तेच ते आणि तेच ते

पंचवीस वर्षांनंतरच्या रत्नागिरी जिल्ह्याचे चित्र कसे असेल आणि कसे असावे, याचा ऊहापोह करणारा एक कार्यक्रम रत्नागिरीत पार पडला. दैनिक लोकसत्तातर्फे ‘रत्नभूमी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने ‘रत्नागिरी २०५०’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. गद्रे मरीन एक्स्पोर्टचे दीपक गद्रे, हॉटेल असोसिएशनचे उदय लोध आणि आंबा बागायतदार सचिन लांजेकर या तिघांनी आपापल्या क्षेत्राविषयीचे मुद्दे आपल्या छोटेखानी भाषणात तेथे मांडले. आंबा बागायतदार श्री. लांजेकर यांनी आंबा व्यवसायाचा आढावा घेतला. १९९० सालापासून आंबा बागायत मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे सांगून ते म्हणाले की, निर्यातीच्या सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे बाजारात ७५ दिवसांपर्यंत टिकाव धरू धरू शकेल, अशा आंब्याच्या निर्मितीकरिता संशोधन झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. उदय लोध यांनी पर्यटन आणि हॉटेल व्यवसायासंबंधी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, २५ वर्षांनंतरच्या रत्नागिरीचा विचार करताना २५ वर्षांपूर्वी रत्नागिरीत कोणत्या सुविधा होत्या, याचाही विचार करायला हवा आणि त्यापेक्षा कितीतरी वेगाने पायाभूत सुविधांचा विकास व्हायला हवा. शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून मिळणाऱ्या सवलती रत्नागिरी जिल्ह्यातही पर्यटनाच्या व्यवसायाला मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विविध उद्योग, रस्ते, पर्यटनस्थळे यांचा विकास झाला, तरच पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत. पर्यटकांकरिता रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी सर्व तऱ्हेच्या दळणवळणाच्या सोयीसुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. सागरी मार्गे, हवाई मार्गे आणि महामार्गाने पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात आला पाहिजे. त्यासाठी सोयीसुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. दीपक गद्रे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील १९७० च्या सुमारास मत्स्य व्यवसायाला प्रारंभ झाला. तेव्हा भरपूर प्रमाणात मासळी उपलब्ध होत होती. तेव्हा मत्स्य प्रक्रिया उद्योगही नव्हते. आता मासे मिळायचे प्रमाण कमी झाले आहे. कारण सर्व तऱ्हेच्या साधनांनी मोठ्या प्रमाणावर मासेमारी होत आहे. कोस्ट गार्डसारख्या यंत्रणेचा उपयोग करून घेऊन मासेमारीवर मासेमारीच्या वेळेचे, खोल समुद्रातील मासेमारीचे, अंतराचे, मासेमारीच्या निश्चित काळाचे नियंत्रण करता येऊ शकते का, याबाबत विचार झाला पाहिजे. कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची मानसिकता बदलली पाहिजे असेही श्री. गद्रे म्हणाले.

कोकणाविषयीचे हे जे मुद्दे मांडले गेले, त्याला चर्चासत्र म्हटले असले, तरी त्याचे स्वरूप तसे नव्हते. कारण चर्चासत्रातून एखादे सार काढले जाते. तसे याबाबतीत झाले नाही. सर्व भाषणे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ऐकली. पण त्यांनी त्या मुद्द्यांसंदर्भात काहीही ठोस सांगितले नाही. उद्योग विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला. पण राज्याच्या इतर भागांपेक्षा कोकणात उद्योगांना विरोध होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कोकणात येऊ घातलेल्या उद्योगांमधून मोठी रोजगारनिर्मिती होईल, असेही त्यांनी सांगितले. पण चर्चासत्रात व्यवसायांच्या दृष्टीने मांडल्या गेलेल्या मुद्द्यांबद्दल ते ठोस काही सांगतील, अशी अपेक्षा होती. कोकणाच्या पर्यावरणाला पूरक व्यवसाय आणायचा शासनाचा विचार असल्याचे ते म्हणाले. पण पर्यटन, फलोत्पादन आणि मासेमारी या पारंपरिक उद्योगांमध्ये असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्याबाबत ते काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा होती. ती फलद्रूप झाली नाही. आणखी एका निमित्ताने कोकणाविषयीचे नेहमीचेच तेच ते आणि तेच ते मुद्दे पुन्हा एकदा आणखी एका व्यासपीठावर मांडले गेले, एवढाच त्याचा अर्थ निघतो.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ९ फेब्रुवारी २०२४)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply