Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे वार्षिक पुरस्कार जाहीर

Advertisements

राजापूर : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे वार्षिक पुरस्कार संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी जाहीर केले. येत्या फेब्रुवारीत वाटूळ (ता. राजापूर) येथे होणाऱ्या दहाव्या ग्रामीण साहित्य संमेलनात हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

विविध १४ पुरस्कारांपैकी पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई (तळवडे, राजापूर) यांना कोकण भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.

अन्य पुरस्कार असे -१.साने गुरुजी पुरस्कार – राजापूर – श्रीमती मनीषा गवाणकर, रत्नागिरी, श्रीमती विभा विकास बाणे. २. प्रा. मधु दंडवते पुरस्कार – आर. के.व्हनमाने (नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,राजापूर), सौ . रश्मी राजेश धालवलकर (रुक्मिणी भास्कर विद्यालय, व्हेळ, लांजा). ३.बॅ. नाथ पै पुरस्कार – युयुत्सु आर्ते (देवरूख), युवराज हांदे (रिंगणे), ४.बळीराजा पुरस्कार – दयानंद चौगुले (खरवते), जीवन माळी (लांजा). ५. जनमित्र पुरस्कार – राजेंद्रप्रसाद राऊत (ग्रामसेवक, राजापूर), भार्गव घाग (पोलीस जमादार, शिपोशी), ६. कलाश्री पुरस्कार – उमाशंकर दाते (आडिवरे, राजापूर), सचिन काळे (रत्नागिरी), ७. आदर्श गृहिणी पुरस्कार – श्रीमती. सुनीता सुनील चव्हाण (वाटूळ), श्रीमती वैशाली हरिश्चंद्र आयरे (रिंगणे). ८. सामाजिक कार्यकर्ता महिला पुरस्कार – सिद्धी शिरसेकर (जैतापूर), प्रांजली कोलते (सालपे). ९. माऊली पुरस्कार – हभप नंदकुमार वासुदेव चव्हाण (वाटूळ), हभप मनोहर सदाशिव रणदिवे (खोरनिनको). १०. अक्षर रत्न पुरस्कार – जे. डी. पराडकर (लोवले, संगमेश्वर), प्रा. सुहास बारटक्के (चिपळूण). ११. उद्यमश्री पुरस्कार – नीलेश सुवारे (लांजा), नरेश पांचाळ (रिंगणे). १२. संस्था कार्यकर्ता पुरस्कार – गणपत वळंजू (वाटूळ). १३. जीवन गौरव पुरस्कार – ज्ञानदेव दळवी (येरडव), रघुनाथ सदाशिव तथा तात्या गुणे (वेरळ).

पुरस्कारांविषयी अध्यक्षांचे मनोगत

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या पुरस्कारप्राप्त विजेत्यांना भरभरून शुभेच्छा !

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) ही पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर असलेली आणि लोकोपयोगी उपक्रम राबवून कोकणात नावलौकिक मिळवलेली संस्था असून याच संस्थेच्या माध्यमातून २०१४ पासून लांजा, राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातून वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करणाऱ्या कर्तृत्ववान माणसांचे पुरस्कार देऊन कौतुक करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.

विविध पुरस्कारांचा पहिला वितरण समारंभ २०१४ साली ओणीच्या नूतन विद्यालयात झाला. त्यावेळी केवळ ६ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले, त्यांनी संघाबद्दल काढलेले कृतज्ञचे शब्द आजही आठवतात. संघाचे तत्कालीन अध्यक्ष धोंडू पांडुरंग खांडेकर यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात असे पुरस्कार देऊन आपण कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याबाबत आदर व्यक्त करणे आवश्यक आहे, असे सुचवून त्यांनी स्वतःच एक रक्कम संघाकडे ठेव म्हणून ठेवत असल्याचे जाहीर केले. त्यांनी केलेल्या चांगल्या सुरुवातीला प्रतिसाद म्हणून अनेकांनी या पुरस्कारांसाठी संघाकडे ठेवी ठेवल्या आहेत. ते सर्व जण संघासाठी आदरणीय आहेत. त्यातून एक चांगली रक्कम संघाला मिळाली. पहिल्या वर्षाचे सहा पुरस्कार पुढे पुढे वाढत गेले. आज संघाच्या माध्यमातून  १४ क्षेत्रातून निवडलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. प्राथमिक शिक्षक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, महिला सामाजिक कार्यकर्ता, सरकारी-निमसरकारी कर्मचारी, गृहिणी,शेती, कला, साहित्य, उद्योग आणि वारकरी संप्रदाय या ११ क्षेत्रातून  प्रत्येकी दोन पुरस्कार असून, संघाच्या क्रियाशील सभासदांमधून एक पुरस्कार दिला जातो, तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांमधून दोन जीवनगौरव दिले जातात. यावर्षी एक नवीन पुरस्कार संघ सुरू करीत आहे. कोकणाचे नाव सर्वदूर करणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीला कोकण भूषण पुरस्कार देऊन गौरविण्याचे संघाने ठरविले आहे.

