डॉ. तानाजीराव चोरगे यांना समाजरत्न पुरस्कार

रत्नागिरी : ज्येष्ठ साहित्यिक आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला असून तो रविवारी (दि. ११ फेब्रुवारी) त्यांना देण्यात येणार आहे.

निमशिरगाव (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथे येत्या रविवारी (दि. ११ फेब्रुवारी) निमशिरगाव ग्रामस्थ, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि साहित्य सुधा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सत्ताविसावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात डॉ. चोरगे यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. समारंभात साहित्यरत्न पुरस्कार रफिक सूरज यांना तर शेतकरी राजा पुरस्कार शीतल बोरगावे यांना देण्यात येणार आहे.

संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रवीण बांदेकर भूषविणार आहेत. संमेलनाचे उदघाटन डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते होणार आहे, तर स्वागताध्यक्ष अनिल ऊर्फ सावकर मादनाईक आहेत. स्मरणिका प्रकाशन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळी ८ वाजता सिद्धेश्वर मंदिरातून ग्रंथ दिंडीने संमेलनाची सुरवात होईल. डॉ. धवल पाटील, डॉ. सुकुमार पाटील, डॉ. अतिक पटेल आणि डॉ. अजित बिरनाळे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीची सुरुवात होईल. सकाळी ९ वाजता संमेलनाध्यक्ष प्रवीण बांदेकर यांच्या उपस्थितीत डॉ. कुंभार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळचे सदस्य डॉ. आनंद पाटील, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, शरद इन्स्टिट्यूटचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील उपस्थित राहणार आहेत. दुपारी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य व आजची परिस्थिती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जेष्ठ पत्रकार आनंद केतकर, धनाजी गुरव, डॉ. गोमटेश्वर पाटील वक्ते असून परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी फेसाटीकार नवनाथ गोरे आहेत.

दुपारी डॉ. अजित बिरनाळे यांचे कथाकथन होणार आहे. त्यानंतर डॉ. रवींद्र श्रावस्ती यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित व नवोदितांची काव्यमैफल रंगणार आहे. ही माहिती साहित्यसुधा कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष पद्माकर पाटील, उपाध्यक्ष रावसाहेब पुजारी, संस्थापक अध्यक्ष विजय बेळंके, खजिनदार प्रा. शांताराम कांबळे, सचिव अजित सुतार, सहसचिव गोमटेश पाटील यांनी दिली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply