Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

भाट्ये सागर किनाऱ्यावरील सहलीने दिली संशोधनाची दृष्टी

Advertisements

रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आयोजित द्वितीय सागर महोत्सवात आज किनारा सहल निघाली. या सहलीने संशोधनाची दृष्टी दिल्याची प्रतिक्रिया सहभागी सहलकऱ्यांनी व्यक्त केली.

सागर महोत्सवाला कालपासून उत्साहात प्रारंभ झाला. यामध्ये आज दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते ९ या वेळेत भाट्ये किनाऱ्यावर आज सकाळी धुके आणि गुलाबी थंडी अशा प्रसन्न वातावरणात ही सहल निघाली. त्यात रत्नागिरीतील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींनी भाग घेतला. किनाऱ्यावरील जैवविविधतेचे डॉक्युमेंटेशन करून ठेवण्याची सूचना कोस्टल कॉंझर्वेशन फाउंडेशनचे अभ्यासक प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे यांनी केली. या सहलीत सरगॅसम, शेल बायंडर वर्म, सॅंड बबलर क्रॅबनी वाळूत केलेली बिळे, घोस्ट क्रॅब पाहायला मिळाले.

प्रदीप पाताडे म्हणाले की, मरीन लाइफ ऑफ मुंबई हे फेसबुक पेज आहे, त्यावर आम्ही आठवड्यातून एक फोटो अपलोड करतो. त्यावर तज्ज्ञ माहिती देतात. डॉक्युमेंटेशन फार महत्त्वाचे आहे. किनाऱ्यावर दिसणारे प्राणी आय नॅचरलिस्ट या अॅपवर अपलोड करा. हा डेटा अभ्यासासाठी उपयुक्त ठरतो. संशोधकांना एकाच वेळी माहिती मिळते. रत्नागिरीमध्ये अनेक समुद्रकिनारे आहेत. त्यांचा अभ्यास करणे शक्य आहे.

डॉ. अमृता भावे यांनी सांगितले की, सकाळी छान किनारा सफर झाली. जिवंत शिंपले, वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे, सी वीड प्रकारातील वॉशटॉक, लाटेबरोबर वाहून आलेले अल्गी, वेगवेगळ्या प्रकारचे शंख-शिंपले, वाळूचे प्रकार, छान छान पक्षीसुद्धा दिसले. सागर महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून यंदा प्रतिसाद वाढला आहे. भरती-ओहोटीचा परिणाम दिसणाऱ्या भागातून पाहणी केली. येथे वेगळी जैवविविधता पाहायला मिळते. इथले प्राणी येथे पाणी असो वा नसो, ते जगू शकतात. पांढरी वाळू, काळ्या वाळूचे किनारे रत्नागिरीत आहेत.

यावेळी आसमंतचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन, संचालक पुरुषोत्तम पेंडसे, नितीन करमरकर, श्रीप्रसाद देशमुख, जगदीश खेर, कमोडोर श्रीरंग जोगळेकर यांच्यासमवेत सागरविषयक अभ्यासक, संशोधक उपस्थित होते.

महोत्सवात शनिवारी, १३ जानेवारीला सकाळी ७ ते ८.१५ या वेळेत भाट्ये किनाऱ्यावर अभ्यास सहलीत प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे मार्गदर्शन करतील. त्यानंतर गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात ९.३० वाजता मरीन बायोटेक्नॉलॉजीवर डॉ. समीर डामरे यांचे व्याख्यान, ११.१५ वाजता कोरल्सवर डॉ. नाणजकर, २ वाजता खारफुटीची गुपिते या विषयावर डॉ. विनोद धारगळकर व्याख्यान देतील. १०.३० आणि १२.३० वाजता लघुपट दाखवले जातील. ३.१५ वाजता राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने बनवलेली सी बोट समुद्रात १५० फूट खाली गेली की तिच्यावरील कॅमेऱ्यांतून थेट प्रक्षेपण दाखवण्याचा अनोखा कार्यक्रम होणार आहे. पाणबुडी खाली पाठवल्यानंतर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पडद्यावर चित्रीकरण पाहता येणार आहे. ४.४५ ते ६.३० या वेळेत पेठकिल्ला ते मांडवी समुद्रकिनाऱ्यावर अभ्यास सहल काढली जाईल.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version