सद्गुरू लोकमान्य वाचनालय वक्तृत्व स्पर्धेत श्रेयस चव्हाण पहिला

देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाने शांता अनंत साने यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत धामापूर (ता. संगमेश्वर) येथील पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी श्रेयस सुबोध चव्हाण याने प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेच्या आरंभी वाचनालयाचे पदाधिकारी आणि परीक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. भारताची अंतरिक्ष भरारी, सुजाण नागरिक म्हणून माझी कर्तव्ये आणि मोबाइलचा सुयोग्य वापर असे तीन विषय देण्यात आले होते. स्पर्धेच्या परीक्षक म्हणून मराठी वाङ्मयाच्या अभ्यासिका अनघा अशोक लिमये आणि निवृत्त माध्यमिक शिक्षिका मंगला शामकांत अळवणी यांनी काम पाहिले.

स्पर्धेत श्रेयस सुबोध चव्हाण याने प्रथम, कसबा हायस्कूलचा शुभंकर श्रीपाद फाटक याने द्वितीय, तर अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी श्लोका सागर संकपाळ हिने तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्यांना पारितोषिक स्वरूपात अनुक्रमे १,००१, ७५० आणि ५०० रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पुस्तक देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी यांनी केले. सूत्रसंचालन ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर यांनी केले. वाचनालयाच्या कार्यकारी मंडळातील सदस्य संभाजी आंब्रे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर, सहाय्यक ग्रंथपाल अमृता इंदुलकर, अर्चना राणे आणि नरेंद्र खेडेकर यांनी मेहनत घेतली.

यशस्वी स्पर्धक विद्यार्थ्यांसोबत ग्रंथपाल सौ. आमडेकर, परीक्षक सौ. लिमये व सौ. अळवणी, श्री. आंब्रे, अध्यक्ष प्रा. जोशी
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply