रत्नागिरी : येथील श्रीराम मंदिरात येत्या शनिवारी (दि. ५ ऑगस्ट) विश्वनाथ भाटे भजनी कलाकारांना मार्गदर्शन करणार आहेत.
समाजाच्या स्वास्थ्यासाठी परंपरागत भजन कला वृद्धिंगत करण्याकरिता श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टातर्फे हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.
कोकणातील लोककलांना मोठी परंपरा आहे. त्यातही भजनी कलेची महतीही खूप आहे. परशुराम पांचाळ, चंद्रकांत कदम, विलास पाटील यांच्यासारख्या अनेक नामवंत भजनसम्राटांनी ही परंपरा अखंडित ठेवली असून ईश्वरभक्तीमध्ये लीन करणारी, मनात भक्तिभाव रुजविणारी भजनी कला भविष्य काळातही अखंडित ठेवणे समाजाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाने सामाजिक बांधिलकी जपत भजन कला प्रशिक्षण उपक्रम श्रीराम मंदिरात सुरू केला आहे. याअंतर्गत भजनी कलाकारांसाठी शास्त्रोक्त मार्गदर्शन मेळावा येत्या ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार असून हरचेरी-उमरे येथील नामवंत भजनी बुवा विश्वनाथ भाटे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. भजनी कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कट्टातर्फे करण्यात आले आहे.
श्रीराम मंदिर येथे ज्येष्ठ नागरिक कट्टाच्या वतीने गेल्या महिन्यात १२ जुलै रोजी आयोजित भजन कला प्रशिक्षण शिबिरात भाटेबुवांच्या मार्गदर्शन मेळाव्याला सुमारे १०० कलावंतांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महिला भजनी कलाकारांचाही मोठा सहभाग होता. या कलेतील बारकावे आत्मसात करता यावेत, यासाठी दुसऱ्यांदा असे प्रशिक्षण होत आहे. कलाकारांच्या विनंतीनुसार कट्टाचे मुख्य संयोजक सुरेश तथा अण्णा लिमये आणि सचिव सुरेंद्र घुडे यांनी हा मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे.

