लांजा : वाचनसंस्कृतीपासून दूर चाललेल्या लोकांपर्यंत साहित्य पोहोचविण्यासाठी समाजानेच आता साहित्यभिमुख होण्याची गरज आहे. समाजात सगळीकडे पसरलेला झाकोळ मसापच्या माध्यमातून दूर करून प्रकाशवाटा दाखवायचे काम आपल्याला करावयाचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी मसापच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, रत्नागिरी जिल्हा बॅंकेचे जिल्हाध्यक्ष आणि मसापचे उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे माजी कार्यवाह प्रकाश देशपांडे, कवी अरुण इंगवले, चिपळूण मसापचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, लांजा शाखेचे अध्यक्ष विधिज्ञ विलास कुवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मसापची ओळख महाराष्ट्रभर व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देताना प्रा. जोशी म्हणाले, समीक्षा संमेलन, विभागीय संमेलन, युवा संमेलन, शिवार संमेलन आदी वैशिष्ट्यपूर्ण संमेलने आयोजित केली जात आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची सन्मानाने निवड होण्यामागे मसापची आग्रही भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. लांजा शाखेने परिसरातील महाविद्यालये, वाचनसंस्कृतीशी निगडीत संस्थांशी अभिसरण करून मसापच्या माध्यमातून साहित्यिक चळवळ उभारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. चोरगे म्हणाले, आजची पिढीला मराठी भाषेबाबत अनास्था आहे. टीव्हीवरील मराठी मालिकांमधून होत असलेला चुकीचा उपयोग त्याला कारणीभूत आहे. मसापच्या माध्यमातून योग्य आणि शुद्ध भाषेचा आग्रहासाठी आपल्याला ठोस पावले उचलावी लागतील. शिक्षक आणि पालक वाचताना दिसले, तरच त्यांचे अनुकरण करणारी नवी पिढी वाचनसंस्कृतीकडे वळणार आहे. यासाठीच स्थानिक प्रतिभेच्या कवडशांना योग्य संधी देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेचा लाभ लांजावासीयांनी घ्यावा.
लांजा शाखाध्यक्ष अॅड. विलास कुवळेकर म्हणाले, मुंबई, ठाणे, पुणे ही साहित्याची प्रकाशबेटे असून तेथून कित्येक कोस दूर असलेल्या मात्र साहित्यिकांची समृद्ध परंपरा असलेल्या लांजा तालुक्यात साहित्यप्रसाराचा छोटा दीप प्रज्वलित व्हावा, यासाठीच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेची स्थापना करत आहोत. लांज्याच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा परिचयश्री. कुवळेकर यांनी करून दिला.
यावेळी लांजा शाखेच्या उपाध्यक्ष सौ. विजयालक्ष्मी देवगोजी, सचिव विजय हटकर, निरंजन देशमुख, डॉ. राजेश माळी या नव्या कार्यकारिणीला मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
मसापच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार आणि कवी अरुण इंगवले यांनी लांजा शाखेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. राहुल मराठे यांनी केले, तर आभार विजय हटकर यांनी मानले.
कार्यक्रमाला साप्ताहिक आंदोलनचे संपादक गजाभाऊ वाघदरे, जयवंतराव विचारे, डॉ. महेश बावधनकर, प्रा. धनंजय क्षीरसागर, डॉ. राजेंद्र शेवडे, डॉ. जालिंदर लोणके, प्रा. ऋषिकेश पाटील, नितीन कदम, प्रकाश हर्चेकर, झोरे, उमेश केसरकर, डॉ. माया तिरमारे, राकेश दळवी, पराग शिंदे, गुरुप्रसाद सनगर आदि उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

