रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयाची नवी वास्तू वर्षभरात उभारण्याचा प्रयत्न आहे, असे वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
श्री. पटवर्धन म्हणाले, वाचनालयाच्या जागेच्या लीजची मुदत १९९१ साली संपुष्टात आली होती. ते लीज ॲग्रीमेंट परत व्हावे यासाठी प्रदीर्घ काळाची लढत यशस्वी झाली असून वाचनालयाच्या मागणीनुसार ३० वर्षांचे लीज होऊन वाचनालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा रस्ता मोकळा झाला. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला शासनाने ३० वर्षांच्या लीजवर जागा दिली. त्यासाठी नोंदणीकृत करारही पार पडला. त्यानंतर वाचनालयाची जीर्ण झालेली इमारत पाडून नव्या स्वरूपात वाचनालयाची इमारत उभी राहावी, यासाठी परवानगी मिळाली आहे.
ते म्हणाले, वाचनालयाची मूळ इमारत १९७२ साली उभी राहिली. त्यानंतर इमारतीचा विस्तार दोन टप्यांत झाला. १९९६ साली दुसरा मजला बांधला गेला. मूळ बांधकाम लोड बेरिंग व त्यावर आर.सी.सी. स्लॅब अशी रचना होती. ही इमारत आता खूप जुनी म्हणजे ५२ वर्षाची झाली. आता ती पाडून पुनर्बांधकाम करणे अनिवार्य आहे. लीज ॲग्रीमेंट होत नसल्याने, नवीन बांधकामास परवानगी मिळत नव्हती. जुने बांधकाम व्यवस्थित ठेवण्यासाठी वाचनालयाने गांभीर्याने सतत प्रयत्न केले. मात्र आता स्ट्रक्चरल ऑडिटरनेही इमारत धोकादायक असा अहवाल दिला असून, आता पुनर्बांधणी आणि नूतनीकरण करून नव्या स्वरूपात नगर वाचनालयाची इमारत उभी करावयाची आहे. आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक परवानग्या प्राप्त करण्याचे काम पूर्ण झाले असून नवरात्र ते दीपावलीदरम्यान नव्या इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न आहे.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय १९६ वर्षांचे महाराष्ट्रातील सर्वांत जुने वाचनालय असून १ लाख १४ हजारांचा ग्रंथसंग्रह आहे. इतके जुने वाचनालय रत्नागिरीच्या सुसंस्कृत संस्कृतीचा दाखला आहे. इतकी जुनी संस्था रत्नागिरीत अद्यावत पद्धतीने सुरू आहे ही बाब रत्नागिरीतील सुज्ञ नागरिक बंधूभगिनींसाठी अभिमानाची आहे, असेही श्री. पटवर्धन म्हणाले.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची वास्तू नव्या स्वरूपात १ वर्षाच्या आत उभी करण्याचा मानस आहे. वाचनालयाकडे नवीन बांधकामासाठी ४३ लाख निधी जमा असून प्रयत्नपूर्वक ४३ लाखांचा निधी उभारला आहे. पंचवीस लाखाचा निधी पालकमंत्री उदय सामंत उपलब्ध करून देणार आहेत. नूतनीकरणासाठी ३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दोन मजली इमारत, अंतर्गत सजावट इत्यादींचा समावेश यात असेल. वाचनालयाची उत्तम वास्तू परत उभी रहावी यासाठी रत्नागिरीतील सुज्ञ नागरिक बंधूभगिनी तसेच वित्तीय संस्था, कंपन्या, अन्य आस्थापना यांनी योगदान करावे, यासाठी सर्वांना भेटून विनम्र आवाहन करणार असल्याचे श्री. पटवर्धन यांनी सांगितले.
वाचनालयाच्या नूतनीकरणासाठी रत्नागिरीकरांचे योगदान खूप मौलिक ठरणार आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी वाचनालयातील ग्रंथ ठेवा मार्गदर्शक ठरणार आहे. वाचनालयाचा हा संस्कार जागता ठेवण्यासाठी, उत्तम ग्रंथमंदिर साकारण्यासाठी सर्व रत्नागिरीकरांनी योगदान करावे, असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media



