रत्नागिरी : निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबलपेक्षा अधिक आणि रात्री ४५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या ध्वनिक्षेपकांवर (लाउडस्पीकर्स) कठोर कारवाई केली जाणार असल्याचे रत्नागिरी पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच परवानगी न घेता लाउडस्पीकर लावणाऱ्यांवरदेखील कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचे पोलिसांकडून पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या स्थायी आदेशांनुसार ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दींमध्ये कठोर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
विनापरवाना लाउडस्पीकर लावल्यास, तसेच निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा अधिक आवाज लाउडस्पीकर्सद्वारे झाल्यास पोलीस पंचनामा करून कायदेशीर कारवाई करणार आहेत. तक्रार प्राप्त झाल्यास पोलीस अधिकारी ध्वनिमापक यंत्राद्वारे डेसिबल मोजणी करणार असून, मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. आवाजाच्या वैध पातळ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५, तर रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५, तर रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५, तर रात्री ४५ डेसिबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल एवढी आवाजाची पातळी वैध आहे. त्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोन्हींकडून स्वतंत्र कारवाई केली जाणार आहे. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये लाउडस्पीकर्सची फेरतपासणी आणि सर्वेक्षण केले जाणार असून, विनापरवाना लावलेले स्पीकर जप्त केले जाणार आहेत.
आवाजपातळीचे मर्यादा उल्लंघन पहिल्यांदा झाल्यास इशारा देण्यात येणार आहे; मात्र पुन्हा उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३६अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. या गुन्ह्यासाठी पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार एक लाख रुपयांपर्यंत दंड आणि पाच वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पोलीस कायदा कलम १४९नुसारही वेगळी तक्रार दाखल होऊ शकते, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
लाउडस्पीकर अधिकृतपणे वापरण्याची परवानगी मिळवण्यासाठी आपले सरकार पोर्टलवरून https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Login अर्ज करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

