‘श्यामची आई’ पुस्तकाचा एकमेव वाढदिवस उत्साहात

मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण तालुका शाखाने महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हा अशा तऱ्हेचा एकमेव कार्यक्रम होता.

पूज्य साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेतर्फे श्यामच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वायंगणी (ता. मालवण) येथील ठाणेश्वर शाळेत हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मालवण कथामालेचे सल्लागार समिती सदस्य प्रकाश पेडणेकर यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मालवण कथामालेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर उपस्थित होते. गुरुजींच्या खरा तो एकची धर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी कथानिवेदिका व प्रमुख कार्यकर्त्या श्रीम सुगंधा गुरव यांनी श्यामची आई पुस्तकातील पुण्यात्मा यशवंत, श्रीमती प्रतिभा मयेकर यांनी भूतदया, श्रुती गोगटे यांनी अर्धनारी नटेश्वर या कथा सादर केल्या. शाळेची विद्यार्थिनी कु. यज्ञवी धुळे हिने मनाची जडणघडण, तर स्वरा पांजरी हिने पत्रावळ या कथा सादर केल्या.

यावेळी श्री. ठाकूर म्हणाले,गेल्या नऊ दशकात या पुस्तकाच्या दहा लाखांहून जास्त प्रती वितरित झाल्या आहेत. विविध १४ भाषांमध्ये पुस्तकाचे भाषांतर झाले आहे. पुस्तकात दिलेल्या ४२ रात्रींपैकी ३६ रात्री साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिल्या. त्यांच्या तुरुंगवासाच्या काळात ९ फेब्रुवारी १९३३ रोजी या रात्री लिहायला गुरुजींनी सुरुवात केली आणि अवघ्या पाच दिवसांत १३ फेब्रुवारी १९३३ रोजी पहाटे मातेचा महिमा सांगणारा हा ग्रंथ पूर्णत्वास गेला. गुरुजींचे ह्रदय मातृप्रेमाने एवढे भरलेले होते की भराभर हा मातृग्रंथ कागदावर प्रकट झाला. आज प्रत्येक घरातील मातेजवळ मोबाइलऐवजी हे मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र असणे आवश्यक आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. पेडणेकर म्हणाले, आज श्यामच्या आईचा हा वाढदिवस महाराष्ट्रातून फक्त माझ्या वायंगणी गावात होत आहे, याचा मला अभिमान वाटतो. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने माताभगिनी आणि पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, श्यामची आई समजून घेतली, याचे मला समाधान वाटते. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना श्यामची आई पुस्तके वितरित केली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुजींची गाणी सादर केली. मुख्याध्यापिका वैजयंती कदम यांनी उत्तम व्यवस्थापन केले. सर्वांना खाऊ वाटप केले. व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दामोदर वायंगणकर, श्रीमती रेडकर मॅडम, कोचरेकर सर उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. कोचरेकर यांनी केले.

याबाबत मालवण कथामालेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी सांगितले की, पूज्य साने गुरुजींना १९३२ साली स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे अटक झाली. त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. तेथेच ते “श्यामच्या आई”च्या कथा राजबंद्यांना सांगत. सलग ४२ रात्री त्यांनी ४२ कथा कैद्यांना सांगितल्या. त्यातील एक राजबंदी आनंद पाटील यांनी गुरुजींना या कथा लिहून काढायला सांगितले. साने गुरुजी ९ फेब्रुवारी १९३३ रोजी लिहायला बसले आणि १३ फेब्रुवारी १९३३ रोजी त्यांनी “श्यामची आई” पुस्तक लिहून हातावेगळे केले. एवढे त्यांचे हृदय मातृप्रेमाने भरलेले आणि भारलेले होते. गेल्या शतकातील आणि चालू शतकातील सर्वाधिक खपाचे पुस्तक म्हणून ‘श्यामची आई’ पुस्तकाला संख्यात्मक नाहीतर गुणात्मकही नावलौकिक प्राप्त झाला. यासाठी ९ फेब्रुवारीला ‘श्यामची आई’ पुस्तकाचा ९१ वा वाढदिवस साजरा करण्याचे साने गुरुजी कथामालेने ठरविले आहे.

हा वाढदिवस मालवण तालुक्यातील वायंगणी ठाणेश्वर या शाळेत साजरा होणार असून मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता विष्णू सावंत यांनी सदर वाढदिवसाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रकाश किरात पेडणेकर भूषविणार आहेत. प्रमुख मान्यवर म्हणून कथामालेचे उपाध्यक्ष पांडुरंग गुरुदास कोचरेकर आणि सचिव सुगंधा केदार गुरव उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी प्रतिभा महादेव मयेकर श्यामच्या आईच्या कथा सांगणार आहेत.
यावेळी त्या परिसरातील मुलांच्या सर्व आईंना ‘श्यामची आई’ हा ग्रंथ भेट म्हणून देण्यात येणार आहे. साने गुरुजी कथामाला कार्यकर्त्या आणि माजी पंचायत समिती सदस्या कै. प्राजक्ता प्रकाश पेडणेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे ग्रंथदान होणार आहे.

उपक्रमाला शुभेच्छा देताना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष शामराव कराळे म्हणाले की, पुस्तकाचा वाढदिवस ही अभिनव कल्पना असून मालवण कथामालेचे या उपक्रमाबाबत कौतुक करायला हवे. वाढदिवसाला उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण कथामालेतर्फे करण्यात आले आहे.

शाळेतील आईंना श्यामची आई भेट

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply