वैदिक गणिताचा प्रचार प्रसार हेच माझे ध्येय – डॉ. राजीव सप्रे

रत्नागिरी : गणित हा अधिक संशोधन झालेला विषय आहे. जगाच्या पाठीवर भारताचे गणित आदर्शवत आहे. याच परंपरेतील वैदिक गणिताचा प्रचार प्रसार करणे हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील गणित विभागाचे निवृत विभागप्रमुख डॉ. प्रा. राजीव सप्रे यांनी केले.

केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग, रामटेक आणि गोगटे महाविद्यालयाचा संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय भारतीय गणित कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी, दि. २४ फेब्रुवारी रोजी झाले. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले की, भारतीय गणिताचा प्रभाव जगातील सर्व गणितावर आहे. याच प्राचीन परंपरेने दशमान पद्धत, बीजगणित, शून्याचा शोध हे आविष्कार देऊ केले. ते आज प्रचलित आहेत. त्यामुळे हा वारसा जपण्याचे कर्तव्य प्रत्येकाचे आहे.

संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी भारतीय गणित आणि गणिताची कालपरत्वे असणारी उपयोगिता व कार्यशाळेच्या आगामी रूपरेषेबाबतचे भाष्य प्रास्ताविकात केले. कार्यक्रमाला मंचावर संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, रत्नागिरी व रत्नागिरीच्या परिसरातून विद्यार्थी, स्थानिक रत्नागिरीकर उपस्थित होते.

डॉ. प्रा. राजीव सप्रे यांनी वैदिक गणिताचा उगम व त्याची उपयोगिता याबाबत भाष्य केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थी, रत्नागिरीकर यांना गणिताच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे वैदिक गणितातून कशा रीतीने सोडवता येतील याचे प्रात्यक्षिक दाखवले. सहभागी झालेल्या सर्वांकडून त्यांनी वैदिक गणितातील निवडक सूत्रांच्या आधारे विविध प्रात्यक्षिके करवून घेतली. त्यामुळे रत्नागिरीकरांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून वैदिक गणिताचे धडे गिरवले.

वैदिक गणित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. राजीव सप्रे यांचा सन्मान करताना उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर. सोबत डॉ. कल्पना आठल्ये.

०वैदिक गणित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. राजीव सप्रे यांचा सन्मान करताना उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर. सोबत डॉ. कल्पना आठल्ये.

०००००००००००००००००००००००००००००००००००००००

भास्कराचार्यांची गणितीय सूत्रे आजही उपयुक्त – अन्वेष देवुलपल्लि

रत्नागिरी : आजमितीस अनेक भारतीय विद्वानांनी आपापले गणितावर आधारित संशोधन केलेले आहे. मात्र याच विद्वानांच्या परंपरेतील एक असलेले भास्कराचार्य यांनी दिलेली गणितीय सूत्रे आजच्या काळातदेखील लागू पडतात, असे प्रतिपादन अन्वेष देवुलपल्लि यांनी केले.

ते त्रिदिवसीय भारतीय गणित कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी, २५ फेब्रुवारी रोजी बोलत होते. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या आर्थिक सहयोगाने, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग, रामटेक आणि संस्कृत विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रि दिवसीय भारतीय गणित कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सकाळ सत्रात The Bhaskaracharya Classroom या विषयावर कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील वेदांग ज्योतिष विभागाचे शोधछात्र अन्वेष देवुलपल्लि यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण जी आकडेमोड करतो, जे आर्थिक गणिताचे ठोकताळे मांडतो, त्यालाच शालेय व्यवस्थेत सूत्रात्मक गणितातून शिकवले जाते. अशा रीतीने हे गणित आपल्या जीवनाचा एक भाग झालेले आहे. गणितासारखा पूर्ण संख्यात्मक भाग अथवा विषय शिकवण्यासाठी सोपी पद्धत वापरणे आवश्यक असते, हीच बाब भास्कराचार्यांनी आपल्या अध्यापन पद्धतीत आणली. आपल्या शिष्यांना वेगवेगळी पौराणिक, ऐतिहासिक उदाहरणे देऊन त्याद्वारे विविध गणिताचे प्रमेये, सूत्रे शिकवली. त्यामुळे गणिताचे पक्के ज्ञान शिष्यांना झाले. भास्कराचार्यांच्या रंजक अध्यापन पद्धती विषयीही त्यांनी प्रतिपादन केले. भास्कराचार्य यांची गणितशास्त्र शिकविण्याची पद्धत अनोखी होती. तीच पद्धत आजच्या काळातही उपयुक्त असून तिचा अवलंब मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण होईल. आपणदेखील या गणिताचा आनंद घेऊन ते आत्मसात केले पाहिजे, असे अन्वेष देवुलपल्लि यांनी म्हटले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांच्या हस्ते अन्वेष देवुलपल्लि यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. स्नेहा शिवलकर, प्रा. प्रज्ञा भट, उपकेंद्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी विद्यार्थी, स्थानिक रत्नागिरीकर व गणित विषयाचे शिक्षक उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply