माकड-वानर पकडण्याची मोहीम गोळपमधून सुरू होणार

रत्नागिरी : कोकणातील शेतीला उपद्रवकारक ठरणारे वानर आणि माकडे यांना पकडण्याची मोहीम गोळप (ता. रत्नागिरी) येथून येत्या पंधरा दिवसांत सुरू होणार आहे.

वानर-माकडांच्या उपद्रवाविरोधात आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते अॅड. अविनाश काळे यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकातून दिली. ते म्हणाले की, पालकमंत्री उदय सामंत यांनी तसेच वन विभागाने तसे जाहीर केले आहे. श्री. काळे यांनी याबाबत पाठविलेल्या म्हटले आहे की, चार दिवसांपूर्वी गोळपमध्ये पंतप्रधान सडक योजनेच्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत आले होते. तेव्हा त्यांची भेट घेतली. वन विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील वानर, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी लागणार्‍या निधीचा प्रस्ताव दिला होता, त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा ते म्हणाले की, प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी तालुक्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजूर केला आहे आणि त्याचे काम गोळपमधून सुरू होईल. रत्नागिरी तालुक्यातील मोहिमेचा अभ्यास करून नंतर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी लागणारा निधी दिला जाईल. त्याबाबत विभागीय वनअधिकारी श्री. खाडे यांच्याशी संपर्क साधण्याची सूचना श्री. सामंत यांनी केली.

श्री. सामंत यांच्या सूचनेनुसार श्री. काळे यांनी विभागीय वनअधिकारी श्री. खाडे यांची भेट घेतली. त्यांनी रत्नागिरी तालुक्यासाठी वाहन, पिंजरे इत्यादींसाठी मागितलेला निधी परिक्षेत्र वनअधिकारी श्री. सुतार यांच्याकडे वर्ग केल्याचे सांगितले. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील वानर, माकडे पकडणे आणि अभयारण्यात सोडण्याच्या मोहिमेला गोळपमधून सुरुवात होईल.

श्री. सुतार यांनीही निधी मिळाल्याचे सांगून पंधरा दिवसांत गोळपमधून मोहीम सुरू होईल, असे सांगितले. त्यानंतर ही मोहीम तालुक्यात सुरू होईल.

श्री. काळे म्हणाले की, गेले दीड वर्ष उपोषण, सभा, पत्रव्यवहार, आमरण उपोषण, पदयात्रा काढून आत्महत्येची परवानगी मागणे, माधवराव गाडगीळ यांची पत्रकार परिषद इत्यादी अनेक प्रकारांनी चिकाटीने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची, लोकांची साथ लाभली. मात्र हा तात्पुरता आणि आवश्यक उपाय आहे. कायमस्वरूपी उपायांसाठी राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पाठपुरावा करून धोरणात्मक निर्णय होण्याकरिता प्रयत्नशील राहणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply