स्वरूपानंद पतसंस्थेला राष्ट्रीय सहकारी विकास निगमचा पुरस्कार

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला राष्ट्रीय सहकारी विकास निगम या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महामंडळाचा को-ऑपरेटिव्ह एक्सलन्स अँड मेरिट हा पुरस्कार जाहीर झाला.

पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या माध्यमातून सहकारातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांना सन्मानित करण्यात येते. महामंडळातर्फे राष्ट्रीय स्तरावर सहकारातील अनेक उपक्रम राबवले जातात. या अनुषंगाने क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या सहकार क्षेत्रातल्या विभागाचा पुरस्कार स्वरूपानंद पतसंस्थेला जाहीर झाला आहे.

ॲड. पटवर्धन म्हणाले की, पतसंस्थेला २०१३ राज्य सहकारचा सहकार भूषण पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाले. आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून तो सर्वांत मोठा पुरस्कार आहे. प्रस्तावाची छाननी करण्याकरिता प्रत्येक राज्याची समिती नेमली होती. गेल्या तीन वर्षांचा अहवाल, संस्थेचे सभासद, ठेवी, कर्जे, वसुली, सहकार क्षेत्रातील प्रमाणे आदी निकष होते. त्यात संस्थेला पुरस्कार मिळाला. राज्याच्या सहकार आयुक्तांच्या समितीने छाननी केली होती.

गेल्या वर्षीच्या ६ कोटी ६२ लाख नफ्यात वाढ होऊन यंदा निव्वळ नफा ७ कोटीच्या घरात पोहोचेल. ३२ वर्षे व्यवहारात, विश्वासार्ह पद्धतीने सेवा देत, ग्राहकांना संलग्न करत सातत्याने वाटचाल सुरू आहे. जनसामान्यांचा विश्वासासोबत आता केंद्र शासनानेही पुरस्काराची मोहर उमटवल्याने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यामुळे अन्यही संस्था पुढे येतील, असेही ॲड. पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

स्वरूपानंद पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून सध्या ठेवी ३०३ कोटी ९५ लाख रुपये, कर्ज २११ कोटी ७३ लाख, गुंतवणूक १४१ कोटी ९९ लाख, वसुलीचे प्रमाण ९९.३६ टक्के, खेळते भांडवल ३६२ कोटी ८ लाख, सी. डी. रेशो ५९.६९ टक्के व स्वनिधी ४२ कोटी २५ लाख आहे.

पुरस्काराचे वितरण येत्या बुधवारी (दि. १३ मार्च) सकाळी साडेदहा वाजता पुण्यातील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट संस्थेत होणार आहे. त्यासाठी संस्थेतील १० प्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. प्रथमच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी आनंद व्यक्त केला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply