अभंगांचे शतकानुशतके भक्तांच्या हृदयावर गारूड : प्रकाश वराडकर

रत्नागिरी : पांडुरंगरुपी परीसस्पर्श झालेला अभंग हा काव्यप्रकार शतकानुशतके भक्तांच्या हृदयावर पांडुरंगभक्तीचे गारूड घालून राहिला आहे, असे प्रतिपादन भजन मार्गदर्शक बुवा प्रकाश वराडकर यांनी केले.

येथील राम आळीतील श्रीराम मंदिरात श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने आठवा भजनी मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात भजनी बुवा प्रकाश वराडकर यांनी भजनातील अभंग या काव्यप्रकाराबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भजनातील जे काव्यप्रकार आहेत, त्यातील “अभंग” सर्वांत शक्तिमान आहे. त्यातील अलौकिक विचार आणि पांडुरंगाविषयी असलेला भक्तिभाव अनंतकाळ अखंडित आहे आणि यापुढेही अनेक शतके अभंग राहील.

श्री. वराडकर म्हणाले, भक्तिसंप्रदाय किंवा नामसंकीर्तन संप्रदाय ज्ञानेश्वरांनी १२०० च्या आसपास प्रवर्तित केले होते. संत तुकाराम हे सतराव्या शतकातील संतकवी होते. त्यांनी धार्मिक विधींच्या आंधळ्या आज्ञापालनाच्या विरुद्ध देवाविषयी भक्ती आणि प्रेमावर जोर देण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच संत तुकारामांना पाच हजारांहून अधिक अभंग लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्यापैकी बरेच अभंग जसे पांडुरंगाला समर्पित होते, तसेच मुख्यतः त्यावेळच्या सामाजिक अन्यायांवर टीका करणारेही होते. नामसंकीर्तनाची परंपरा तंजावरपर्यंत नेण्यात समर्थ रामदासांचा मोठा वाटा होता. यामुळे दक्षिण भारतात शास्त्रीय स्वरूपात अभंगांचे गायन झाले आणि आजही होत आहे.

मेळाव्याच्या प्रारंभी संयोजक तथा श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे अध्यक्ष सुरेश तथा अण्णा लिमये यांनी स्वागत केले. सचिव सुरेंद्र घुडे यांनी प्रकाश वराडकर यांच्या मातोश्री पार्वती शंकर वराडकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजलीचा ठराव मांडला. गेल्या महिन्यातील भजनी मेळाव्याचा आढावाही श्री. घुडे यांनी घेतला. गेल्या महिन्यात झालेल्या भजनी मेळाव्यात गवळण गाणी या विषयावर बुवा प्रकाश वराडकर यांनी मार्गदर्शन केले होते.

पुढील भजनी मार्गदर्शन मेळावा ९ मार्च २०२४ रोजी दुपारी ३ वाजता राम मंदिरात भजनातील “रूपावली” (रूप पाहता लोचनी यासारखे अन्य रूपाचे अभंग) या काव्यप्रकारावर होणार असून त्यावेळी बुवा प्रकाश वराडकर मार्गदर्शन करणार आहेत. अभंग या विषयावर झालेल्या भजनी मार्गदर्शन मेळाव्यात रत्नागिरीतील अनेक भजनी कलावंतांनी अभंग सादर केले. त्यामध्ये सुरेंद्र घुडे, रमाकांत पांचाळ, बाळाजी घोसाळकर, शिवराम कदम, श्रीमती मनीषा भाटकर, दीपाली आलिम, दिलिपकुमार साळवी, सौ. सुप्रिया तळेकर, सौ वैजयंती पाटील, सौ. जान्हवी सावंत, सौ. अनुया बाम, दीपक मेस्त्री, रामचंद्र साटेलकर, सौ. शुभांगी वारेकर, भाऊ लिंगायत यांचा समावेश होता. भजन मार्गदर्शक प्रकाश वराडकर यांनी “कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर” हा अभंग आणि नंतर गजर सादर केल्यानंतर भजनी मेळाव्याची सांगता झाली. यावेळी शुभांगी वारेकर यांनी हार्मोनियम साथ दिली, पखवाज साथ भाऊ लिंगायत यांनी तर टाळ साथ शिवराम कदम यांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply