रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी (२६ फेब्रुवारी) रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे लक्ष्मी चौक येथील वीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिरगाव गायवाडी येथे वीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि दामले कुटुंबाने १०० वर्षे जतन करून ठेवलेल्या खोलीला भेट देण्यात आली. या दोन्ही उपक्रमांमध्ये क्लबमधील सायकलस्वार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंदमानातून सुटका झाल्यानंतर कोणत्याही सक्रिय राजकारणात भाग घ्यायचा नाही, या अटीवर स्वातंत्र्यवीर सावकरांना रत्नागिरीत राजकीय बंदीवान म्हणून आणण्यात आले. परंतु प्लेगची साथ आल्यामुळे सावरकरांना शिरगाव, गायवाडी येथील लोकमान्य टिळकांचे अनुयायी (कै.) विष्णुपंत काशिनाथ दामले यांनी शिरगावात बोलावले. दामले यांच्या घरी धान्याचे कोठार असलेली खोली रिकामी करून ती वीर सावरकरांना राहण्यासाठी देण्यात आली. ही खोली दामले यांच्या पाचव्या पिढीनेही जतन करून ठेवली असून, नोव्हेंबर २०२४ मध्ये या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाली. या खोलीत सावरकरांची लेखणी, दिवा, हस्ताक्षराची प्रत आजही जतन करून ठेवण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती प्रसन्न दामले आणि रवींद्र दामले यांनी या वेळी सायकलिस्ट्सना दिली.

मारुती मंदिर येथून अभिवादन सायकल रॅलीला सुरवात झाली. इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांसह ७३ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंतच्या विविध वयोगटांतील पुरुष आणि महिला सायकलपटू यात सहभागी झाले. लक्ष्मी चौक येथे वीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सायकलिस्ट शिरगाव, गायवाडी येथे रवाना झाले. त्यानंतर दामले यांच्या निवासस्थानी या खोलीला भेट देऊन तिथे अभिवादन करण्यात आले. दामले यांनी वीर सावरकरांच्या प्रति असलेली आदरभावना व्यक्त केली. या वेळी सायकलिस्ट आणि शास्त्रीय गायिका सौ. मुग्धा भट सामंत यांनी वीर सावरकर रचित नाटकातील ‘जान वचना, बोला’ हे नाट्यपद सुरेल आवाजात सादर केले.

शिरगावातील हनुमान मंदिर मंदिराचे उद्घाटन आणि वीर सावरकरांनी रचलेले ‘तुम्ही आम्ही सकल बंधू’ हे गीत याची कथा दामले यांनी सांगितली. याच खोलीमध्ये मार्च १९२५ मध्ये वीर सावरकर आणि रा. स्व. संघाचे संस्थापक हेडगेवार यांची भेट झाली. मद्रासचे प्रसिद्ध क्रांतिकारक ऋषीजी तथा ऋणा व्ही. व्ही. एस. अय्यर आणि सावरकरांची भेटही इथेच झाली होती. देशातील पहिले संमिश्र हळदीकुंकू दामले यांच्या घरी झाले होते. जातिभेद आणि स्पृश्यास्पृश्य भेद दूर करण्याची चळवळ वीर सावरकरांनी शिरगावातून सुरू केल्याचे प्रसन्न दामले यांनी सांगितले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

