लांजा : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेच्या वतीने डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी लिखित स्थैर्य या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी, २७ जून रोजी होणार आहे.
प्रसिद्ध लेखक, ज्येष्ठ विधीज्ञ विलास कुवळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर लांज्याच्या न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, सी.ई.ओ. भाऊसाहेब वंजारे, सचिव महेश सप्रे, लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. अभिजित जेधे, प्रकाशक प्रमोद कोनकर, लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्ना शेट्ये, मुख्याध्यापिका विद्या आठवले, कोमसाप लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव आदी मान्यवर या प्रकाशन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरीतील कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनाने या पुस्तकाची निर्मिती केली असून ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांचे अजि म्या परदेस पाहिला, अशी घडली राजस्विनी या दोन पुस्तकापाठोपाठ ”स्थैर्य” हे तिसरे पुस्तक मराठी वाचकांच्या भेटीला येत आहे. सुप्रसिद्ध लेखक व भटक्या समाजासाठी विशेषतः पारधी समाजासाठी कार्य करताना यमगरवाडीसारखा अनोखा प्रकल्प साकारणारे आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.
कर्नाटकातील ” दोंबिदास” या भटक्या विमुक्त जातीजमातीतील संघर्षपूर्ण जीवन जगत प्रतिभा व अथक मेहनतीच्या जोरावर सनदी अधिकारी बनलेल्या नागराज कुप्पे या अधिकाऱ्याने अलेमारिय अंतरंग हे कन्नड भाषेतील आत्मकथन लिहिले. पुस्तकाला कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकाचा डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी मराठी भाषेत सुरेख, अभ्यासपूर्ण अनुवाद केला आहे. गैरसोयीची ढाल करून पळवाटा काढणाऱ्या तरुणाईला नागराज कुप्पेंचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी ठरावे व त्यांनी आपले ध्येय साकार करावे, यासाठी या पुस्तकाचा प्रवास कन्नड, हिंदीनंतर आता मराठी भाषेपर्यंत झाला आहे. लांज्यातील न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी सभागृहात गुरुवारी सकाळी १० वाजता पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
या साहित्यिक कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लांजा मसापचे सचिव विजय हटकर यांनी केले आहे.