संघाचा २०१४ चा पहिला पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पाहून कार्यक्रमाला उपस्थित असलेले एक पुरस्कर्ते श्री.बाप्पा पाटोळे (तळवडे, ता. लांजा) याने पुढील वर्षीचा कार्यक्रम आपल्या तळवडे गावी करावा, अशी संघाकडे मागणी केली. त्यांच्या मागणीचा संघाने विचार करून पुढील वर्षीचा कार्यक्रम तळवडे गावी करण्याचा निश्चय केला. मात्र पहिल्या वर्षीचा कार्यक्रम केवळ तीन तासांचा असल्याने पुरस्कारप्राप्त व्यक्तींशी फार काही बोलता येत नाही, येणाऱ्या लोकांसाठी मनोरंजन करता येत नाही, म्हणून या कार्यक्रमाला अधिक वेळ असावा, अशी अनेकांची मागणी झाली. त्यातूनच मग ग्रामीण साहित्य संमेलनाची कल्पना पुढे आली. सलग दोन दिवसांचा कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले. माननीय बाप्पा पाटोळे यांनीसुद्धा या कार्यक्रमासाठी संमती दर्शवून संघाचे पहिले ग्रामीण साहित्य संमेलन लांजा तालुक्यातील तळवडे गावी झाले.

या साहित्य संमेलनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले पाचल गावचे सुपुत्र माननीय सिद्धार्थ जाधव यांनी पुढील वर्षी पाचल या गावी साहित्य संमेलन घ्यावे, अशी जाहीर मागणी केली आणि त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावातून साहित्य संमेलने आपल्या गावात करण्याची मागणी येऊ लागली. त्यामुळे एक वर्ष राजापूर आणि एका वर्षी लांजा तालुक्यात साहित्य संमेलने होत गेली. तिसरे साहित्य संमेलन लांजा येथे झाले,चौथे ताम्हाणे, पाचवे कोट, सहावे नाटे, सातवे प्रभानवल्ली- खोरनिनको, आठवे तळवडे-राजापूर, नववे शिपोशी अशी वेगवेगळ्या गावात साहित्य संमेलने यशस्वी होत गेली. त्या प्रत्येक साहित्य संमेलनातील शेवटचा दिवस पुरस्कार वितरणाचा विशेष समारंभ असतो.

यावर्षीचे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन राजापूर तालुक्यातील वाटूळ या गावी ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. अर्थात संघाचा अकरावा पुरस्कार वितरण समारंभ २ फेब्रुवारीला असणार आहे.

संघाचा पुरस्कार हा विशेष मानाचा पुरस्कार समजला जातो. आजपर्यंत ज्या अनेकांना पुरस्काराने गौरवित करण्यात आले, ते स्वतः आनंदित होते, मात्र त्यांना पुरस्कार मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केल्याचे आमच्या निदर्शनास येत होते. हे पुरस्कार निवडताना कोणत्याही व्यक्तीला याची कल्पना असत नाही. किंबहुना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती मागवली जात नाही. संघाची एक निवड समिती कार्यरत असून या समितीतील लोक आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून त्या त्या व्यक्तींबद्दलचे मत जाणून घेतात. त्यांचे समाजातील स्थान समजून घेतात आणि त्याप्रमाणे त्या त्या व्यक्तीची निवड करून ती संघाच्या मुख्य समितीकडे पाठवली जाते. मुख्य समिती त्याला अंतिम स्वरूप देते आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ती पुरस्कार यादी जाहीर केली जाते. त्यामुळे वर्तमानपत्रातून किंवा माध्यमांमधूनच आपली एखाद्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे, हे विजेत्यांना प्रथम कळते. त्यानंतरच संघाचा रीतसर पत्रव्यवहार त्यांच्याकडे जातो. त्या त्या वर्षीच्या पुरस्कार निवड समितीत कोण कोण आहे, याची वाच्यता संघाकडून केली जात नाही. ही संघाची पुरस्कार निवड पद्धत सर्वांनाच आवडली आहे आणि म्हणूनच त्या पुरस्कारांची महती वाढलेली आहे.

यावर्षीच्या पुरस्कार निवड समितीत महेंद्र साळवी, गणपत शिर्के, संदीप हांदे, किशोर नारकर आणि दीपक नागवेकर यांनी काम पाहिले तर मुख्य निवड समितीत सुभाष लाड, सुरेश प्रमोद पवार, गणेश चव्हाण आणि श्री प्रमोद मेस्त्री होते.

राजापूर येथे वाटूळच्या ग्रामस्थांच्या सोबत संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पुरस्कारांची नावे जाहीर करण्यात आली. सर्व पुरस्कार विजेत्यांना मनापासून शुभेच्छा !

आपण करीत असलेले पवित्र काम अधिक जोमाने पुढे न्यावे यासाठी आपणास परमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे ही प्रार्थना.

सुभाष लाड
अध्यक्ष,
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version