वाढदिवस ‘श्यामची आई’चा

हे वर्ष पूज्य साने गुरुजींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांनी लिहिलेल्या ‘श्यामची आई’ या अजरामर गाथेविषयी थोडेसे. साने गुरुजींनी ९ फेब्रुवारी १९३३ रोजी ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहायला घेतले. म्हणजेच ९ फेब्रुवारी हा ‘श्यामची आई’ पुस्तकाचा वाढदिवस. त्या दिवसाचे औचित्य साधून ‘श्यामची आई’च्या जन्मस्थळी नाशिकच्या कारागृहात तीस वर्षांपूर्वी भेट दिल्याच्या आठवणी जागवत साने गुरुजी कथामालेचे मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला लेख.
….

आई माझा गुरू, आई माझा कल्पतरू !
सौख्याचा सागरू, आई माझी!
असे भावोत्कट उद्गार उभ्या महाराष्ट्राला देणाऱ्या संस्कारभूषण पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजींचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष सुरू आहे. एक प्रासादिक लेखक, थोर स्वातंत्र्यसेनानी, प्रतिभासंपन्न शिक्षक, चैतन्याचा महोदधि, चंदनाप्रमाणे देह झिजविणारा आधुनिक संत, शिक्षणाच्या माध्यमातून नवनिर्माण करणारा थोर शिल्पकार, प्रकाशाची उधळण करणारा देवदूत, आंतरभारतीचा ध्यास घेतलेला विश्वमानव, अशी साने गुरुजींना जनतेकडून प्राप्त झालेली शेकडो ’बिरुदे’ तराजूच्या एका पारड्यात टाकली आणि दुसर्या पारड्यात मातृप्रेमाचे महन्मंगल साने गुरुजींची ‘श्यामची आई’ हे पुस्तक घातले तर निश्चितच महाराष्ट्रातील चार पिढ्यांच्या प्रेमाने जड होऊन ते पारडे खाली जाईल, एवढे प्रेम त्या पुस्तकाला प्राप्त झालेले आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही. गेल्या शतकातील सर्वाधिक खपाचे पुस्तक म्हणून या पुस्तकाला नावलौकिक प्राप्त झाला आहे. संख्यात्मक नाही तर केवळ गुणात्मकच.
साने गुरुजींना पूज्य आई ‘यशोदा’ लाभली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड गावी आणि उभ्या महाराष्ट्राला ‘श्यामची आई’ मिळाली ती नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील एका कोठडीमधून! तीही आई तेवढीच लोकप्रिय झाली आणि अजरामरही झाली. एका शुभदिनी, गुरुवारी ९ फेब्रुवारी १९३३ या दिवशी रात्री साने गुरुजींनी हे पुस्तक लिहायला घेतले आणि सोमवार, १३ फेब्रुवारी १९३३ रोजी पहाटे अवघ्या साडेचार दिवसांत हे मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र लिहून हातावेगळे केले. एवढे गुरुजींचे हृदय आईच्या प्रेमाने भरून गेले होते. ते रिते व्हायला वेळ लागला नाही. ‘ये हृदयीचे ते हृदयी’ सहजरीत्या गेले. हे महाराष्ट्रातील मुलांचे महद्भाग्य!

साने गुरुजींना १९३२ साली स्वातंत्र्य आंदोलनात शिक्षा झाल्यावर त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. तेथे त्यांचे सहकारी राजबंदी नवल आनंद पाटील आणि अन्य मित्रांनी साने गुरुजींना विनंती केली, ‘‘गुरुजी, तुमच्या बालपणीच्या आठवणी आम्हाला सांगा.’’ साने गुरुजींचे हृदय बालहृदय होते. त्यांना राजबंद्यांचा आग्रह मोडणे कठीण झाले. दिवसभर कारागृहात नेमलेले काम करणे त्यानंतर त्या आठवणी क्रमशः लिहून काढून मित्रांना सांगणे असा क्रम सुरू झाला. या पुस्तकात एकूण ४२ प्रकरणे आहेत. त्यांना ‘४२ रात्री’ असे संबोधण्यात आलेले आहे. अवघ्या ४२ रात्रीत सामावलेली ही आईची प्रेमस्वरूप आणि वात्सल्यपूर्ण कथा म्हणजे मातृप्रेमाने दुथडी भरून वाहणारी गंगाच होय. या गंगेचा उगम ज्या कैद्याच्या कोठडीत झाला ते पवित्र ठिकाण, ती पांडुरंगाची ‘पंढरी’ बघण्याचे आणि तेथे जाऊन आठ दिवस राहण्याचे भाग्य कथामालेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला जवळजवळ तीन दशकांपूर्वी प्राप्त झाले.

जून १९९५ च्या सुमारास नाशिक मध्यवर्ती कारागृहात अधीक्षक म्हणून दवणे साहेब आले होते. दवणे साहेबांवर साने गुरुजींच्या विचारांचा दांडगा प्रभाव होता. त्यावेळी त्या कारागृहाची क्षमता जवळजवळ दोन हजार कैद्यांची होती. काही कैद्यांना ‘श्यामची आई’ या पुस्तकातील एक एक प्रकरण वाचून दाखवायचा एक नवीन प्रयोग दवणे साहेबांनी सुरू केला. काही कैद्यांच्या मनावर आणि जीवनावर ते पुस्तक फारच परिणाम करून गेले. त्या कैद्यांमध्ये साने गुरुजीप्रेमी जवळजवळ पाचशे कैद्यांचा एक गट तयार झाला. त्यांनी ज्या कोठडीत साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ सांगितली, ती कोठडी ‘श्यामची आई’ पुस्तकातील प्रसंगचित्रांनी चितारली. त्या खोलीचे अंतरंग बदलून टाकले. तेथे कैद्यांचे ‘श्यामची आई’ पुस्तकांवर कथाकथनाचे कार्यक्रम होऊ लागले. साने गुरुजी कथामाला त्या बराकीत सुरू झाली.

दवणेसाहेबांचा हा नवा प्रयोग महाराष्ट्रात सर्वत्र गेला आणि ही बाब साने गुरुजी कथामालेचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या कानावर गेली. त्यावर्षीचा अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा राष्ट्रीय पुरस्कार दवणे साहेब यांना जाहीर झाला. सरकारच्या परवानगीने कैद्यांसाठी आठ दिवसांचे संस्कार शिबिर कारागृहात घेण्याचे ठरले. ज्या खोलीत ‘श्यामची आई’ पुस्तकाचा जन्म झाला, त्या गुरुजींच्या कैदेच्या खोलीला एका आगळ्या स्मारकाचे रूप देण्याचा कार्यक्रम ठरला आणि त्या कैद्यांच्या सान्निध्यात आठ दिवस राहण्याचा, त्यांचे विचार, राहणीमान आणि बदललेले संस्कार जाणून घेण्याचा कार्यक्रम ठरला. आले प्रकाशभाई मोहाडीकरांच्या मना तेथे कोणाचे चालेना! ज्यांना साने गुरुजींचा चिरसहवास लाभला, अशी स्वतः कै. प्रकाशभाई, कै. राजाभाऊ मंगळवेढेकर, कै. यदुनाथ थत्ते, कै. मधुकरराव चौधरी, कै. नरूभाऊ लिमये अशी पूजनीय माणसे आमच्यासोबत होती. आम्ही राष्ट्रीय स्तरावरील तरुण वीस-बावीस कार्यकर्ते होतो. माझ्या आयुष्यातील तर तो सोन्याचा क्षण! ती खोली प्रत्यक्ष बघण्याचा, तेथे वास्तव्य करण्याचा आणि तेथील आठवणी मनात साठवून ठेवण्याचा.

आठ दिवसांत विविध कार्यक्रम झाले. बंदिवान बांधवांचे करमणुकीचे कार्यक्रम, त्यांचे कविसंमेलन, त्यांची कथाकथने! त्यांच्या कविसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशभाई मोहाडीकरांनी कुसुमाग्रजांना निमंत्रित केले होते. राजाभाऊ मंगळवेढेकरांचे कैद्यांसाठी कथाकथन, यदुनाथ थत्ते यांचे ‘प्रतिज्ञा’ या विषयावर प्रबोधन, मधुकरराव चौधरी यांचे शैक्षणिक विचार, प्र. दी. पुराणिक यांचे ’सुंदर पत्रांचे वाचन’, स्वतः प्रकाशभाई मोहाडीकरांचे ‘साने गुरुजींचे मंगल विचार’ आदी अनेक कार्यक्रम झाले. त्यात मा. दवणे साहेबांचा सत्कार झाला. तुरुंगातील सर्व विभाग आम्ही फिरून बघितले. तेथील स्वच्छता, टापटीप पाहून भारावून गेलो.

मी आठ दिवस तेथील काही कैद्यांच्या एका गटाला रोज सायंकाळी एका झाडाच्या पाराखाली ‘शुभं करोति’ शिकवायचो. प्रत्येक कार्यकर्त्याला एक गट प्रकाशभाईनी वाटून दिलेला होता. ते जन्मठेप झालेले कैदी अगदी भावुक होऊन ’शुभं करोति कल्याणम्’ म्हणायचे. त्यानंतर ‘आस ही तुझी फार लागली’ अशी गीते व्हायची. नंतर साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकावर आधारित कथा व्हायच्या. त्या आगळ्या वेगळ्या ‘शुभं करोति’ने ते ‘जन्मठेप’ झालेले कैदी भारावून जायचे.

त्यातील एक कैदी मला म्हणाला, ‘‘अशी शुभं करोति आज आम्ही प्रथमच ऐकतो. आमच्या कानावर अशा प्रार्थना, अशी गीते आणि आमच्या मनावर बालपणीच ‘श्यामची आई’सारखे पुस्तक विराजमान झाले असते, तर आमच्यावर ही वेळ आलीच नसती.’’

तो कैदी बांध फुटल्यासारखा भरभरून बोलत होता. मी मात्र सुन्न झालो. संस्काराच्या एका पुस्तकाचे आगळे महत्त्व त्या दिवशी मनावर एक नवीन विचार रेखांकित करून गेले. चांगल्या साहित्याचे किती लाभदायक परिणाम जीवनावर होतात, हे मी अगदी जवळून पाहत होतो. हृदय हेलावून टाकणारे संस्कार! हे सर्व त्या ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या जन्मस्थळावर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मी अनुभवत होतो.

आठ दिवसांनी तेथील संस्कार शिबिर संपवून सर्वांच्या भिजक्या डोळ्यांनी निरोप घेऊन आम्ही परतलो. एका पुस्तकाचा जन्म ज्या खोलीत झाला, त्या खोलीचे, एका आईच्या मायेचा पाझर जेथे फुटला त्या पवित्र स्थळाचे दर्शन घेऊन आणि नवीन विचार घेऊन आम्ही निघालो. काय त्या एका पुस्तकाची महती! मला त्या क्षणी आचार्य अत्रे यांचे विचार आठवले, ‘‘जगामध्ये आजपर्यंत अनेक कवींनी आणि लेखकांनी ‘आई’संबंधी लिहिले असेल. कविता केल्या असतील, गोष्टी लिहिल्या पण मराठी भाषेत साने गुरुजींनी ‘श्यामची आई’मध्ये मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र रचून ठेवलेले आहे, असे अतीव माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही वाङ्मयात असेल असे मला मुळीच वाटत नाही.’’

अशा या ‘गंगोत्री’च्या उगमस्थानाचे दर्शन स्वर्गीय प्रकाशभाई मोहाडीकरांच्या प्रेमामुळे आम्हा कार्यकर्त्यांना घडले. ज्यावेळी मी पूज्य साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ पुस्तक हातात घेतो, त्या त्या वेळी माझ्या नजरेसमोर ती नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाची कोठडी दिसू लागते आणि त्या महापुरुषाच्या जन्मस्थळातून उमटलेले ध्वनी, मंत्रघोषाप्रमाणे माझ्या कानात आणि मनात रुंजी घालू लागतात.

आई माझा गुरू! आई माझा कल्पतरू !
सौख्याचा सागरू! आई माझी !!
प्रीतीचे सागर! अमृताची धार!
मांगल्याचे सार! आई माझी ! !

  • सुरेश शामराव ठाकूर,
    आचरे, ता. मालवण
    (संपर्क : 9421263665)
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply