रत्नागिरीच्या संस्कृत अध्ययन केंद्राला धर्मशास्त्रविषयक प्रकल्प मंजूर

रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाद्वारे अष्टादशी परियोजनअंतर्गत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राला अन्तर्विद्याशाखीय धर्मशास्त्रविषयक संशोधन हा प्रकल्प मंजूर झाला आहे.

या प्रकल्पासाठी चार लाख रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. प्राचीन भारतीय धर्मशास्त्राच्या विविध पैलूंचे सखोल अध्ययन व संशोधन करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण कार्य भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात केले जाणार असून या प्रकल्पाचे प्रमुख पर्यवेक्षक भारतीय दर्शन विभाग अधिष्ठाता डॉ. मधुसूदन पेन्ना आहेत. रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे यांनी धर्मशास्त्र विषयाबाबत विपुल संशोधन करत धर्मशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ तयार केला. त्यांच्या या महान कार्यापासून प्रेरणा घेऊन हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

प्राचीन भारतीय धर्मशास्त्राच्या विविध पैलूंचे सखोल अध्ययन व संशोधन करणे, तसेच त्याचे आधुनिक संदर्भात पुनरावलोकन करणे असे काम प्रकल्पात होणार आहे. या प्रकल्पांतर्गत धर्मशास्त्राच्या विविध अंगांचे अध्ययन आणि संशोधन करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्मृती, पुराणे आणि अन्य प्राचीन धार्मिक ग्रंथांचा समावेश असेल. या प्राचीन ग्रंथांचे आधुनिक सामाजिक, नैतिक आणि विधीसंबंधित संदर्भांचे विश्लेषण करण्यात येणार आहे.

मधुसूदन पेन्ना

या प्रकल्पाच्या माध्यमातून प्राचीन धर्मशास्त्राचा अभ्यास आणि त्याची आधुनिक जीवनशैलीत उपयुक्तता यावर विशेष भर दिला जाईल. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमांचा विकास होईल. तसेच आंतरराष्ट्रीय विद्वानांसोबत सहकार्य आणि संवाद वाढेल. धर्मशास्त्रातील आंतरविषयी संशोधन प्रकल्पामुळे भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व अधिक अधोरेखित होईल आणि समाजाच्या नैतिक व सांस्कृतिक विकासासाठी मौल्यवान योगदान केले जाईल.

धर्मशास्त्रातील प्रकल्पामुळे प्राचीन भारतीय धर्मशास्त्राचे समग्र अध्ययन होईल आणि विविध शैक्षणिक तसेच संशोधन संस्था यामध्ये सहभागी होतील. हा प्रकल्प भारतीय तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्राच्या गहन अध्ययनासाठी नवी दालने उघडेल, असे डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply