Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीतील कलाकारांनी मुंबईत रंगवली शास्त्रीय संगीताची मैफल

Advertisements

रत्नागिरी : येथील स्वराभिषेक संगीत वर्गाच्या तन्वी मोरे आणि उत्तरा केळकर यांनी मुंबईतील कलाकारांसमवेत दादर (मुंबई) येथील मैफलीत शास्त्रीय गायन सादर करून मुंबईकर रसिकांची मने जिंकली. स्वराभिषेक आणि मुंबईतील कलांगण या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही मैफल दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील कलांगणच्या रंगमंचावर पार पडली.
स्वराभिषेकच्या संचालिका सौ. विनया परब आणि कलांगण-मुंबईच्या संचालिका, तसेच अनेक दूरचित्रवाहिन्यांवरच्या सांगीतिक रिअ‍ॅलिटी शोच्या मार्गदर्शक संगीतकार सौ. वर्षा भावे यांच्या संकल्पनेतून गेली दोन वर्षे रत्नागिरी आणि मुंबईतील शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या त्यांच्या शिष्यवर्गाला घेऊन मैफलीचा हा उपक्रम राबवला जातो. याअंतर्गत रत्नागिरीत दोन मैफली झाल्या असून, मुंबईतील ही तिसरी मैफल होती. यामध्ये तन्वी आणि उत्तरासमवेत कलांगणचे शिष्य वेदांत धामणकर, स्मयन आंबेकर, वेदांत यादव यांनीही शास्त्रीय गायन केले. या वेळी विद्या कंठी आणि मंगेश मोरे यांनी संवादिनीसाथ, तर केदार लिंगायत यांनी तबलासाथ केली. दीप्ती आंबेरकर यांनी निवेदन केले. विशारद पूर्ण परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल तन्वी मोरे हिचा व अलंकारची प्रथम परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल केदार लिंगायत या रत्नागिरीतील कलाकारांचा वर्षा भावे आणि विनया परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मैफलीला कलांगणचे शिष्यवर्ग आणि पालक उपस्थित होते. या वेळी विनया परब आणि वर्षा भावे यांनी शिष्यवर्गाला मार्गदर्शन केले.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version