मुंबई : कोकणातील आपले गाव पूर्वीसारखे राहिले नाही. गावातील दळणवळणासह अनेक सुविधा झाल्या आहेत, त्यांचा उपयोग करून घेऊन गावापासून दूर राहणाऱ्यांनी गावाशी अधिकाधिक संपर्क ठेवून गावातील जिव्हाळा वाढवावा, असे आवाहन बोरसूत (ता. संगमेश्वर) गावचे सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र माने यांनी केले.
बोरसूत ग्रामविकास मंडळाचे स्नेहसंमेलन भांडुप येथील सह्याद्री विद्यामंदिर सभागृहात उत्साही वातावरणात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात बोरसूत गावचे सुभाष भाई खामकर यांच्यासह सर्व उपस्थित ग्रामस्थांनी बोरसूत ग्रामदेवतेला आवाहन करून श्रीफळ वाढवून केली. कुमारी लीना विनोद खामकर हिच्या गणेशवंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. बोरसूतमधील ग्रामस्थांच्या मुलांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्यातील कलागुणांना व्यक्त करून कार्यक्रम अधिक बहारदार केला आणि उपस्थितांची शाबासकी मिळवली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मानकरी सुभाष श्रीपत खामकर, शिवाजी श्रीपत खामकर, ज्येष्ठ समाजसेवक अमृत सकपाळ, सरपंच चेतन दत्ताराम खामकर, उपसरपंच सौ. पल्लवी समीर खामकर, युवा नेते समीर दीपक खामकर, माजी सचिव महेश कदम, माजी सचिव मनोहर सीताराम खामकर, रवींद्र शिंदे, रवींद्र दौलत खामकर, रवींद्र जगन्नाथ खामकर, समाजसेवक भालचंद्र माने आदी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान नवीन कार्यकारिणी अध्यक्ष विलास निळकंठ खामकर, उपाध्यक्ष सलील सुभाष खामकर, सचिव सुशांत रमेश साळवी, खजिनदार प्रज्ञेश प्रभाकर खामकर यांनी केला.
मान्यवर व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले. नवीन कार्यकारिणीचे सर्वसमावेशक, सुंदर आनंदी वातावरणातील उत्तम नियोजन, तसेच कार्यक्रमासाठी केलेल्या परिश्रमांचे अभिनंदन केले. दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर आणि निवृत्त व्यक्तींचा सन्मान म्हणजे ग्रामस्थांना आपला असलेला अभिमान व इतरांना प्रेरणादायी ठरेल, असेही मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. सरपंच चेतन खामकर, सौ. पल्लवी खामकर, युवा नेते समीर खामकर यांनी गावावरून येऊन कार्यक्रमाला जाणीवपूर्वक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. बोरसुत गावामधील पडीक जमिनीचा विकास, स्थानिकांना रोजगार, आरोग्य केंद्र, मोबाइल टॉवर अशा प्रकारचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वासही त्यांनी दिली. अध्यक्ष विलास खामकर यांनी सांगितले की, आपले गाव छोटे, परंतु पंचक्रोशीतील उत्तम गाव म्हणून ओळखले जाते. विजय खामकर यांनी आपल्या गावातील मुलांची उल्लेखनीय प्रगती पाहून आनंद व्यक्त केला. शिवाजी खामकर यांनी मंदिराची उभारणी हे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याचे फळ आहे, असे सांगून आम्ही निमित्तमात्र आहोत, असा विचार व्यक्त केला.
कार्यक्रमांतर्गतच दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर आणि निवृत्त असलेल्या व्यक्तींचे सत्कार बॅग, प्रशस्तीपत्र, श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ उपस्थित मान्यवरांकडून देऊन करण्यात आले. ढोल पथकातील विशेष कामगिरीने प्रसिद्धीमाध्यमांद्वारे पुढे आलेली कुमारी यामिनी नंदू खामकर हिचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
महिलांचे हळदीकुंकू पार पडले. उपाध्यक्ष सलील खामकर यांनी ग्रामस्थांच्या बहुसंख्येने उपस्थितीबद्दल आभार व्यक्त केले. राजेश खामकर व नरेश खामकर यांनी उत्तम अँकरिंग केले. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्वांचा नामोल्लेख करून सर्वांचे आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

