Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

पेशवाई गणपती बुद्धिबळ स्पर्धेत सौरीश कशेळकर विजेता

Advertisements

रत्नागिरी : येथील मारुती आळीतील श्री हनुमान मित्रमंडळाने आयोजित केलेल्या श्रीमंत पेशवाई गणपती चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद रत्नागिरीच्या प्रथम मानांकित सौरीश कशेळकर याने मिळविले, तर सोहम रुमडे उपविजेता ठरला.

अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम फेरीतील सामन्यात काळ्या मोहऱ्या घेऊन सौरीशने नवव्या मानांकित सोहम रुमडे विरुद्ध विजय मिळवला. सौरीशने सात फेऱ्यांमध्ये साडेसहा गुण मिळविले, तर सहा गुणांसह सोहमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अंतिम फेरीतील सामन्यांत वरद पेठे याने साहस नारकर, विशाल आंबेकरने सुहास कामतेकर व यश गोगटे याने प्रवीण सावर्डेकर यांच्याविरुद्धचे महत्त्वाचे डाव जिंकले. वरद व विशाल दोघांनीही सहा गुणांसह अनुक्रमे तिसरा व चौथा तर यश गोगटेने साडेपाच गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला. सुहास कामतेकर, साहस नारकर, विवेक जोशी, प्रणव मुळ्ये व तनया आंब्रे यांनी प्रत्येकी पाच गुणांसह अनुक्रमे सहावे ते दहावे स्थान प्राप्त केले.

स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविलेले खेळाडू असे – १५ वर्षांखालील वयोगटात ओम चव्हाण, अथर्व लिमये, निधी मुळ्ये, आयेशा मोंगल, १३ वर्षांखालील वयोगटात रुमीन वास्ता, नंदन दामले, आर्या पळसुलेदेसाई, श्रेया विलणकर, ११ वर्षांखालील वयोगटात आयुष रायकर, अंचित दिवेकर, अमिना झारी, वरुणिका बोडके, ९ वर्षांखालील वयोगटात पारस मुंडेकर, अद्वैत खोत व त्रिशा खंडागळे.

पटवर्धन हायस्कूल येथे पार पडलेल्या या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन मंडळातर्फे सलग दुसऱ्या वर्षी करण्यात आले होते. जिल्हाभरातून दहा आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित बुद्धिबळपटूंसह एकूण ६६ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.

स्पर्धेचे बक्षीस वितरण रत्नागिरीतील उद्योजक मिलिंद दळी, विजय गोताड आणि स्पर्धा प्रमुख सचिन बंदरकर यांच्या उपस्थितीत झाला. हनुमान मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते साहिल गांधी, ओंकार शेरे, परिमल खेडेकर, मिलिंद शेरे आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे विवेक सोहनी, चैतन्य भिडे यांनी पंच कामगिरीसह तांत्रिक सहकार्य केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version