खारफुटी अभ्यास सहलीने सागर महोत्सवाची सांगता

रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या कर्ला ते चिंचखरी या भागात विस्तीर्ण स्वरूपात असलेल्या खारफुटी जंगलाची माहिती घेत खारफुटी अभ्यास सहलीने १४ जानेवारी रोजी सागर महोत्सवाची सांगता झाली.

आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनने आयोजित केलेला हा दुसरा सागर महोत्सव होता. आज अखेरच्या दिवशी खारफुटी अभ्यास सहलीत सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि पर्यटकांनी भाग घेतला. यात डॉ. विनोद धारगळकर आणि गोदरेज मॅंग्रूव्हजचे हेमंत कारखानीस यांनी खारफुटी, खाडीकिनारी दिसणारे पक्षी, जैवविविधता आदींची सुरेख माहिती दिली.

सागर महोत्सवाचे हे दुसरे वर्ष होते. आज अखेरच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता कर्ला येथील जेटीवरून होडीतून खारफुटी जंगल सहलीस सुरवात झाली. सुरवातीला डॉ. धारगळकर यांनी सांगितले की, खाऱ्या व गोड्या पाण्यात राहणारी खारफुटी झाडांची मुळे, पाने वेगवेगळी असतात. खारफुटी वनस्पतींची जंगले वाढण्याची गरज आहे. भरती, ओहोटीच्या काळातही ही खारफुटी तग धरून राहू शकते. येथे अनेक प्रकारचे प्राणी वास्तव्याला येतात. यात अनेक प्रकारचे पक्षी, कीटक, मासे, खेकडे, जलचर यांचा समावेश असतो. खारफुटीची पाने खाण्यासाठी वानरही येतात. खारफुटी वनस्पती हवेतील कार्बन शोषून घेते. प्रदूषण रोखू शकते. त्सुनामी आली तरीही खारफुटी समुद्राचे आक्रमण रोखून धरू शकते. प्रत्येकाने खारफुटीची किमान १० झाडे लावावीत. झाडे थोडी वाढली की ती तुम्ही आवश्यक त्या ठिकाणी लावा. ज्यावेळी तुमच्या आयुष्यातच जगलेली, मोठी झालेली झाडे पाहून तुम्हाला आनंद होईल. माती, चिखलाच्या जमिनीत वाढलेली खारफुटी झाडे जमिनीची धूप थांबवतात. त्यामुळे खाड्यांमध्ये भूभाग (बेट) वाढू लागला आहे. आपण जो ऑक्सिजन घेतो, तो ६० टक्के झाडांमुळे येतो. आपल्याला जगायचे असेल तर झाडे लावलीच पाहिजेत. प्रदूषण कमी करा. खारफुटीची तोड करणे हा कायद्याने गुन्हा असून त्याकरिता कडक शिक्षा दिली जाते.

सफरीदरम्यान ब्राह्मणी घार, बगळा, पाणकावळा, कावळे पाहायला मिळाले. या परिसरात ब्राह्मणी घारी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. खारफुटीच्या झाडांवरच त्या बसलेल्या पाहायला मिळतात. खारफुटीची पांढरी फुले, शेंगासुद्धा दिसल्या. जिथे जिथे खारफुटी आहे, तिथे निसर्ग टिकून आहे.

कर्ला येथील सुशेगाद जलविहारचे संजीव लिमये व कौस्तुभ लिमये यांचे या सहलीकरिता सहकार्य लाभले. आसमंत फाउंडेशनचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन, संचालक नितीन करमरकर, पुरुषोत्तम पेंडसे, जगदीश खेर श्रीप्रसाद देशमुख आदींसह अभ्यासक, पर्यावरणप्रेमींनी या सहलीत भाग घेतला. खारफुटी जंगलांचे संवर्धन करण्याची शपथ यावेळी प्रत्येकाने घेतली.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply