मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बुधवारी ‘सागरा प्राण तळमळला’, गुरुवारी कवी कुसमाग्रज जयंती

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी भाषा समिती आणि रत्नागिरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दोन दिवसांचा कार्यक्रम रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे.

बुधवार २६ आणि गुरुवार २७ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर वंदना, मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसमाग्रज जयंती उत्सव स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. ही माहिती मराठी भाषा समिती सदस्य सचिव उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना शिरगाव या ठिकाणी ज्या घरात वास्तव्यास होते, त्या रवींद्र दामले यांच्या घरी बुधवारी सकाळी १० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर वंदना, सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सागरा प्राण तळमळला हे दोन अंकी नाटक होणार आहे. नाटकासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून दिंडीचा मार्ग मध्यवर्ती कारागृह ते स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह असा आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सकाळी १० वाजता कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार किरण सामंत यांच्या हस्ते मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि कोमसापचे प्रमुख विश्वस्त रमेश कीर प्रमुख पाहुणे तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मराठी भाषा समिती शुभांगी साठे, जिल्हा पोलीस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, मुख्याधिकारी तुषार बाबर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी. एम. कासार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ बाबासाहेब परुळेकर उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ११ वाजता मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठी माणसाचे योगदान आणि शासनाची भूमिका या परिसंवादात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी, श्री. कीर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चोरगे सहभागी होणार आहेत. दुपारी साडेबारा ते २ या वेळेत ज्येष्ठ कवी तथा गझलकार देवीदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अरुण मौर्ये, अमेय धोपटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोमसाप, शिक्षण विभाग आणि महसूल विभागातील नामवंत कवींचे संमेलन होणार आहे. दुपारी अडीच वाजता बक्षीस वितरण आणि समारोप होणार असून, माजी नगरसेवक बिपीन बंदरकर, अभिजित गोडबोले, कोमसापचे जिल्हाध्यक्ष प्रा. आनंद शेलार उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७ वाजता मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रम होणार आहे.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply