Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

भजन म्हणजे भक्तिरसातून भगवंताशी एकरूप करणारी कला : विश्वनाथ बुवा भाटे

Advertisements

रत्नागिरी : भजन म्हणजे भक्तिरसातून भगवंताशी एकरूप करणारी कला असून ती साध्य करण्यासाठी भजनी कलावंतांचे अष्टभाव जागृत व्हायला हवे. त्यातूनच गुरुकृपेचे समाधानही साध्य करता येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध भजनी बुवा विश्वनाथ भाटे यांनी केले.

येथील श्रीराम मंदिरात श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्यातर्फे मासिक भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा झाला. त्यावेळी श्री. भाट्ये बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कट्ट्याचे मुख्य संयोजक सुरेश विष्णु तथा अण्णा लिमये होते. यावेळी भजनी कलावंत शुभदा आगाशे आणि स्मिता पोंक्षे यांनी विश्वनाथ बुवांना गुरुस्थानी मानून गुरुपूजनाने भजनी मेळाव्याचा प्रारंभ केला. त्यानंतर वेदा शेट्ये, सेवानिवृत्त डेपो मॅनेजर दिलीपराव साळवी, सुधीर प्रभुदेसाई, श्रीरंग रानबरे, सुरेंद्र घुडे, दत्ताराम लिंगायत, उल्हास मुरकर, माधवी साळवी, सचिन टिकेकर, सुधीर वायंगणकर, सुरेश लिमये, विश्वास शेंडे, नीला पवार या कलाकारांनी सुरेल आवाजात विविध भजने सादर केली. बुवा विश्वनाथ भाटे यांच्या भैरवीनंतर जय जय राम कृष्ण हरी या गजराने उत्तरोत्तर रंगलेल्या या भजनी मेळाव्याची सांगता झाली.

भजनाला हार्मोनियमसाथ स्वतः विश्वनाथ बुवा भाटे यांनी केली तर मृदुंग साथ, चकवा साथ राजेंद्र साळवी आणि टाळसाथ दिलीपराव साळवी व सुरेंद्र शेट्ये यांनी केली. मेळाव्याचे सूत्रसंचालन कट्ट्याचे सचिव समाजभूषण सुरेंद्र घुडे यांनी केले. श्रावण महिन्यातील विविध मंदिरात होणाऱ्या सण-उत्सवांच्या निमित्ताने नामसप्ताहाच्या पार्श्वभूमीवर या भजनी मेळाव्याला भजनी कलावंतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यापुढील भजनी मार्गदर्शन मेळावा १७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ ते ५ वाजता या वेळेत होणार असून भजन कला मार्गदर्शक बुवा प्रकाश वराडकर मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version