिमान करावे.

अॅड. पटवर्धन म्हणाले की, आज ज्यांचे सत्कार झाले त्यांनी २५ ते ३० वर्षे सहकारात प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांचे योगदान सत्कारास पात्र आहे. आजचे सत्कारमूर्ती म्हणजे सहकार क्षेत्रामधली हिरेमाणके आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या पतसंस्था चळवळ स्पर्धेच्या युगामधून जात आहे. आर्थिक जीवघेण्या स्पर्धेमध्ये विश्वासार्हतेद्वारे टिकायचे असून आपली उपयुक्तता वाढवत अधिकाधिक ग्राहक संस्थेबरोबर जोडून अर्थकारण अधिक गतिमान करायचे आहे. गृहनिर्माण संस्थांचे जाळे महाराष्ट्रभर आहे. चळवळीचे भवितव्य हे आपल्या संस्कारावरच अवलंबून आहे. हाउसिंग सोसायटीचे युनिट उत्तम पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी संस्कार होऊन विचारमंथन होण्याची गरज आहे.

जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सोपान शिंदे म्हणाले की, सहकार सप्ताह साजरा करण्याची प्रथम जबाबदारी सहकारी संस्थांची, मातृसंस्थांची व फेडरेशनची आहे. पुढील वर्षापासून प्रत्येक संस्थेने सहकार सप्ताहात फलक लावावेत, ध्वजारोहण करावे. संचालक, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासह ग्राहकांनाही प्रशिक्षणाची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्र सहकारी संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांची प्रकर्षाने आठवण येते. ते प्रत्येक वर्षी सहकार दिंडी काढत, व्याख्यान देत, परिसंवाद घडवत. अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातही चळवळ वाढली पाहिजे. ज्या चळवळीने आपल्या रोजगार दिला, त्याची आठवण म्हणून सात दिवस सहकार सप्ताह पाळला पाहिजे.

कोकण विभाग पतसंस्था फेडरेशनचे संचालक संतोष थेराडे म्हणाले, अॅड. पटवर्धन यांनी सहकार चळवळीत सर्वांना प्रामाणिकपणे मदत केली आहे. जिल्ह्यात जो काही सहकार रुजला त्यात त्यांचे मोलाचे सहकार्य आहे. पतसंस्थांची वसुली असो वा नवीन काही परिपत्रक ते मार्गदर्शन करतात.
या वेळी पतसंस्थाचे सीईओ, सेक्रेटरी तसेच गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी अशा प्रातिनिधिक लोकांचा सन्मान करण्यात आला. व्यवस्थापक मोहन बापट यांनी सूत्रसंचालन केले. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे, संतोष प्रभू उपस्थित होते.

समारंभात सन्मानचिन्ह आणि तीन हजार रुपये असा सन्मान देण्यात आला. त्यांची नावे अशी – नागरी, ग्रामीण पतसंस्था- चंद्रशेखर रुमडे (लांजा नागरी पतसंस्था), अनिल विले (मुरली मनोहर पतसंस्था), रवींद्र थेराडे (शिववैभव पतसंस्था), रवींद्र मुंढेकर (भैरी भवानी पतसंस्था), कृतिका सुवरे (महिला पतसंस्था), पराग भाटकर (भंडारी हितवर्धक ग्रामीण पतसंस्था). पगारदार पतसंस्था- सुनील यादव (ग्रामीण डाकसेवक पतसंस्था), दत्ताराम कोकरे (हॉस्पिटल सेवक पतपेढी), नीलेश चिंगळे (किसान बॅंक), संजय चौधरी (एसटी पतसंस्था), संजय बारिंगे (हिवताप निर्मूलन कर्मचारी पतसंस्था). गृहनिर्माण संस्था- अनुप पेंडसे (रुपाजी हाउसिंग सोसायटी), सुधाकर सावंत (पारस प्लाझा सोसायटी), मिलिंद सावंत (घरकुल गृहनिर्माण संस्था), रघुनाथ गोरे (के. अॅंड एन. क्लासिक सोसायटी).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply