रत्नागिरी : येथील मांडवी समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक आणि इतर कचरा संकलित करून रत्नागिरीच्या नागरिकांनी किनारा स्वच्छ केला.
दोन दिवसांपूर्वी मांडवी बीचवर रत्नागिरी महास्वछता अभियान राबवून साफसफाईचा संकल्प काही नागरिकांनी केला होता. नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अगदी अल्प सूचना देऊनही आज सकाळी सुमारे १२५ नागरिक स्वयंस्फूर्तीने किनाऱ्यावर एकत्र आले आणि त्यांनी साफसफाई करण्यासाठी श्रमदान केले. अवघ्या दोन तासांमध्ये ८ ट्रॅक्टर ट्रॉली भरतील एवढा कचरा गोळा झाला. यामध्ये स्थानिक नागरिक, किनाऱ्यावर व्यवसाय करणारे, रत्नागिरीप्रेमी, कारुण्य मरीन कंपनीचे कर्मचारी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे कर्मचारी, मैत्री ग्रुपचे कर्मचारी, मांडवी पर्यटन संस्था अशा विविध संस्था आणि रत्नागिरीप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
संकलित झालेला कचरा वाहून नेण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने जेसीबी, ट्रॅक्टर आणि कामगारांची व्यवस्था केली. विशेष म्हणजे किनारा साफसफाई करणाऱ्या नव्या यंत्राची चाचणीही त्यानिमित्ताने झाली, ते यंत्र आता लवकरच मांडवी किनारा नेहमीच साफसफाई करणार आहे.
या सर्व महास्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्वांना अल्पोपाहार आणि चहा देण्याची चोख व्यवस्था हॉटेल सी फॅनने केली होती. अभियान यशस्वी होण्याकरिता मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू कीर आणि मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई यांनी विशेष मेहनत घेतली.









कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

