रत्नागिरी : बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) विधानसभेसाठी होणार असलेल्या मतदानासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १३ लाख ३९ हजार ६९७ मतदार ३८ उमेदवारांमधून पाच जणांची आमदार म्हणून निवड करणार आहेत.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात १ हजार ७४७ मतदान केंद्रांवर ईव्हीएम मतपेट्या आणि संबंधित कर्मचारी मंगळवारी, दि. १९ नोव्हेंबर रोजी रवाना झाले. मतपेट्या आणि मतदानाचे साहित्य पोलीस संरक्षणात पाठविण्यात आले.

मतपेट्या घेऊन जाताना कर्मचारी
जिल्ह्यात दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये १ हजार ७४७ केंद्रांवर मतदान होणार आहे. तेथे पुरुष ६ लाख ४६ हजार १७६ आणि ६ लाख ९३ हजार ५१० महिला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात पाचपैकी चार मतदारसंघात मुख्य लढत शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना यांच्यात असून एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी आहे.
मतदानासाठी मतपेट्या जिल्हाभरातील विविध मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी तसेच मतदान झाल्यानंतर त्या परत आणण्यासाठी एसटीच्या २४० बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. उद्या शालेय सुट्टी असल्याने शालेय फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुण्यासह इतरत्र जाणाऱ्या एसटीची सेवा सुरू राहणार आहे. जिल्हाभरातील कोणत्याही मार्गावरील नियमित एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या नसल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले.
जिल्ह्यात पाच जागांसाठी एकूण ३८ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची मतदारसंघनिहा संख्या अशी – दापोली ९, गुहागर ७, चिपळूण ६. रत्नागिरी, राजापूर प्रत्येकी ८.
विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक लढविणाऱ्या असणाऱ्या उमेदवारांची नावे, पक्ष आणि चिन्ह यांचा तपशील असा – दापोली – अबगुल संतोष सोनू – महाराष्ट्र नवनिर्माण सेना- रेल्वे इंजिन, कदम योगेशदादा रामदास – शिवसेना – धनुष्यबाण, कदम संजय वसंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मशाल, मर्चंडे प्रवीण सहदेव – बहुजन समाज पार्टी – हत्ती, कदम योगेश रामदास – अपक्ष – हिरा, कदम योगेश विठ्ठल – अपक्ष – विजेचा खांब, कदम संजय सीताराम – अपक्ष – चिमणी, कदम संजय संभाजी – अपक्ष – शिट्टी आणि खांबे ज्ञानदेव रामचंद्र- अपक्ष – बासरी.
गुहागर – गांधी प्रमोद सीताराम – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – रेल्वे इंजिन, जाधव भास्कर भाऊराव- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), बेंडल राजेश रामचंद्र- शिवसेना – धनुष्यबाण, प्रमोद परशुराम आंब्रे – राष्ट्रीय समाज पक्ष – ऑटोरिक्षा, फडकले संदीप हरी – अपक्ष – बॅट, मोहन रामचंद्र पवार – अपक्ष -शिट्टी, सुनील सखाराम जाधव – अपक्ष – अंगठी.
चिपळूण – प्रशांत बबन यादव – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद्चंद्र पवार- तुतारी वाजवणारा माणूस, शेखर गोविंदराव निकम- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – घड्याळ, सौ. अनघा राजेश कांगणे – अपक्ष -शिट्टी, प्रशांत भगवान यादव- अपक्ष- ट्रम्पेट, महेंद्र जयराम पवार – अपक्ष – माइक, – शेखर गंगाराम निकम- अपक्ष – फूलकोबी.
रत्नागिरी – उदय रवींद्र सामंत – शिवसेना – धनुष्यबाण, बाळ माने – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मशाल, भारत सीताराम पवार – बहुजन समाज पार्टी – हत्ती, कैस नूरमहमद फणसोपकर- अपक्ष- वाळूचे घड्याळ, कोमल किशोर तोडणकर – अपक्ष – संगणक, ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील – अपक्ष – काडेपेटी, दिलीप काशिनाथ यादव -अपक्ष – इस्त्री, पंकज प्रताप तोडणकर -अपक्ष – बॅट.
राजापूर – किरण रवींद्र सामंत – शिवसेना – धनुष्यबाण, जाधव संदीप विश्राम – बहुजन समाज पार्टी – हत्ती, राजन प्रभाकर साळवी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) -मशाल, अमृत अनंत तांबडे – अपक्ष – चिमणी, अविनाश शांताराम लाड – अपक्ष – शिट्टी, यशवंत रामचंद्र हर्याण – अपक्ष – चालण्याची काठी, राजेंद्र रवींद्रनाथ साळवी – अपक्ष – बॅटरी टॉर्च, संजय आत्माराम यादव – अपक्ष – फणस.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

