कोकण रेल्वेविषयीच्या मागण्यांसाठी २६ जानेवारीला सावंतवाडीत जेल भरो

मुंबई : कोकण रेल्वेविषयीच्या कोकणवासीयांच्या विविध मागण्यांसाठी येत्या २६ जानेवारी रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने मुंबईत रविवारी (दि. १४ जानेवारी) रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने २३ सहयोगी संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मेळाव्यात हा निर्धार करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी दिली. प्रारंभी प्रा. दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

परळ येथील भावसार सभागृहात हा मेळावा झाला. येत्या २६ जानेवारीपर्यंत कोकण रेल्वेने कोकणवासीयांच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सावंतवाडीच्या पुढे गाड्या जाऊ देणार नाही, अशा शब्दांत श्री. नाईक यांनी रेल्वे प्रशासनाला ठणकावले. प्रा. मधू दंडवते यांच्यामुळे कोकण रेल्वे सुरू होऊ शकली. त्यांनी कोकणवासीयांसाठी गाडी सुरू केली. पण त्यांच्या पश्चात कोकणवासीयांना रेल्वेकडून उपेक्षेची वागणूक मिळत आहे. दंडवते यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि कोकणवासीयांच्या मागण्यांविषयी इशारा देण्यासाठी मेळावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.

जन्मशताब्दी सोहळा २३ सहयोगी संस्थांच्या सहकार्याने पार पडला. त्यामध्ये कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ-ठाणे, वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, वसई-विरार, कोकण रेल्वे प्रवासी संघटना-मुंबई, अखिल कोकण विकास महासंघ, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था, कल्याण-सावंतवाडी, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघटना, लालबाग-परळ, कोकण रेल्वे जागृत प्रवासी संघ-बोरिवली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ-नवी मुंबई, डहाणू-वैतरणा रेल्वे प्रवासी सेवाभावी संस्था-डहाणू आमची पश्चिम रेल्वे-मुंबई, निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप, जल फाउंडेशन-खेड, सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, कुणबी युवामंच-मुंबई माणगाव, विलवडे रेल्वे प्रवासी संघटना-मुंबई / ग्रामीण, कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती-चिपळूण, आम्ही वसई-विरारकर, हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे अंजनी पंचक्रोशी संघर्ष समिती, मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती, आम्ही पालघरकर, आवाहन फॉर परिवर्तन संस्था-नवीन पनवेल, बोरिवली-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना-बोरिवली आणि ऑल जर्नालिस्ट-रत्नागिरी या संस्थांचा समावेश होता. खासदार अरविंद सावंत आणि मनसे नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर यावेळी उपस्थित होते.

कोकणात रेल्वे सुरू झाली, पण गेल्या २५ वर्षांतयेथील भूमिपुत्रांला रेल्वेच्या गर्दीतून गुदमरून प्रवास करावा लागत आहे. ज्या महाराष्ट्राने कोकण रेल्वेत सर्वाधिक २२ टक्के गुंतवणूक केली त्यांच्या वाट्याला फक्त तीनच रेल्वेगाड्या आल्य. कोकणात टर्मिनस नसल्याने गणपती बाप्पा कोकणात व सर्व गणपती स्पेशल रेल्वेगाड्या गोवा व कर्नाटकात जातात. टर्मिनस नसल्याने वसई सावंतवाडी पॅसेंजर, कल्याण सावंतवाडी पॅसेंजर, दादर चिपळूण मेमू व मुंबई रत्नागिरी इंटरसिटी एक्स्प्रेसची मागणी पूर्ण होत नाही. कोकण रेल्वेचे खासगीकरण थांबवून त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे किंवा त्याचा स्वतंत्र झोन बनवावा, प्रत्येक स्टेशनचा आरक्षण कोटा वाढवून त्याला जास्तीचे हॉल्टस मिळावेत, सर्व सुपरफास्ट रेल्वे मिरज मार्गे मडगावला वळवाव्यात किंवा त्यांना जास्तीचे हॉल्ट द्यावेत या अनेक वर्षांच्या समितीच्या प्रमुख मागण्यांचा उच्चार यावेळी करण्यात आला. समविचारी अनेक संस्था एकत्र येत शासनावर दबाव आणणारा हा कदाचित कोकणातील पहिलाच प्रयोग असेल, असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी समिती प्रमुख राजू कांबळे, उपाध्यक्ष तानाजी परब, दीपक चव्हाण, अक्षय महापदी, सेक्रेटरी यशवंत जड्यार, दर्शन कासले, कोषाध्यक्ष राजाराम कुडेकर, सल्लागार सुनील उत्तेकर, श्रीकांत सावंत, सुरेंद्र नेमळेकर,परेश गुरव, सुभाष लाड, ॲड. संजय गांगनाईक, सहसंपर्क प्रमुख अभिषेक शिंदे, कार्यकारणी सदस्य रमेश सावंत, मिलिंद रावराणे, संजय सावंत, सौ.संजना सावंत आणि सर्व सहयोगी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या २६ जानेवारीपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी रेल्वेस्थानकावर होणाऱ्या जेल भरो आंदोलनात कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply