डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांच्या स्थैर्य पुस्तकाचे लांज्यात प्रकाशन
लांजा (जि. रत्नागिरी) : सगळ्या समाजाला सर्वांत जास्त गरज आहे ती माणसांची आणि माणूस कसे व्हावे, हे जाणून घ्यायचे असेल आणि तो संस्कार आपल्यामध्ये रुजवून घ्यायचा असेल, तर पुस्तके वाचण्याला पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेचे अध्यक्ष अॅड. विलास कुवळेकर यांनी केले.
कर्नाटकातील राजपत्रित अधिकारी नागराज कुप्पे यांनी लिहिलेले ‘अलेमारिय अंतरंग’ हे कन्नड आत्मकथन के. एस. करुणालक्ष्मी यांनी हिंदीत अनुवादित केले. त्या हिंदी अनुवादाचा मराठी अनुवाद लांजा येथील डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी ‘स्थैर्य’ या नावाने केला आहे. त्या पुस्तकाचे आणि ई-बुकचं प्रकाशन लांजा येथे झाले. त्या कार्यक्रमात अॅड. कुवळेकर बोलत होते.
दोंबिदास या भटक्या जमातीतील नागराज कुप्पे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राजपत्रित अधिकारी बनले. त्यांचा प्रेरक प्रवास या पुस्तकात वाचायला मिळतो. ‘अलेमारिय अंतरंग’ या त्यांच्या पुस्तकाला कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे.दोंबिदास या भटक्या जमातीतील नागराज कुप्पे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राजपत्रित अधिकारी बनले. त्यांचा प्रेरक प्रवास या पुस्तकात वाचायला मिळतो. ‘अलेमारिय अंतरंग’ या त्यांच्या पुस्तकाला कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे.
भटक्या जमातीमधल्या एका माणसाने स्वतःच्या अंतरीची इच्छा मालवू न देता शिक्षणाची कास धरून स्वतःच्या जीवनाला चांगल्या प्रकारचे स्थैर्य कसे प्राप्त करून दिलें याची प्रेरक कथा ‘स्थैर्य’ या पुस्तकात मांडली आहे. मूळ साहित्यातील स्वाद वाचकांपर्यंत पोहोचवणे हे अनुवादकाचे काम आहे. त्या भाषेतील, प्रांतातील जनजीवन, संस्कृती, लोकरुढी, समज, श्रद्धा या साऱ्यांचा परिचय आपल्याला होतो, हा अनुवादाचा उपयोग आहे, असे अॅड. कुवळेकर यावेळी म्हणाले.
सरवदे, गोंधळी, वासुदेव या सगळ्यांचे प्रमाण सध्याच्या काळात कमी होत आहे. एका बाजूने विचार केला, तर ही लोककलेची हानी आहे; मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला, तर भटके जीवन जगणाऱ्यांच्या आयुष्याला विविध शासकीय योजना, शिक्षण यांमुळे स्थैर्य लाभले, याचाही आनंद मानायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
लेखिका डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी म्हणाल्या की, मी पासष्टाव्या वर्षी पीएचडी करायचे ठरविले. तेव्हा वडार समाजाचा अभ्यास करण्याची सूचना विद्यापीठाकडून देण्यात आली. तेव्हा आश्रमशाळेत शिकून पुढे राजपत्रित अधिकारी झालेले नागराज कुप्पे यांचे अलेमारिय अंतरंग हे आत्मकथन प्रसिद्ध झाले. माझी मैत्रीण करुणालक्ष्मी यांनी हिंदीत अनुवादित केले. मी ते पुस्तक वाचल्यानंतर श्री.कुप्पे यांचा प्रवास मला भावला आणि त्याचा अनुवाद करायचे ठरविले. विद्यार्थ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.
लोकमान्य वाचनालयाचे संचालक अॅड. अभिजित जेधे म्हणाले की, अलीकडची पिढी मला काय त्याचे, भटक्या जमातींविषयी वाचून मला करायचे आहे, याच मनेवृत्तीची झाली आहे. पण कोणत्याही सुविधा नसताना भटक्या जमातीतील माणसे कर्तृत्वाचे झेंडे लावतात. चांगल्या परिस्थितीत राहत असलेल्य़ा आपल्याला या पुस्तकापासून काय केले पाहिजे, याची प्रेरणा मिळेल. यासाठीच विद्यार्थ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.
