रत्नागिरी : मुंबईत झालेल्या ५७ व्या सबजुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत वेगवेगळ्या गटांमध्ये रत्नागिरीच्या निधी सप्रे आणि स्वरा मोहिरे उपविजेत्या ठरल्या.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि दादर येथील सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये ही ५७ वी सब जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा झाली. त्यात १२ वर्षांखालील कॅडेट मुलींच्या गटात अंतिम फेरीत रत्नागिरीच्या ८ वर्षांच्या निधी सप्रे उपविजेती ठरली. तिला जळगावच्या ज्ञानेश्वरी धोंगडे हिने १४-१०, २-२१ व १७-९ अशा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभूत करून विजय मिळविला.
१४ वर्षांखालील मुलींच्या एकेरी अंतिम सामन्यात रत्नागिरीची स्वरा मोहिरे उपविजेती ठरली. तिच्यावर पुण्याच्या तनया पाटीलने १९-५, २१-० असा विजय मिळवून गटाचे विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात रत्नागिरीच्या स्वरा कदमवर सिंधुदुर्गच्या पूर्वा केतकरने ११-५, १०-८ अशा विजयाची नोंद केली.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रत्नागिरीच्या द्रोण हजारेवर मुंबई उपनगरच्या वेदांत राणेने १०-१४, १४-९, व १७-४ असा निसटता विजय मिळविला.
वाराणसी येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात या सर्व खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
विजेत्या खेळाडूंना विश्व कॅरममधील विजेते संदीप दिवे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतीन ठाकूर, खजिनदार केतन चिखले, सचिव अरुण केदार व आंतरराष्ट्रीय पंच अजित सावंत यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचयअण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते यांनी विजेत्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
Follow Kokan Media on Social Media