डॉ. माया तिरमारे यांनी भटक्या फासेपारधी जमातीतील एका महिलेचा अनुभव सांगितला. अन्न, वस्त्र आणि निवारा मिळाला की आपण स्थिरस्थावर झालो, असे म्हणतो. पण अन्नाची नेहमीची भ्रांत, राहायला घर नाही, कोणाच्या तरी ओसरीवर राहायचे, अशा परिस्थितीत राहून भटक्या जमातीतील लोक पुढे येतात. आमच्याकडे एक फासेपारधी महिला यायची. एका झोळीतून खुळखुळे, खेळणी, सुपे, टोपल्या आणायची आणि त्या वस्तू विकून उदरनिर्वाह करायची. कोणीही काहीही शिळेपाके अन्न दिले, तर ते ती घेऊन जायची. ती एकदा म्हणाली की, सर्वांकडून शिळे, ताजे जे अ्न्न मिळेल, ते आम्ही भरपूर शिजवतो आणि ते खाऊन आमची भूक भागवतो. अशी अनेक माणसे अजूनही आहेत. त्यांचा नव्या पिढीला अनुभव नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचले, तर त्यांना महत्त्व पटेल. आपण सुविधा असूनही मागे राहतो. कारणे सांगतो. अशी कारणे न सांगता पुढे व्हावे. काहीही नसलेली माणसे पुढे कशी जातात, हे समजून घ्यायला या पुस्तकाची मदत होईल.
सत्त्वश्री प्रकाशनचे प्रमोद कोनकर यांनी प्रकाशनप्रक्रियेविषयीची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचायला प्रवृत्त व्हावे, यासाठी पुस्तक प्रकाशनाचा समारंभ शाळेत आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सत्त्वश्री प्रकाशनचे अनिकेत कोनकर यांनी अनुवादित पुस्तक प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, चिंचवड येथील साहित्य संमेलनात वेगवेगळ्या भाषांमधील साहित्यिकांचा परिसंवाद झाला होता. त्यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी सांगितले की, वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील साहित्य परदेशी भाषांमध्ये अनुवादित होते. पण तमीळमधील साहित्य मराठीत किंवा तेलगुचे हिंदीमध्ये किंवा कन्नडमधील साहित्य मराठीत अनुवादित होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. भारतातील भाषा वाढीला लागण्यासाठी असा भारतातील भाषाभगिनींची अनुवाद झाला पाहिजे, असे मत त्यावेळी त्यांनी व्यक्त केले होते. सौ. देवगोजी यांनी केलेल्या एका अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करून आम्ही त्याचा एक भाग होऊ शकलो, याचा अभिमान वाटतो.
सौ. एल. आर. भिंगे मॅडम यांनी अनुवादित पुस्तकाचे महत्त्व सांगितले. स्थैर्य पुस्तकात कन्नडमधील शब्द जसेच्या तसे वापरल्यामुळे पुस्तक मुळातून वाचल्याचा अनुभव मिळतो. कन्नड शब्दांचे संदर्भही दिले आहेत. त्यामुळे पुस्तकातील भाषेशी आपण भाषेशी एकरूप होतो. आजच्या तरुण पिढीला अडचणीत प्रवास करायचे माहीत नाही. गैरसोय माहीत नाही. अशा मुलांना गैरसोयींवर मात करून पुढे कसे जावे, याची प्रेरणा हे पुस्तक वाचून नक्कीच मुळेल. या अनुवादाच्या लेखिका सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनीही पासष्टाव्या वर्षी पीएडी पदवी संपादन केली. हेसुद्धा पेरणादायी आहे.
अकरावीतील विद्यार्थिनीने स्थैर्य पुस्तकातील वाचनाचे महत्त्व सांगणाऱ्या एका प्रकरणाचे अभिवाचन केले.
समारंभाला लांज्याच्या न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रसन्न शेट्ये, उपमुख्याध्यापक जाधव सर, रामचंद्र जाधव सर, प्रभाकर सनगरे सर, रमाकांत सावंत सर, विजय देवगोजी, वसंत आजगावकर सर, नितिन कदम, कॉन्ट्रॅक्टर मुलाणी, मेघा कुलकर्णी, लोकमान्य वाचनालयाचे रामचंद्र लांजेकर, सौ. वर्षा घाटे मॅडम तसेच अकरावी-बारावीतील मुले उपस्थित होती. कार्यक्रमाचे ओघवते निवेदन विजय हटकर सर यांनी केले, प्रियंका रसाळ मॅडम यांनी आभार मानले.
स्थैर्य हे पुस्तक ई-बुक स्वरूपात वाचण्यासाठी लिंक :
https://play.google.com/store/books/details/?id=1TUQEQAAQBAJ
अशी घडली राजस्विनी हे पुस्तक ई-बुक स्वरूपात वाचण्यासाठी लिंक : https://play.google.com/store/books/details/?id=SJkQEQAAQBAJ






